
विवेक कांबळे
Alternative Farming : महापूर, हिवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस तर उन्हाळ्यात गारपीट यामुळे ऋतुचक्राच्या बदलास प्रभावित करणारी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन पीक लागवड, व्यवस्थापन आणि संरक्षित शेतीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पृथ्वीभोवतालच्या हवेचे तापमान १९५५ सालानंतर ०.५ अंश सेल्सिअसने वाढल्याचे ‘आयपीसीसी’ संस्थेतील शास्त्रज्ञांनी दाखवून दिले.१९९८ साल हे विसाव्या शतकातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे दिसून आले आहे. १९९८ पासून जागतिक तापमान वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड या वायूचे वाढते प्रमाण तापमानवाढीचे मुख्य कारण आहे. अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘एल-निनो’ हे दुसरे कारण आहे.
हवामान बदल
वाढती वाहनांची संख्या, वाढती कारखानदारी, वाढत्या वातानुकूलित यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढत आहे.
जनावरांच्या रवंथ प्रक्रियेमधून मिथेन वायूचे उत्सर्जन वाढत आहे.
भात खाचरात होणारा अतिरिक्त नायट्रोजन खतांचा वापर नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढवत आहे.
कार्बन डायऑक्साईड शोषणारी वने व वनस्पती मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. आशिया खंडातील ६० दशलक्ष हेक्टर जंगल, आफ्रिका खंडातील ५५ दशलक्ष हेक्टर जंगल आणि लॅटीन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. त्यामुळे हवेत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे.
ऋतुचक्रावर परिणाम
मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान कमी राहणे, सरासरीपेक्षा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहणे आणि सरासरीपेक्षा वाऱ्याचा वेग कमी राहणे ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले. ऋतुचक्रावर परिणाम होऊन पावसाळ्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि महापूर, हिवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस तर उन्हाळ्यात गारपीट यामुळे ऋतुचक्राच्या बदलास प्रभावित करणारी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे हंगामातील पीक पद्धती धोक्यात आली आहे.
दुष्काळी क्षेत्राचा विस्तार
जगभर पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महाराष्ट्रात दुष्काळाचे क्षेत्र विस्तारत आहे. १९७२ मध्ये देशात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांतील ८४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले.
१९८६ मध्ये महाराष्ट्रात १४ जिल्हे दुष्काळी, ११४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले.
२००३ मध्ये १४ जिल्हे दुष्काळी, ११८ तालुके दुष्काळग्रस्त होते.
२०१२ मध्ये १८ जिल्हे दुष्काळी आणि १२३ तालुके दुष्काळग्रस्त होते. २०१५ मध्ये २८ जिल्हे दुष्काळी आणि १३६ तालुके दुष्काळग्रस्त ठरले.
दुष्काळाची व्याप्ती एका बाजूस विस्तारत असून दुष्काळी विभाग मराठवाड्याच्या दिशेने विस्तारत आहे.
गारपीटग्रस्त क्षेत्र
गारपीट ही उन्हाळी हंगामातील हवामान बदलाची नांदी असून मराठवाडा आणि विदर्भात २०१४ च्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रचंड गारपिटीने नुकसान झाले. जनावरांची हानी झाली.२०१५ च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट झाली. यातून गारपीटग्रस्त क्षेत्रातील गारपिटीचा कालावधी वाढत आहे. याचे गंभीर परिणाम शेती क्षेत्रावर होत आहेत.
शेतीतील प्रमुख नुकसानीच्या बाबी
पिकांच्या उत्पादकतेत घट होत असून शेती अशाश्वत झाली आहे.
जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामतः दुग्धव्यवसाय अडचणीत आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.
शेतीस अपुरा पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यातून उत्पादकता घटत आहे.
गारपीट आणि अवेळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.
खरिपात दुबार पेरणीची वेळ येत आहे. मोसमी पावसातील अनिश्चिततेमुळे आणि पुरेशा ओलाव्याअभावी रब्बीचे क्षेत्रही कमी होत आहे.
हवामान बदलाचे भविष्यातील परिणाम
सर्वात मोठा हवामान बदलाचा परिणाम शेतीक्षेत्रावर होत असून त्यात सातत्याने या पुढे वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पुढे हे परिणाम गंभीर समस्या निर्माण करतील. विशेषतः कोरडवाहू भागात हे परिणाम आणखी भीषण असतील. त्यातून अत्रसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीमधून शाश्वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेती उत्पादन
शाश्वत करण्यासाठी उपाय
पीक पद्धतीत बदल
कापूस क्षेत्र कमी करून तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करावा.
