Cashew Farming : काजू बागेला दिली पूरक व्यवसायांची जोड

Organic Farming : वडिलांची इच्छापूर्ती आणि शेतीची आवड यासाठी मुंबईतून आरगाव (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे आलेल्या अमर गणपत खामकर शेतीत चांगला जम बसवला आहे. काजू बागायतीसोबतच मत्स्यशेती, रेशीम शेती, रोपवाटिका यातून उत्पन्नाला जोड दिली आहे.
Cashew Farming
Cashew FarmingAgrowon

राजेश कळंबटे

Ganpat Khamkar : वडिलांची इच्छापूर्ती आणि शेतीची आवड यासाठी मुंबईतून आरगाव (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे आलेल्या अमर गणपत खामकर शेतीत चांगला जम बसवला आहे. काजू बागायतीसोबतच मत्स्यशेती, रेशीम शेती, रोपवाटिका यातून उत्पन्नाला जोड दिली आहे. सेंद्रिय, रासायनिक व जैविक घटकांचा एकात्मिक वापर व प्रयोग करत खर्च कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उत्तम उत्पन्न मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्‍वासही वाढला आहे.

अ मर खामकर यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाले. पण बँकेमध्ये कार्यरत व कबड्डीचे उत्तम खेळाडू असलेल्या वडिलांची स्वतःच्या गावी जाऊन शेती करण्याची खूप इच्छा होती. तीच इच्छा आणि भावना वडिलांनी आपल्या मुलामध्ये रुजविल्यामुळे अमर यांनाही शेतीबद्दल आवड निर्माण झाली. हीच आवड पुढे व्यवसायात रूपांतरित झाली. कोकणातील तरुण मुंबईला जाण्याची स्वप्ने बघतात. अमर यांच्याबाबत उलटे झाले.

१९९८ मध्ये गावी आल्यानंतर प्रथम त्यांनी लांजा येथील शेतीशाळेत २००१ ते २००४ या कालावधीत फळबाग पदविका, भाजीपाला पदविका, फुलशेती प्रांगण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांनी पहिल्याच वर्षी कृषी विभागाच्या १०० टक्के अनुदान योजनेचा लाभ घेत वेंगुर्ला जातीची ८०० काजू रोपांची लागवड केली. पुढे चार वर्षांनंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून ५८० काजूची झाडे लावली.

तत्पूर्वी १९८५ मध्ये सरकारने त्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यांच्या जमिनीत ६५० काजूची लागवड केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे एकूण २ हजारांच्या आसपास काजू झाडे आहेत. नव्या रोपांच्या सिंचनासाठी मटका सिंचन पद्धतीचा वापर केला होता.

पुढे मटक्याऐवजी प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर केल्याने बचत झाली. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी गतवर्षी ७ एकर जमीन घेतली आहे. त्यामध्ये सुमारे १०० खैराची लागवड केली. आता त्यांच्याकडे एकूण २५ एकर जमीन आहे.

Cashew Farming
Cashew Farming : भात शेतीला दिली काजू पिकाची जोड

काजूमधून वर्षाला ५ लाख उत्पन्न

लागवडीनंतर पाच वर्षांनी काजूमधून उत्पादन सुरू झाले. पहिल्या वर्षी प्रति झाड सर्वसाधारण ३ किलो काजू बी मिळाली. २ हजार रोपांपैकी ७०० झाडांमधून सर्वसाधारण ५ टन काजू बी मिळते. उर्वरित १२०० झाडे त्यांनी कराराने दिली आहेत. त्यामधून २ लाख रुपये वर्षाला मिळतात.

मिळालेल्या पाच टन काजूपैकी ८० टक्के कच्चा काजू बाजारात विकला जातो. २० टक्के काजू प्रक्रिया करून थेट ग्राहकाला विकतात. ७०० झाडांमधून त्यांना सरासरी ६ लाख रुपये मिळतात. खते, कीडनाशके, साफसफाई आणि काजू बी गोळा करण्यासाठीचा खर्च साधारण दोन लाख रुपये वजा केल्यावर निव्वळ ३ लाख रुपये फायदा राहतो. अशा प्रकारे सर्व काजू बागेमधून त्यांना ५ लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

नवीन जात विकसनासाठी प्रयत्न

गेल्या चार वर्षांपासून ते काजूची अधिक उत्पादनक्षम अशी नवीन जात विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रति झाड सरासरी ४० किलो उत्पादन देणारी झाडे शोधून त्यांची दहा कलमे तयार केली. त्या झाडांना आता मोहरही आलेला असून, त्यापासून प्रति झाड किमान ३० किलो उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. या जातीला ‘एकेआर’ असे नाव देण्याचा विचार अमर व्यक्त करतात.

