
सुनील चावके
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४० जागा गमावणाऱ्या आम आदमी पार्टीचा दारुण पराभव आणि त्यासोबत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात झालेला वैयक्तिक पराभव, यामुळे अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठा धक्का बसला आहे. ते दिल्लीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत आणि तूर्तास तरी त्यांच्या राजकीय पुनरागमनाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.
पण ‘आप’साठी किंवा स्वतः केजरीवाल यांच्यासाठी सारे काही संपलेले नाही. कारण आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लाभलेला पक्ष आहे. पंजाबमध्ये ११७ सदस्यांच्या विधानसभेत ९५ आमदारांसह ‘आप’ची मार्च २०२७ पर्यंत प्रचंड बहुमताची सत्ता आहे. ‘आप’चे राज्यसभेत १० आणि लोकसभेत ३ सदस्य आहेत. दिल्ली विधानसभेत २२ आमदारांसह ‘आप’ हा एक मुख्य विरोधी पक्ष आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत १० टक्क्यांनी मते घटूनही ‘आप’ची ४३.५७ टक्के मते कायम आहेत.
दिल्ली महापालिकेत ‘आप’ची बहुमताची सत्ता आहे. विरोधकांची ‘इंडिया’आघाडी संदर्भहीन होण्याच्या अवस्थेला पोहोचली असली तरी त्यातील काँग्रेस वगळता इतर सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांची ‘आप’ आणि केजरीवाल यांना सहानुभूती लाभलेली आहे.
सामान्य परिस्थितीत पक्षाचे तसेच स्वतःचे अस्तित्व शाबूत राखून संघर्ष करण्यासाठी एवढे राजकीय संचित पुरेसे असते. पण केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला भविष्यात सुरक्षा कवच देण्यासाठी ते पर्याप्त असेलच याची शाश्वती देता येत नाही. कारण या संचिताच्या प्रमाणात त्यांच्यापुढची आव्हानेही नजीकच्या भविष्यात उग्र होत जाणार आहेत.
एकजूट कायम राखण्याचे आव्हान
केजरीवाल यांच्या पक्षात राजकारणात प्रस्थापित झालेले नेते बहुतांश नेते पन्नाशीतील आहे. त्यांना केजरीवाल यांच्यासारखे वलय लाभलेले नसले तरी भविष्यात त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून येण्याची शक्यता आहे. राजकारणातील केजरीवाल ब्रँड संपविण्यासाठी त्यांना विरोधकांकडून आतून-बाहेरुन भरपूर रसद मिळू शकते.
अगदी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये उभी फूट पडली तशी आम आदमी पार्टीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला पडद्यामागून भाजप आणि काँग्रेसची फूस मिळेल. दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पार्टीच्या मानसिक खच्चीकरणाचा फायदा उठवून ‘आप’च्या तीनही खासदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजप करू शकतो.
राज्यसभेतील ‘आप’च्या सदस्यांबाबतही असाच प्रयत्न होऊ शकतो. पक्षफोडीच्या याच प्रयोगाचा अगदी पंजाबमधील भक्कम बहुमताच्या सरकारला धक्का देण्यासाठी आणि दिल्ली महापालिकेतील ‘आप’चे बहुमत संपुष्टात आणण्यासाठीही अवलंब केला जाऊ शकतो.
मद्य धोरण घोटाळा, ‘शीशमहल’ बांधकाम, मनी लाँडरिंग, दिल्ली जलबोर्ड, मोहल्ला क्लिनीकसह ‘आप’ सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथांना मूर्त रुप देऊन केजरीवाल आणि त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांना ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याच्या चौकशांसह न्यायालयात अनेक खटल्यांना सामोरे जाण्यास विवश केले जाणार आहे.
मद्य धोरण गैरव्यवहारात केजरीवाल यांच्यासोबत ‘आप’लाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास ‘आप’ची मान्यताही रद्द होऊ शकते. तसे घडले तर गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात नेटाने उभा असलेला ‘आप’चा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतो.
उच्चशिक्षित केजरीवाल हे देशाच्या राजकारणातील धूर्त, कुशाग्र बुद्धीचे राजकारणी आणि रणनीतीकार मानले जातात. केंद्रीय अर्थमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास करणारे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हेही त्यांच्याप्रमाणेच राजकारणातील निष्णात बुद्धिबळपटू होते.
पण केजरीवाल यांच्याप्रमाणे आपला सुप्त राजकीय धूर्तपणाचा उघड करण्याची त्यांना कधी गरज भासली नाही. पण ‘आप’सारख्या पक्षाचे नेतृत्व करताना आणि भाजप तसेच काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात वेळ न दवडता, झटपट पक्ष उभा करताना केजरीवाल यांना त्यांच्या भात्यातील राजकीय धूर्ततेच्या सर्वच बाणांचा वापर करावा लागला.