महाराष्ट्रात कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्यक्षात कापूस पिकाचा कालावधी ७ ते ७.५ महिन्याचा तर मॉन्सूनचा कालावधी ४ महिन्यांचा असल्याने पाऊसमान आणि कपाशीचा कालावधी जुळत नसल्याने कपाशीच्या क्षेत्रात होणारी वाढही गंभीर समस्या निर्माण करीत आहे.
कपाशीचे ९४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कपाशी वाढीच्या काळात गरजेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने कपाशीची महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता केवळ २.९३ क्विंटल प्रति हेक्टर आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च अधिक आणि उत्पादकता अतिशय कमी मिळते.तेव्हा कपाशीखालील ४० लाख हेक्टर क्षेत्रांपैकी २० ते ३० लाख हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांची लागवड करून शाश्वत शेती उत्पादन साधण्याची गरज आहे.
जेथे अत्यंत भारी काळ्या जमिनी आहेत तेथे आणि बागायत क्षेत्रात कपाशी लागवड करणे फायदेशीर आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजे आहे. तसेच तूर, घेवडा, मका, मिरची, सोयाबीन या पिकांचे अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
रुंद वरंबा व सरी पद्धत
मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय म्हणून रुंद वरंबा आणि सरी पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे. सोयाबीन व घेवडा या पिकांची पेरणी रुंद वरंब्यावर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.
रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे तयार करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याचा आकार ठेवावा.
वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड व पाट टाकल्यास कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात. पावसाचे पाणी वाफ्यात मुरते. योग्य ओलीवर पेरणी केल्यास पुन्हा होणाऱ्या पावसाचे पाणी वाफ्यात मुरते.त्यामुळे हेक्टरी ३० टक्के उत्पादन वाढते. मुलस्थानी जलसंधारणाची पद्धत रब्बी ज्वारीसाठी वापरणे आवश्यक आहे.
बागायत क्षेत्रात गव्हाचे क्षेत्र कमी करून बागायत रब्बी ज्वारीची पेरणी करून पीक पद्धतीत बदल करावा.
जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यातच थंडीचा चांगला कालावधी मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी केल्यास आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात थंडी न मिळाल्यास गव्हाची उत्पादकता कमी होते. शिवाय पीक गारपिटीत सापडते. त्याऐवजी ऑक्टोबर महिन्यातच बागायत रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी ज्वारीचे पीक निघते.
हरभरा पिकाखाली क्षेत्रात वाढ करणे
हरभरा हे कमी पावसावर व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. दोन पाणी उपलब्ध असतील तेथे बागायत हरभऱ्याची लागवड करावी. तर कोरडवाहू हरभऱ्याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. त्या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी मुरेल आणि पीक उत्पादकता वाढेल.
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब
ठिबक सिंचन वापरल्यास ५० टक्के पाणी वापरात बचत होते. त्यामुळे सध्याच्या बागायत क्षेत्रात दुप्पटीने वाढ करणे शक्य आहे. त्यासाठी बंद पाइपने पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात द्रवरूप खते दिल्याने अधिक व चांगल्या प्रतीचे सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य आहे.
संरक्षित शेतीचा अवलंब
पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, टोमॅटो इत्यादी पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. प्रत्येक शेतकऱ्याने कमीतकमी १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊसची उभारणी करून ठिबकद्वारे पाणीपुरवठा व द्रवरूप खते देऊन उत्तम प्रतीचा शेतीमाल तयार करून उत्पादन आणि उत्पादकता वाढवावी.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब
एकपीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची आहे. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन बोनस मिळते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (२:१), सोयाबीन + तूर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते.
बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + फ्लॉवर किंवा कोबी लागवड करावी.
आच्छादनांचा वापर
कोरडवाहू क्षेत्रात आच्छादनांचा वापर करून बाष्पीभवनाचा वेग रोखता येणे शक्य आहे. उन्हाळी हंगामात फळबागांमध्ये आच्छादन गरजेचे आहे.
प्रकाश परिवर्तकांचा वापर
केओलीनची ८ टक्के फवारणी करून प्रकाश परिवर्तन करून बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. फळपिकांसाठी पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत वापरावी.
- विवेक कांबळे, ९६३७३१३७५४ (पर्यावरण तज्ञ, विभागीय अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.