
Jalgaon Cotton : जिल्ह्यात अवैध कापूस बियाणे दाखल होताच त्यासंबंधी कृषी विभागाने कारवाईसत्र सुरू केले आहे. चोपडा तालुक्यात दोन कारवाया झाल्या असून, विक्रीची परवानगी नसलेले एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले. पहिली कारवाई चुंचाळे (ता. चोपडा) येथे झाली. दुसरी कारवाई तावसे (ता. चोपडा) येथे झाली आहे.
तावसे येथे कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे ११ लाख ७२ हजार रुपयांचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्क, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले.
जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. कुरवेल (ता. चोपडा) येथे नदी किनारी तावसे शिवारातील आंब्याचा शेतात बनावट कापूस बियाणे लपवून विक्री केले जात असे समजले होते. त्यानुसार विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उल्हास ठाकूर (नाशिक), कृषी सहाय्यक सदाशिव बारेला, किरण गोसावी कृषी सहाय्यक, पोलिस पाटील अर्चना पाटील (तावसे) कृषी अधिकारी किरण पाटील, चेतन महाजन, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश पाटील या पथकाने तावसे येथील संशयित आरोपी जीवनलाल चौधरी यांच्या तावसे बुद्रूक हादीतील आंब्याच्या बागेत तपासणी केली. त्यात एका आंब्याच्या झाडाखाली गावातने झाकून ठेवले अनधिकृत, एचटीबीटी कापसाचे योद्धा व सिल्वर आर असे अशी नावे असलेली ८५० पाकिटे सापडली. त्याची किंमत ११ लाख ७२ हजार रुपये एवढी आहे. साठा जप्त केला असून बियाणे कायदा,बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथेही भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे 18 लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त झाले आहे. जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई झाली. पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुलखेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे पकडले. १२७३ एवढी ही अवैध बियाण्याची पाकिटे आहेत. त्याची किंमत अंदाजे १७ लाख ८२ हजार २०० रुपये आहे. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.