Cashew Farming
Poultry Farming : शेतीला दिली कुक्कुटपालनाची जोड

उत्पन्नाला आंब्याची जोड

काजू बाग ही प्रमुख असली तरी त्यांची आंब्याची २५ झाडे आहेत. प्रति झाड सरासरी पाच पेटी आंबा मिळतो. १०० ते १२५ पेटी आंब्याची विक्री बाजारामध्ये करण्याऐवजी मुंबई येथील मित्र, कुटुंबीयांच्या मदतीने विक्री केली जाते. त्यामध्ये सध्या सेवानिवृत्त असलेल्या वडिलांच्या ओळखीचा चांगला फायदा होतो. थेट विक्रीमुळे किमान २००० रुपये प्रति पेटी असा दर मिळतो. त्यातून खर्च वजा जाता २ ते २.५ लाख रुपये मिळतात.

शेतीपूरक उपक्रमातून उत्पन्नाचा चांगला पर्याय

अ) रोपवाटिका ः

उत्पन्न वाढविण्यासाठी काजू नर्सरी, मत्स्यशेती, तुती लागवड व रेशीम शेतीचा प्रयोग केला. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी एस. बी. मेहेर, मंडल कृषी अधिकारी एस. एम. कदम, कृषी पर्यवेक्षक प्रकाश लांबोर आणि कृषी सहाय्यक देवेंद्र सोनवणे या सर्वांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

त्यांच्याकडे काजूच्या १५ हजार रोपांच्या नर्सरीचा परवाना आहे. दरवर्षी ४ हजार रोपांची विक्री सरासरी १०० रुपये प्रति रोप प्रमाणे केली जाते. त्यामधून ४ लाख रुपये मिळतात. नर्सरीमध्ये देखरेख आणि खर्च थोडा जास्त म्हणजे ५० टक्क्यांपर्यंत असतो.

ब) तिलीपियाची मत्स्यशेती -

अमर यांनी २०१७-१८ मध्ये तिलापिया मत्स्यशेतीला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी घराजवळील विहिरीत शोभिवंत मासे संवर्धन करून पाहिले होते. त्यात यश मिळू शकते, याचा अंदाज आल्यानंतर मोठ्या शेततळ्यात मत्स्य संवर्धनाचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मिळालेल्या शंभर टक्के अनुदान योजनेचा लाभ घेतला.

७०० कलमांच्या काजू बागेमध्ये ६ गुंठे क्षेत्रावर ८ लाख लिटर क्षमतेचे तळे खोदले. पहिल्या वर्षी त्यांनी ४०० पिले सोडली. सहा महिन्यांत एक मासा ८५० ग्रॅम वजनाचा असे १५० किलो मासे मिळाले. आजूबाजूच्या गावांमध्ये १२० ते २०० रुपये किलो प्रमाणे विक्री केली. त्यामधून २२ ते २५ हजार रुपये मिळाले.

सहा महिन्यांनंतर त्या तळ्यात दुसऱ्या टप्प्यात मत्स्य महाविद्यालयाच्या सहकार्याने १००० पिले सोडली. मत्स्यशेतीसाठी त्यांना शास्त्रज्ञ वैभव ऐवले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले.

त्यामधून मिळालेल्या ५०० किलो माशांना १५० रुपये प्रति किलो सरासरी दर मिळाला. खर्च वजा जाता त्यामधून निव्वळ ३५ हजार रुपये मिळाले. शेततळ्यात माशांची विष्ठा व त्यांचे अन्नपदार्थ कुजल्यामुळे अन्नद्रव्ययुक्त पाणी काजू बागेसाठी फायदेशीर ठरते. शेततळ्यात मोनोसेक्स तिलापिया जातीच्या मत्स्यसंवर्धनाच्या या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगाबद्दल अमर यांचे कृषी विज्ञान केंद्र, लांजा यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

शेतीतील अन्य प्रयोग

शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अमर यांचे सतत प्रयोग सुरू असतात.

