
Latur News : हडोळती (ता. अहमदपूर) येथील शेतकरी अंबादास पवार हे दहा वर्षापासून स्वतःला बैलाच्या जागी स्वतःला जुंपून पिकांची कोळपणी करतात. यंदा त्यांचे हे कष्ट समाज माध्यमामुळे जगासमोर आले. यामुळे सहा दिवसापासून ते चांगलेच चर्चेत आले असून त्यांना भेटून मदत करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.
रोख मदत, मदतीचे आश्वासन, नातवांच्या शिक्षणाची हमी, कर्जाची परतफेड या घडामोडीत शुक्रवारी (ता. चार) क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वर्गणी जमा करुन पवार यांना लाख रुपये किंमतीची बैलजोडीच घेऊन दिली. त्यानंतर शनिवारी (ता. पाच) बुलडाणाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही बैलजोडीसह रोख पन्नास हजार रुपये व वर्षभर पुरेल एवढा किराणा दिली.
तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार यांचे पन्नास हजाराच्या पीक कर्जाचा रोख भरणा करुन त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले. यामुळे बैलाच्या जागी स्वतःला जुंपणाऱ्या पवार यांच्याकडे आता दोन बैलजोडी झाल्या आहेत.
याच दरम्यान शुक्रवारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील यांनी शेतकऱ्याच्या जागी स्वतःला जुंपून घेत कोळपणी करत पवार यांना नातवांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची हमी दिली.
हडोळीत येथील शेतकरी अंबादास पवार (वय ७५) हे पत्नी मुक्ताबाई यांच्या मदतीने सिंगल कोळप्याने बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत दरवर्षी रब्बी व खरीप पिकांची कोळपणी करतात. दहावर्षापूर्वी भाऊ वाटणीनंतर त्यांनी बैलबारदाना मोडला होता. दोन एकर नऊ गुंठे जमिनीतील बैलजोडीने कोळपणीचा खर्च परवडत नसल्याने ते पत्नी मुक्ताबाईच्या मदतीने दहा वर्षापासून स्वतः कोळपणी करतात. यासाठी त्यांनी टायर ट्युब कोळप्याला बांधून व खांद्याला अडकवून कष्ट सुलभ केले आहेत.
त्यांची ही कसरत यंदा समाज माध्यमामुळे सर्वांना पहायला मिळाली. यामुळे काही दिवसापासून त्यांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शुक्रवारी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या सूचनेवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करून पवार यांना मिरवणुक काढून बैलजोडी दिली. शनिवारी आमदार गायकवाड यांनी बैलजोडी रोख रक्कम व किराणा दिला.
त्यापूर्वी त्यांनी पवार दाम्पत्याची पाद्यपूजा करत त्यांच्या कष्टाचा सन्मान केला. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांनी पन्नास हजार रुपये दिले. तर सहकारमंत्री पाटील यांनी मागील आठवड्यात पवार यांना संपर्क साधून कर्जफेड करण्याची हमी दिली होती.
शनिवारी त्यांनी पन्नास हजार रुपये कर्जाचा भरणा करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र पवार यांना दिले. यामुळे पवार यांच्या डोक्यावरील कर्ज खांद्यावरील कोळप्याचे ‘जू’ उतरले असून दहा वर्षानंतर पवार यांच्याकडे पुन्हा बैलबारदाना आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.