Agricultural Degree Course : कृषी पदवीच्या १७ हजार ९०६ जागांची प्रवेश प्रक्रिया सुरू

Agriculture Education : राज्यातील कृषी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon

Pune News : राज्यातील कृषी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १७ हजार ९०६ जागांसाठी प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यकक्षेत सध्या २०२ महाविद्यालये आहेत. तेथे सध्या नऊ विद्याशाखांमधून व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) कक्षेत ७८, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे (अकोला) ३८, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे (परभणी) ५७ तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (दापोली) कार्यक्षेत्रात २९ कृषी महाविद्यालये आहेत. यातील ३५ महाविद्यालये शासकीय, दोन अनुदानित तर १५५ महाविद्यालये खासगी आहेत.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, ‘‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणाखाली कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया चार जुलैपासून सुरू झाली आहे. कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये २० टक्के जागा ‘संस्थास्तरीय कोटा’ म्हणून राखीव असतील.

उर्वरित जागांमध्ये पुन्हा ३० टक्के ‘महाराष्ट्र कोटा’ व ७० टक्के जागा ‘कृषी विद्यापीठ कोटा’ म्हणून राखीव राहतील. सर्व प्रवेश बारावी विज्ञान आणि सीईटी, जीईई, नीट या सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये उमेदवारांनी घेतलेल्या गटानुसार (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित) पात्रता ठरवून दिले जातील.’’

Agriculture Education
Agriculture Education : व्यावसायिक शिक्षण देणारे कृषी महाविद्यालय

कृषी पदवी अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश ऑनलाइन होतील. उमेदवाराला agri2024.mahacet.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत राहील. या प्रवेशासाठी बारावी विज्ञान विद्याशाखेतील आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के गुण व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत.

सामायिक प्रवेश परीक्षा गटातील गुणांची टक्केवारी तसेच इतर अधिभार (उदाहरणार्थ शेतजमीन, बारावीतील व्यावसायिक किंवा वैकल्पिक विषय, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, क्रीडास्पर्धा, वादविवाद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व आदी राज्यस्तरीय स्पर्धांमधील गुण) असे मिळून गुणवत्ता यादी तयार होईल.

Agriculture Education
Agriculture Education : घोषणा होऊनही अद्याप अभ्यासक्रमात ‘कृषी’ येईना

संकेतस्थळावर नोंदणी करताना उमेदवाराने पूर्ण माहिती द्यावी. प्रवेश पुस्तिकेतील माहिती वाचून महाविद्यालयांचे पसंतीक्रम विचारपूर्वक नमुद करावेत, असे आवाहन कृषी परिषदेने केले आहे. प्रत्येक प्रवेश फेरीसाठी स्वतंत्र महाविद्यालयाचे पसंतीक्रम देण्याची पध्दत अवलंबली जात आहे. उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग, महाविद्यालयाचा पसंतीक्रम या बाबी विचारात घेत प्रवेशासाठी चार फेऱ्या घेण्याचे नियोजन केले आहे.

केंद्रीभूत फेरी विद्यापीठात होणार

प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या ऑनलाइन झाल्यानंतर उर्वरित रिक्त जागा ‘केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी’ पद्धतीने भरल्या जातील. ही फेरी कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयात होईल. या फेरीनंतरदेखील काही जागा रिक्त राहू शकतात. अशा जागा मात्र संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर भरल्या जातील, असे कृषी परिषदेने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com