रासायनिक खताचा कमी वापर करत जिवामृत, गांडूळ खत, शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत, जैविक पीएसबी व ॲझेटोबॅक्टर यांचा वापर वाढवत आहे.

कीड नियंत्रणासाठी जिवामृत, ताक आणि गोमूत्राचा वापर करतो. पिवळे, निळे चिकट सापळे, गंध सापळे, खोडकिड्यांसाठी बॅक्टेरियांचा वापर करून कीड-रोगापासून संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न असतो.

मत्स्यशेतीतील तळ्याचे पाणी बागेसाठी खतांप्रमाणे उपयुक्त ठरते.

कीड नियंत्रणामध्ये पक्षी महत्त्वाचे असून, त्यांना बागेकडे आकर्षित करण्यासाठी पक्षिथांब्यांसह अन्य उपाय राबवतात.

गावठी बीच्या खुंटावर कलमे बांधून रोपांची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा त्यांचा अनुभव आहे.

शेतकऱ्यांना गावठी आंब्याच्या झाडावरती पाचर कलमे बांधून देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि आत्मविश्‍वास वाढवतात.

लांजा तालुक्यातील वाटूळपासून रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वृक्षतोड झाली आहे. स्वतः पुढाकार घेऊन व्हेळफाटा रस्त्याच्या दुतर्फा काजूची १०० झाडे लावून संगोपन करत आहेत.

रेशीम शेती

राजापूर येथील वासुदेव घाग यांनी तुती लागवडीला चालना देण्यासाठी लांजा-राजापूर रेशीम शेतकरी गटाची स्थापना फेब्रुवारी २०२२ ला केली. त्यामध्ये अमर खामकरही सहभागी झाले. एक एकर क्षेत्रात तुती लागवड केली.

त्यासाठी जागेची साफसफाई, विजेचा खांब, रेशीम किडे जोपासण्यासाठी शेड, तुतीच्या ५ हजार रोपांची लागवड आणि मजुरी यावर सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च झाला. जून २०२२ मध्ये कोल्हापूर येथून शेतकऱ्याकडून प्रति काडी एक रुपये या प्रमाणे तुतीच्या कांड्या (स्टिक) आणल्या. शेतामध्ये केलेल्या गादीवाफ्यावर रोपांमध्ये दोन फुटांचे अंतर ठेवून लावल्या.

लागवडीवेळी लेंडी मिश्रीत गांडूळ खत आणि सोबतस्फुरदयुक्त खत दिल्यामुळे रोपांची वाढ जोमाने होऊन चार महिन्यांत पुरेसा पाला तयार झाला. कोल्हापूर येथून ५० अंडीपुंज आणले. शेडमध्ये ७ रॅकवर ते ठेवले. तुतीच्या पाल्याचे आच्छादन करून त्यावर रेशीम किडे ठेवले. त्याचे योग्य पद्धतीने जतन केल्यामुळे ‘ए १’ दर्जाचे ३५ किलो कोष मिळाले. त्यातून ५०० रुपये प्रति किलो या दराने १७ हजार ५०० रुपये मिळाले.

प्रयोग यशस्वी झाल्यामुळे २०० अंडीपुंज आणण्याचे नियोजन करत असल्याचे खामकर यांनी सांगितले. कोकणातील वातावरण रेशीम कोषाला पोषक असले तरी पावसाळ्यामध्ये तुतीच्या पानांचे नुकसान होऊ शकते. पावसानंतर रेशीम कोष टाकल्यास वर्षातून दोन वेळा कोषांचे उत्पादन घेता येईल. २०० अंडीपुंज टाकले, तर ७० हजार रुपये मिळतील. ५० टक्के खर्च धरला बऱ्यापैकी चांगले उत्पन्न मिळू शकेल.

- अमर खामकर, ९३७०१६६९२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com