Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

Agriculture Weather Update : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार. १४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Agriculture Advisory
Agriculture AdvisoryAgrowon
Published on
Updated on

हवामान अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार. १४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान असेल, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. ११ ते १३ जुलैदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात १४ ते २० जुलैदरम्यान कमाल आणि किमान तापमान सरासरी, तर पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विशेष सल्ला

या काळातील जोरदार ते अति जोरदार पावसामुळे भात, नागली रोपवाटिका, भाजीपाला पिके, हळद, फळबाग नवीन लागवडीतून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

भात खाचरातील बांधावरील गवत काढून बांध तणमुक्त ठेवावेत जेणेकरून किडींच्या खाद्य वनस्पतीचा समूळ नायनाट केल्याने भात पिकावरील किडींच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यास मदत होईल.

नागली, वरई

रोपवाटिका

सध्याच्या जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता या रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

आंबा

वाढीची अवस्था

जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या रोपांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

नवीन फळबाग लागवड

पूर्वतयारी

नवीन लागवडीसाठी तयार असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहू नये, याची तजवीज करावी.

Agriculture Advisory
Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

भाजीपाला

रोपवाटिका

जिल्ह्यात झालेल्या जोरदार ते अति जोरदार पावसामुळे तसेच पुढील पाच दिवसांत जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

वांगी

पुनर्लागवड

वांगी पिकाची रोपे ४ ते ६ आठवड्यांची झाली असल्यास येत्या तीन दिवसांत पावसाची तीव्रता कमी असताना पुनर्लागवड पूर्ण करून घ्यावी. पुनर्लागवड करतेवेळी रोपे डायमिथोएट १ मि.लि. प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात ५ मिनिटे बुडवावी. लागवड सरी वरंब्यावर ७५ × ७५ सें.मी. किंवा ७५ × ६० सें.मी. किंवा ६० × ६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीवेळी ७५० ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, ४ ग्रॅम युरिया, ११ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति रोप या प्रमाणे खतमात्रा द्यावी. पुनर्लागवड करतेवेळी रोपांची मुळे क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात ५ मिनिटे बुडवून लागवड करावी. रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्याकरिता पुनर्लागवडीच्या वेळेस ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति रोप शेणखतासोबत मिसळून द्यावे. रोपांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

वांगी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकामध्ये सूत्रकृमी व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये झेंडू या सापळा पिकाची लागवड करावी.

मिरची

पुनर्लागवड

मिरची पिकाची रोपे ४ ते ६ आठवड्यांची झाली असल्यास पावसाची तीव्रता कमी असताना येत्या तीन दिवसांत पुनर्लागवड पूर्ण करून घ्यावी. लागवड सरी वरंब्यावर ६० × ६० सें.मी. किंवा ६० × ४५ सें.मी. अंतरावर करावी. लागवडीच्या वेळेस ५४० ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, ६ ग्रॅम युरिया, ११ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति रोप या प्रमाणे खतमात्रा द्यावी. पुनर्लागवड करतेवेळी रोपे डायमिथोएट १ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणात ५ मिनिटे बुडवावी. रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्याकरिता पुनर्लागवड करतेवेळी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति खड्डा या प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

वेलवर्गीय भाजीपाला

वाढीची अवस्था

पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी ही पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना दोऱ्या लावून आधार देण्यात यावा. मंडपाची व्यवस्था करावी.

शेळीपालन

पावसाळ्यात शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या वेळी पातळ संडास होणे, खाणे कमी होणे आणि वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यासाठी शेळ्यांना अल्बेंडाझॉल ७.५ मिलिग्रॅम प्रति किलो वजन या प्रमाणात औषध द्यावे.

Agriculture Advisory
Agriculture Intercropping Method : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

खरीप भात

रोपवाटिका, पुनर्लागवड

रोपवाटिका क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. भात पुनर्लागवड केलेल्या खाचरामध्ये पाणी पातळी २.५ ते ५ सें.मी.पर्यंत नियंत्रित करावी.

रोपवाटिकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी बेणणी करून नत्राची दुसरी मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा या प्रमाणे पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.

पुनर्लागवडीच्या क्षेत्रामध्ये नांगरणी करावी. त्या वेळी चांगले कुजलेले शेणखत ७५ किलो प्रति गुंठा या प्रमाणे जमिनीत मिसळावे.

पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने हळव्या भात वाणाची रोपे लागवडीयोग्य (२० ते २१ दिवसांची) झाली असल्यास पुनर्लागवड येत्या तीन दिवसांत पूर्ण करून घ्यावी.

बांधांची बांधबंदिस्ती करून बांध तणमुक्त ठेवावेत. संभाव्य किडींचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. बांधावर तीळ, तूर, उडीद, भेंडी ई. पिकांची लागवड केल्यास त्याचा तण व कीड नियंत्रणासाठी फायदा होतो.

पुनर्लागवड करावयाच्या खाचरामध्ये चिखलणी करावी. चिखलणीवेळी प्रति १० गुंठ्यासाठी ८.७ किलो युरिया, ३१.३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८.४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खते मिसळावीत. जर ५०० किलो गिरीपुष्प पाला प्रति १० गुंठा चिखलणीच्या गाडल्यास नत्र खताची मात्रा अर्धी द्यावी. मिश्रखत (१५:१५:१५) देणार असाल, तर प्रति गुंठा ३ किलो मात्रा द्यावी. खते पावसाची तीव्रता कमी असताना द्यावीत.

हळव्या जातींसाठी भात पिकाची पुनर्लागवड १५ × १५ सें.मी. अंतरावर करावी. लागवड सरळ आणि उथळ २.५ ते ३.५ सें.मी. खोल करावी. त्यामुळे फुटवे चांगले येतात. १२ ते १५ सें.मी. उंचीची आणि पाच ते सहा पाने फुटलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी. एका चुडामध्ये दोन ते तीन रोपे लावावीत. संकरित भात वाणासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.

चारसूत्री पद्धतीने लागवड करताना चिखलणीवेळी सुमारे २० किलो गिरिपुष्प झाडांचा पाला प्रति गुंठा जमिनीत गाडावा. सुधारित किंवा संकरित वाणांची रोपांची नियंत्रित लागवड (१५-२५ सें.मी.) करावी. नियंत्रित लागवडीनंतर चार ते पाच दिवसांपर्यंत किंवा त्याच दिवशी प्रत्येक चार चुडाच्या चौकोनात २.७ ग्रॅम वजनाची एक युरिया डीएपी ब्रिकेट हाताने ५ ते ७ सें.मी. (२.५” ते ३”) खोल खोचावी.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(नोडल ऑफिसर, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com