Agriculture Cropping System : बीटी कपाशीनंतर हरभरा, गहू लागवड पीकपद्धती ठरते फायदेशीर

Agriculture Planning for Rabi Season : रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावयाचे हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो. तो दूर करण्याच्या उद्देशाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कापूस संशोधन विभागातील कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय काकडे यांनी सलग तीन वर्षे संशोधन केले.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

सतीश कुलकर्णी

Rabi Season Crops : सध्या महाराष्ट्रात त्यातही विदर्भातील एकूण कापूस क्षेत्रापैकी सुमारे ९८ टक्के क्षेत्र हे बीटी वाणाखाली आले आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये लवकर येणाऱ्या बीटी कापूस वाणांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे जून महिन्यात वेळेवर पेरणी शक्य झाल्यास नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण वेचणी होते.

त्यानंतर रब्बीमध्ये हरभरा किंवा गहू यांसारखी पिके घेता येतात. अर्थात, रब्बी हंगामातील पिकास संरक्षित ओलित देण्याची सोय असल्यास चांगले उत्पादन मिळून शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगले मिळते. या कापूस आधारीत पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

विदर्भामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी हे खरिपातील मुख्य नगदी पीक आहे. त्यासाठी उत्तम व्यवस्थापन ते करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र योग्य कालावधीमध्ये येणाऱ्या बीटी कपाशी वाणाची निवड न केल्यामुळे पुढे रब्बी पीक कोणते घ्यावे, याबाबत त्यांच्या मनामध्ये कायम संभ्रम असतो.

विद्यापीठाकडे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. त्यामुळे विद्यापीठामध्ये संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस संशोधन विभागातील कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय काकडे यांनी त्याबाबत बीटी कापूस आधारीत पीक पद्धतीचे प्रयोग २०२०-२१ मध्ये सुरू केले.

त्याचे नाव -संसाधनाच्या प्रभावी वापरासाठी व शाश्‍वत उत्पादनासाठी बीटी कापूस आधारित पीक पद्धती असे होते. पुढे तीन वर्षे अकोला येथील कापूस संशोधन विभाग; सेलसुरा (वर्धा) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्रांच्या प्रक्षेत्रावर वेगवेगळ्या पीकपद्धतीबाबत प्रयोग राबविण्यात आले.

खरिपात कमी कालावधीच्या बीटी कपाशी वाणांची लागवड करून पुढे हरभरा किंवा गहू ही पीकपद्धती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचा निष्कर्ष प्रयोगातून आला आहे. या प्रयोगाच्या शिफारशी चारही कृषी विद्यापीठाच्या अकोला येथे पार पडलेल्या संयुक्त संशोधन समिती (अॅग्रेस्को)- २०२४”द्वारे मान्य करण्यात आल्या आहेत.

Agriculture
Rabi Crop Management : कोरडवाहू ज्वारी, हरभरा लागवडीचे नियोजन

उद्दिष्टे

बीटी कापूस आधारित पीक पद्धतीमध्ये एकूण उत्पादन व आर्थिक मिळकतीचा अभ्यास करणे.

पोषक मूलद्रव्यांचा कापूस पिकासह घेतल्या जाणाऱ्या पीक पद्धतीमधील अन्य पिकांच्या वाढीवरील परिणामांचा अभ्यास करणे.

कापूस आधारित पीक पद्धतीचा आर्थिकदृष्ट्या अभ्यास करणे.

२०२०-२०२३ कालावधीत राबविलेल्या प्रयोगांतील कापूस लागवडीसंबंधी महत्त्वाच्या तांत्रिक बाबी :

१) कपाशीचे बीटी वाण :

मध्यम कालावधीचे (१६०-१७० दिवसांचे) योग्य बीटी वाण (बीजी -२)

कमी कालावधीचे (१४०-१५० दिवसांचे ) योग्य बीटी वाण (बीजी-२)

२) रब्बी पिकांचे वाण :

हरभरा -पीडीकेव्ही कांचन (एकेजी-११०९)

गहू -पीडीकेव्ही सरदार (एकेडब्ल्यू -४२१०-६

जवस -पीकेव्ही एनएल-२६०

३) कापूस पीक पद्धती :

सलग बीटी कापूस (मध्यम कालावधी) - शेतकऱ्यांची प्रचलित पद्धत

कापूस बीटी वाण (कमी कालावधी)- गहू

कापूस बीटी वाण (कमी कालावधी)- हरभरा

कापूस बीटी वाण (कमी कालावधी)- जवस

४) लागवड :

कापूस :२१ जून २०२०, १९ जून २०२१, ७ जुलै २०२३

गहू, हरभरा व जवस : ३ डिसेंबर २०२०, १० डिसेंबर २०२१, १६ डिसेंबर २०२३

५) खतमात्रा :

कापूस - १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद, पालाश / हेक्टरी

गहू - १००:५०:५० किलो नत्र, स्फुरद, पालाश / हेक्टरी

हरभरा - २५:५०:३० किलो नत्र, स्फुरद, पालाश / हेक्टरी

जवस - ६०:३०:०० किलो नत्र, स्फुरद, पालाश / हेक्टरी

६) कीड व रोगनियंत्रण : विद्यापीठ शिफारशीप्रमाणे.

Agriculture
Kharif Crop Management : पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नियोजन कसे कराल?

