
Agriculture Tips: मागील काही दिवसांपासून सर्व दूर पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. जवळपास सर्व विभागांमध्ये १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याचा अंदाज आहे. यापूर्वी मॉन्सूनचे आगमन १ जून रोजी केरळमध्ये होत असे आणि ७ ते १० जून दरम्यान मॉन्सून महाराष्ट्र व्यापात असे.
या वर्षी मॉन्सूनचे आगमन हे केरळमध्ये २४ मे आणि महाराष्ट्रात २५ मेला झालेले आहे. पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. त्यामुळे किमान वाफसा येण्यास ७ ते ८ दिवस लागण्याची शक्यता असल्याने पेरणीची घाई करू नये.
शेतामध्ये पावसाचे पाणी साठून राहणार नाही यासाठी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी करावी.वाफसा आल्यानंतर कुळवाने मशागत करावी म्हणजे उगवलेल्या तणाचे नियंत्रण होईल. शेत पेरणी योग्य होईल. हवेतील उष्णता मृग नक्षत्राच्या आसपास कमी होईल.
पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे.हलक्या जमिनीत वापसा आल्यानंतर कुळवाने पूर्व मशागत करावी. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.कोरडवाहू भागात ज्या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत झालेली असल्यास आणि पेरणी योग्य १०० मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे पेरणी करावी.
हलकी जमीन : हुलगा, मटकी
मध्यम व भारी जमीन : उडीद, मूग, चवळी, सूर्यफूल, तूर
आंतरपीक पद्धत : येत्या कालावधीमधील पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, कोरडवाहू विभागामध्ये तूर + सूर्यफूल (२:१), तूर + बाजरी (२:१), तूर + मूग / उडीद (२:१) आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरू शकेल. हुमणीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते ७ या काळात असतो. त्यासाठी एकरी एक प्रकाश सापळा संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीमध्ये शेतामध्ये लावावा.
पशुसंवर्धन
जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रण पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. कोवळ्या गवतामुळे होणारी बुळकांडी रोगाकरिता सल्फा गोळ्याचा वापर करावा.जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावे.पावसाचे वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावे.
गोठ्यातील छत आणि भिंती धातूच्या नसाव्यात, कारण धातू वीज आकर्षित करतात.अचानक आलेल्या वादळाच्या वेळी जर तुमचे केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे.
स्वतःचे रक्षण करण्यासाठी तात्काळ जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडावे, त्याभोवती हातांचा विळखा घालावा. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी. जनावरांना खाली बसवावे. वातावरण निवळल्यानंतर तात्काळ आश्रयस्थान गाठावे.अचानक गडगडाट होत असल्यास व सभोवताली फक्त झाडेच असतील तर अशा वेळी झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावे.
पाण्याचे पुनर्भरण
पाणी जमिनीत जास्तीत मुरेल व वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचे घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावे. त्याचा वापर विहीर पुनर्भरण किंवा कूपनलिका पुनर्भरणासाठी करावा.
०२४२६-२४३८६१
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.