Nashik News : मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेली जिल्हा बॅंक वसुलीसाठी अॅक्शन मोडवर आली आहे. बड्या थकबाकीदारांच्या जप्त स्थावर मालमत्तांच्या सात-बारा उताऱ्यावर संस्था-बँकेचे नाव लावण्यासाठी बँक सरसावली आहे.
बॅंकेच्या ४८९ पैकी १५० थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तांच्या सात-बारा उताऱ्यावर संस्थेचे नाव लावण्यात आले आहे. उर्वरित ३३९ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर संस्थेचे नावे लावण्यासाठी बॅंक प्रशासनाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
गत पाच ते सहा वर्षांपासून कर्जमाफी योजनांच्या अंमलबजावणीमुळे व नैसर्गिक आपत्ती जसे, अतिवृष्टी व गारपीट यामुळे बँकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात बँकेचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढले आहे.
अनेक कर्जदारांनी दोन लाखांवरील कर्जमाफी जाहीर होईल, या अपेक्षेने बँकेचे कर्ज थकविले आहे. त्यामुळे बँकेच्या शेती कर्जाची थकबाकी १५२४ कोटी झाली आहे. या थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम बँकेचा तोटावाढीवर होत आहे.
यामुळे बँकेची उपलब्ध लिक्विडिटी प्रमाण कमी होत चालल्याने ठेवीदारांना मागणी करूनही ठेवी देता येणे शक्य होत नाही. ठेवी मिळत नसल्याने ठेवीदारांनी देखील बँकेत ठेवी ठेवणे कमी केले आहे.
परिणामी, बँकेच्या बँकिंग सेवांवर परिणाम होत असून, ठेवीदारांचा बँकेविरोधात रोष वाढत आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचा एनपीए १,३३६ कोटी आहे. त्यामुळे बँकेस ९०९.३४ कोटी संचित तोटा सहन करावा लागला आहे. सद्यःस्थितीत एनपीएचे प्रमाण ७१ टक्के आहे.
त्यामुळे ‘नाबार्ड’चे सवलतीचे पाच टक्के व्याजाचे कर्ज उचलण्यास बॅंक पात्र नाही. पर्यायाने बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ९.५० टक्के दराचे चढ्या व्याजाने कर्ज उचलावे लागत आहे. पर्यायाने बँकेच्या संचित तोट्यात दरवर्षी वाढ होत आहे. तसेच बँकेत ११ लाख ठेवीदारांच्या ठेवी २०८०.९१ कोटी असून, ठेवीदारांना ठेवी परत देण्यास अडचण येत आहे.
या परिस्थितीचा विचार करता बँकेची थकित कर्जवसुली आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनंतर ४८९ पैकी फक्त १५० थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या सात-बारावर संस्थेचे/बँकेचे नाव लावले गेले आहे.
तालुकानिहाय थकबाकीदार
तालुका सभासद रक्कम सात-बारावर नाव लावलेले सभासद नावे लागणे शिल्लक सभासद
दिंडोरी - - - -
निफाड ३३ २.७३ कोटी १४ १९
मालेगाव १३६ ६.६४ कोटी १७ ११९
येवला ५१ ४.२१ कोटी १२ ३९
सटाणा ११ .५३.११ लाख ११ -
कळवण ४० २.३५ कोटी - ४०
सिन्नर ४४ २.४२ कोटी ४२ २
चांदवड १९ १.३८ कोटी १ १८
नांदगाव ३ ४.२९ लाख - ३
नाशिक - - - -
देवळा १२५ ६.६८ कोटी ४७ ७८
त्र्यंबकेश्वर ९ ७९ लाख ३ ६
इगतपुरी १८ ९१.९७ लाख ३ १८
पेठ - - - -
सुरगाणा - - - -
एकूण ४८९ २८.७३ कोटी १५० ३३९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.