मान्यताप्राप्त संशोधन शिफारस :

कापूस आधारित पीक पद्धतीमध्ये अधिक उत्पादन व अधिक आर्थिक मिळकतीसाठी लवकर येणाऱ्या कापूस बीटी (१४०-१५० दिवस कालावधी) व त्यानंतर रब्बी हंगामात दुबार पीक म्हणून शिफारशीच्या १०० टक्के खतमात्रेसह हरभरा किंवा गहू उशिरा लागवडीसाठी योग्य वाणाची) लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया :

याविषयी अधिक माहिती देताना कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय काकडे म्हणाले, की कमी कालावधीच्या बीटी कपाशी पिकानंतर हरभरा किंवा गहू या दुबार पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना प्रचलित सलग कपाशी पिकाच्या तुलनेमध्ये ४५ ते ४६ टक्के अधिक नफा मिळत असल्याचे आमच्या तीन वर्षांच्या प्रयोगातून पुढे आले आहे.

हे प्रयोग विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले होते. काही शेतकरी कपाशी -गहू किंवा कपाशी - हरभरा ही पीक पद्धती राबवत असले तरी त्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

पीक पद्धती व त्यातील अन्नद्रव्यांचा वापर याबाबत मिळालेल्या निष्कर्षांवर चारही विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन समितीची मान्यता मिळाली असून, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी या शिफारशी उपलब्ध झालेल्या आहेत.

प्रयोगाचे निष्कर्ष :

या प्रयोगाचे मागील तीन वर्षांचे (२०२०-२१ ते २०२३-२४) निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत

कापूस – हरभरा व कापूस – गहू या पीक पद्धतीमध्ये सर्वांत जास्त कापूस उत्पादन (कापूस समतुल्य उत्पादन अनुक्रमे ३५१७ किलो प्रति हेक्टरी व ३१०४ किलो प्रति हेक्टरी) मिळाले. तसेच सर्वांत जास्त उत्पादन क्षमता (अनुक्रमे ७५.५६ % व ५४.९२ % ) आढळून आली.

प्रचलित सलग कापूस लागवडीच्या तुलनेत बीटी कापूस – हरभरा या पीक पद्धतीमध्ये सर्वांत जास्त प्रती दिवस आर्थिक मिळकत (५४६ रुपये) नोंदवली गेली. या पीकपद्धतीनंतर कापूस-गहू ही पीक पद्धती फायदेशीर आढळून आली.

कापूस – हरभरा या पीक पद्धतीमध्ये एकूण आर्थिक नफा (रु.२१२५०६ /हेक्टरी) सर्वांत जास्त नोंदवला गेला. निव्वळ नफ्याचे (रु. १४४२६९ /हेक्टरी) प्रमाणही अधिक होते. तसेच उत्पादन खर्च व नफ्याचे गुणोत्तर १:३.११ इतके मिळाले.

कापूस – हरभरा या पीक पद्धतीनंतर कापूस-गहू या पीक पद्धतीमध्ये एकूण आर्थिक नफा जास्त (रु.१८७४५८ /हेक्टरी) नोंदवला गेला. निव्वळ नफ्याचे प्रमाणही (रु.१२०७५७ /हेक्टरी) जास्त राहिले. या पीक पद्धतीच्या उत्पादन खर्च व नफ्याचे गुणोत्तर १:२.८१ मिळाले.

खरीप हंगामातील कपाशी पिकानंतर कापूस – हरभरा आणि कापूस-गहू या पीक पद्धतीमध्ये रब्बी हंगामातील पिकास शिफारशीत १०० टक्के खतमात्रा फायदेशीर आढळून आली.

या पीक पद्धतीमध्ये खरीप हंगामात कमी कालावधीच्या (१४०-१५० दिवस) बीटी वाणांची निवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.

तक्ता १ : प्रयोगातील उत्पादन, नफा, खर्च इ. ताळेबंद

पीक पद्धती / उपचार कापूस उत्पादन (किलो /हेक्टरी) रब्बी पिकांचे उत्पादन (किलो/हेक्टरी) कापूस समतुल्य उत्पादन (किलो/हेक्टरी) एकूण नफा (रु. प्रति हेक्टरी) निव्वळ नफा (रु. प्रति हेक्टरी) खर्च : नफा गुणोत्तर पीक पद्धतीचा प्रति दिवशी मिळणारा नफा (रु. प्रति हेक्टरी/दिवस)

सलग कापूस (मध्यम कालावधी) २०१७ - २०१७ १२२०४६ ७७३५४ २.७३ ३०६

कापूस (कमी कालावधी)- गहू १७१७ ४०७८ ३१०४ १८७४५८ १२०७५७ २.८१ ४७२

कापूस(कमी कालावधी) - हरभरा १७४१ २०५४ ३५१७ २१२५०६ १४४२६९ ३.११ ५४६

कापूस (कमी कालावधी)- जवस १७३० ९३२ २६०३ १५७७६४ ७७३५४ २.५७ ३६५

अन्नद्रव्ये व्यवस्थापन (रब्बी पिकास)

७५% खतमात्रा १७४६ १५४६ २६१२ १५८१८७ ९९५७६ २.७० ३८४

१००% खतमात्रा १८२५ १८१७ २८६५ १७२९७४ ११२९९० २.८८ ४३५

डॉ. संजय काकडे ९८२२२३८७८०

(कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com