पंजाब आणि दिल्लीमध्ये ‘आप’शी स्पर्धा नसलेल्या सर्वच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. पण भाजप आणि काँग्रेस त्यांचे आणि त्यांच्या ‘आप’चे मुख्य विरोधक आहेत. केजरीवाल आणि ‘आप’ची सद्दी संपविण्यासाठी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे घोर वैचारिक विरोधक असूनही भाजपने काँग्रेसशी केलेली छुपी हातमिळवणी लपून राहिलेली नाही.
काँग्रेसचा अप्रत्यक्ष हातभार लागला नसता तर केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांच्यावर पराभूत होऊन घरी बसण्याची वेळ आली नसती आणि भाजपला साध्या बहुमतापर्यंत पोहोचणे दुरापास्त झाले असते. क्षणिक यशाचे गाठलेले शिखर कायमचे असल्याचा समज करुन सत्तेच्या मस्तीत आपल्या विरोधकांविषयी केलेली कृती किंवा विधाने कालांतराने आपल्यावरच कशी बूमरँग होऊ शकतात, याचा अनुभव केजरीवाल घेत आहेत.
भूतकाळातील त्यांनी केलेल्या चुकांच्या जखमांवर मीठ चोळण्यात भाजप आणि काँग्रेसचे नेतेही मागे नाहीत. राजकारणात कोणीही कायमचे शत्रू वा मित्र नसतात, हे वास्तव केजरीवाल यांना हळूहळू उमगू लागेल. पण तोपर्यंत स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शी राजकीय पर्यायाची ग्वाही देत राजकारणाच्या दलदलीत उतरलेल्या आम आदमी पार्टीने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण केलेली उत्कंठा आणि उन्माद आता पूर्णपणे ओसरला आहे. सत्तेचे घबाड मिळताच केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या पूर्णपणे बदललेल्या राजकीय आचरणामुळे सर्वसामान्यांचा, विशेषतः शहरी मध्यमवर्गाचा अपेक्षाभंग होऊन त्यांच्या विश्वासार्हतेला टाचणी लागली.
पण इरादे नेक असतील तर राजकारणात गमावलेली विश्वासार्हता परत मिळवायला पाच वर्षे किंवा पुढची निवडणूक पुरेशी ठरते, हे २००९ नंतर भाजपने, २०१४ नंतर खुद्द केजरीवाल आणि ‘आप’ने, २०१५ मध्ये नितीशकुमारांनी आणि २०१९ नंतर राहुल गांधी आणि काँग्रेसने दाखवून दिले आहे. भ्रमनिरास झालेला मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.
मेहनतीला मार्केटिंगची जोड देण्यात ते तरबेज आहेत. केजरीवाल ५६ वर्षांचे आहेत. दिल्ली ही देशभर विनासायास जाहिरात करणाऱ्या माध्यमांची राजधानी आहे. त्यामुळे वारंवार राजकीय अपयश ओढवून घेतल्यावरही मुख्य विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधी यांचे महत्त्व शाबूत आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला केजरीवाल यांना ठाऊक आहे.
जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची आणि त्यासाठी लागणारी आवश्यक साधने गोळा करण्याची त्यांची क्षमता निर्विवाद आहे. विद्यार्थीदशेत रेल्वेच्या प्रतीक्षेत प्लॅटफॉर्मवर पेपर टाकून झोपणाऱ्या केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील पराभवामुळे तशीच प्रतीकात्मक वेळ आली आहे.
केलेल्या चुकांमधून बोध घेत त्या लगेच सुधारुन प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची त्यांची क्षमता आलिशान ’शीशमहल’मधील वास्तव्यामुळे क्षीण झाली असेलही. पण तिहार तुरुंगामध्ये व्यतित केलेल्या १७७ दिवसांतून त्याचे संतुलनही साधले गेले आहे. केजरीवाल यांचा पक्ष सर्वस्वी त्यांच्या करिष्म्यावर चालतो.
या करिष्म्यालाच सध्या ग्रहण लागले आहे. दिल्लीच्या पराभवामुळे केजरीवाल यांच्यापुढे संकटेच नव्हे, तर संधीही निर्माण झाल्या आहेत. राजकारणात यश मिळविण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर केजरीवाल यांनी स्वानुभावातून विकसित केले आहे. ते अपडेट कसे करतात यावर त्यांची भविष्यातील वाटचाल अवलंबून असेल.
( लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.