Pune News : राज्याच्या ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळाची द्वितीय कळ लागू झाली आहे. मात्र, तसेच, दुष्काळ जाहीर करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेले प्रशासकीय काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेली पहिली कळ व दुसरी कळ घोषित करण्याची प्रशासकीय प्रक्रिया राज्य शासनाला पार पाडावी लागते.
राज्यात पहिली कळ १९४ तालुक्यांमध्ये लागू झाली होती. कमी पाऊस, पेरणीतील अडथळे व पावसाचा खंड असे निकष पहिली कळ लावताना गृहीत धरले गेले. त्यामुळे तालुक्यांची संख्या वाढली होती.
परंतु, दुसरी कळ लावताना भूजल पातळी निर्देशांक विचारात घेतले आहेत. या जिल्ह्यांमधील भूजल पातळी सामान्य, मध्यम, गंभीर की अतिगंभीर आहे याचाही अंतिम अहवाल तपासला गेला आहे. त्यात ४२ तालुके समाविष्ट करण्यात आले आहेत.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्य शासनाकडे जाणाऱ्या अंतिम अहवालाकडे आता दुष्काळी तालुक्यांचे लक्ष लागून आहे. “एकूण १५ जिल्ह्यांमधील ४२ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. या तालुक्यांमध्ये मदत द्यायची असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासनाची मदत मिळवावी लागेल. त्यासाठी आधी राज्य शासनाला दुष्काळ अधिकृतपणे घोषित करावा लागेल.
कारण, अशी घोषणा झाली तरच दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडून स्वीकारला जाईल. तसेच, ही प्रक्रिया ३० ऑक्टोबरपूर्वीच करावी लागणार आहे. त्यामुळेच सध्या द्वितीय कळ लागू झालेल्या सर्व जिल्ह्यांचे अंतिम प्रस्ताव गोळा केले जात आहेत. मदत व पुनर्वसन विभागाकडून या प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम स्थिती मंत्रिमंडळासमोर ठेवली जाईल व दुष्काळ घोषित केला जाईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
मूल्यांकनासाठी ‘महामदत’ प्रणाली
दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शासनाने स्वतःची महामदत नावाने एक संगणक प्रणाली तयार केली आहे. यात द्वितीय कळ लागू झालेल्या तालुक्यांची माहिती भरली जात आहे. दुष्काळामुळे या तालुक्यांमध्ये शेतीचे नेमके काय नुकसान झाले आहे, याचे क्षेत्रिय सर्वेक्षण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.
हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वेक्षण करताना सरसकट सर्व गावांना पथके पाठवली जात नाहीत. ‘या तालुक्यांमधील किमान दहा टक्के गावे निवडून तेथील प्रत्यक्ष स्थिती (ग्राउंड ट्रथिंग) अभ्यासावी. त्या निष्कर्षांवर आधारित अहवाल शासनाकडे पाठवावे, असे आदेश आम्ही संबंधित जिल्ह्यांना दिल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
...या तालुक्यांत द्वितीय कळ लागू (जिल्हानिहाय)
बुलडाणा---बुलडाणा, लोणार,
धाराशिव---लोहारा, धाराशिव, वाशी
लातूर---रेणापूर
बीड---आंबाजोगाई, धारूर, वडवणी
छत्रपती संभाजीनगर---सोयगाव, छत्रपती संभाजीनगर
कोल्हापूर---गडहिंग्लज, हातकणंगले
सांगली---कडेगाव, खानापूर वीटा, मीरज, शिराळा
सातारा---वाई, खंडाळा
सोलापूर---बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला
पुणे---बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हा
जळगाव---चाळीसगाव
नाशिक---मालेगाव, सिन्नर, येवला
नंदुरबार---नंदुरबार
धुळे---शिंदखेडा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.