
राहुल वडघुले
द्राक्ष पिकामध्ये मुख्यत: फुलकिडे, मिलीबग, स्टेम बोरर, तुडतुडे, अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणाबाबत पुरेशी माहिती बागायतदारांकडे उपलब्ध आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून द्राक्ष पिकात ‘काजळी’ ही नवीन समस्या दिसून येत आहे. काही ठिकाणी या प्रकाराला ‘मिलिबग’ समजून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र ही समस्या मावा किडीच्या प्रादुर्भावामुळे दिसून येते. यामध्ये द्राक्ष मण्यांवर काळ्या बुरशीची वाढ होते. त्या विषयी आजच्या लेखात माहिती घेऊ.
किडीची माहिती
किडीचे नाव ः मावा (Aphids)
किडीचा प्रकार ः रस शोषक कीड
किडीच्या अवस्था ः पंख असलेले प्रौढ, पंख नसलेले प्रौढ, पिल्ले (Nymph)
नुकसानकारक अवस्था ः प्रौढ आणि पिल्ले
प्रादुर्भाव ः द्राक्ष मणी
नुकसान ः या किडीमुळे जास्त नुकसान होत नाही. परंतु भविष्यात ही मुख्य किडी होऊ शकते.
जीवनक्रम
या किडीच्या तीन अवस्था दिसून येतात. याला अपूर्ण रूपबदल (incomplete Metamorphosis) असे म्हणतात. यामध्ये पंख असलेले प्रौढ, पंख नसलेले प्रौढ, अंडी आणि पिल्ले या अवस्था असतात.
ही कीड अंडी घालते किंवा थेट पिल्लांना जन्म देखील देते.
प्रौढ : प्रौढ हे पंख असलेले किंवा पंख नसलेले असतात. जेव्हा कीड एकाच पिकावर असते. त्यावेळी पंख नसलेले प्रौढ असतात. त्या पिकावरील अन्न संपल्यानंतर पंख असलेली अवस्था निर्माण होऊन कीड एका पिकावरून दुसऱ्या पिकावर जाते.
अंडी : प्रतिकूल परिस्थितीमध्ये नर आणि मादी यांचे मिलन होऊन अंडी दिली जातात. ही अंडी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहतात.
पिले : अंड्यातून पिले ही बाहेर निघतात किंवा प्रौढ थेट पिल्लांना जन्म देतात. पिले दिसायला प्रौढ किडी सारखीच असतात.
लक्षणे
प्रादुर्भावाची लक्षणे द्राक्ष मणी ८ ते १० मिमी आकाराचे असताना दिसू लागतात. मण्यांवर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात.
मण्यास हाताने स्पर्श केल्यास हाताला चिकटपणा जाणवतो. त्या ठिकाणी लहान मावा कीड दिसते.
प्रादुर्भावाच्या जागी साखरेचा सारखा स्राव दिसून येतो. त्यावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे हा बुरशीजन्य रोग असल्याचे समजून बुरशीनाशकांचा वापर बागायतदारांकडून केला जातो.
प्रभावित द्राक्ष वाण
सध्या लांब जातीच्या द्राक्ष वाणांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये सोनाका, सुपर सोनाका, एस.एस.एन., आरके या वाणांचा समावेश जास्त आहे.
नुकसान
प्रौढ आणि पिले द्राक्ष मण्यातील रस शोषण करतात. रसशोषण करताना साखरे सारखा गोड चिकट द्रव शरीराच्या बाहेर टाकतात. त्यावर काळ्या रंगाची बुरशी वाढते. ही बुरशी वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा आणते.
नुकसानीचा कालावधी ः मणी ८ ते १० मिमी आकाराचे झाल्यानंतर.
नियंत्रणाचे उपाय
नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.
ही कीड एकाच वेळी सर्व बागेत दिसत नाही. म्हणून ज्या ठिकाणी दिसेल तिथे स्पॉट ॲप्लिकेशन करून कीड नियंत्रण करावे.
पाण्यात स्टीकर मिसळून उच्च दाबावर फवारणी करावी.
‘क्रिपटोलीमस मोन्ट्रोझेरी’ (Cryptolaemus montrouzieri) या भुंगेऱ्यांचा बागेत वापर करावा.
बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझीयम या सारख्या जैविक कीटकनाशकांचा जमिनीवर फवारणीद्वारे किंवा शेणखतात मिसळून वापर करावा.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील (पुणे) तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ओळख
काळ्या रंगाची बुरशी
द्राक्ष मण्यांवर दिसून येणाऱ्या काळ्या बुरशीच्या वाढीस ‘सुटी मोल्ड’ (Sooty Mold) असे म्हणतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी असू शकतात. जसे की ॲस्परजीलस, अल्टरनेरीया इत्यादी. ही बुरशी द्राक्ष पिकास जास्त नुकसान पोचवत नाही. या बुरशीमुळे फक्त प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येऊ शकते.
मावा कीड
ही अत्यंत लहान आकाराची कीड असते.
किडीचे प्रौढ काळ्या रंगाचे, तर पिल्ले पिवळसर काळ्या रंगाचे असतात.
किडीला सहा पाय असतात. पोटाच्या शेवटी दोन टोके असून त्याला Cornicles असे म्हणतात. याचा उपयोग किडीला स्व-संरक्षणासाठी होतो.
तोंड टोकदार सोंडेसारखे असते. या सोंडेद्वारे मावा कीड वनस्पतीमधून रस शोषण करते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.