Agriculture Department : कृषी आयुक्त गेडाम यांची तडकाफडकी बदली

Agriculture Commissioner Transfer : राज्याचे धडाकेबाज कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची ऐन खरिपात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे.
Dr. Pravin Gedam
Dr. Pravin GedamAgrowon

Pune News : राज्याचे धडाकेबाज कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची ऐन खरिपात तडाकाफडकी बदली करण्यात आली आहे. कृषी खात्यातील सोनेरी टोळीकडून ३०० कोटींच्या कृषी निविष्ठा खरेदीला डॉ. गेडाम यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा राज्यभर आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी डॉ. गेडाम यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (ता.३१) सकाळी जारी केले. ‘‘नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिक्तपदी आता आपली बदली करण्यात आली आहे. प्रधान सचिवांच्या सल्ल्याने तुम्ही इतर अधिकाऱ्याकडे कृषी आयुक्तपदाचा कार्यभार सोपवावा व बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे,’’ असे या आदेशात नमूद करण्यात आले होते.

कृषी आयुक्तालयात डॉ. गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश येताच अधिकाऱ्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे आयुक्तालयातील प्रक्रिया संचालक सुभाष नागरे व आत्मा संचालक दशरथ तांभाळे यांच्या निवृत्ती सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. बदलीचे आदेश मिळताच डॉ. गेडाम तत्काळ नाशिकला रवाना झाले. आयुक्तांच्या तडकाफडकी बदलीने आयुक्तालयासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खळबळ माजली.

Dr. Pravin Gedam
Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

गेल्या काही दिवसांपासून डॉ. गेडाम प्रत्यक्ष शेतशिवारांना भेटी देत कृषी विभागाच्या योजनांना गती देण्याचा प्रयत्न करीत होते. कृषी योजनांचा त्यांनी बारकाईने अभ्यास चालू केला होता. कृषी विभागाच्या कामकाजाला गती देण्यासाठी एक वेगळी प्रणाली ते विकसित करीत होते. या प्रणालीला लागू होण्यापूर्वीच ‘गेडाम पॅटर्न’ म्हणून ओळखले जात होते.

आयुक्तांच्या बदलीस अलीकडेच राज्यभर गाजत असलेले ३०० कोटींचे निविष्ठा खरेदी प्रकरण कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. निविष्ठा खरेदीत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीचे (डीबीटी) नियम डावलले जात आहेत. याच प्रकरणात ऐन मार्चएन्डमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी घाईघाईने वळवला गेला. मात्र, या प्रकरणात डॉ. गेडाम यांच्याकडून वारंवार काही आक्षेप उपस्थित केले जात होते.

Dr. Pravin Gedam
Agriculture Commissioner : कृषी आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचा समस्यांचा पाढा

कृषी खात्यातील काही अधिकारी, कृषिउद्योग महामंडळ व मंत्रालयातील काही अधिकारी यांच्या संगनमताने निविष्ठा खरेदीचे प्रकरण शिजत असल्याचे बोलले जात होते. यातील गैरप्रकाराला कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व डॉ. गेडाम यांच्याकडून विरोध सुरू होता. परिणामी पहिल्या टप्प्यात अनूप कुमार यांची बदली झाली, असे सांगितले जात होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात डॉ. गेडाम यांची बदली होणार, असे बोलले जात होते. विशेष म्हणजे कृषिउद्योग महामंडळाच्या ठेकेदारांमध्ये गेल्या एक आठवड्यापासून डॉ. गेडाम यांच्या बदलीची चर्चा सुरू होती.

कृषी खाते आयुक्ताविना

राज्य सरकारने ऐन खरिपात कृषी आयुक्तपदावरून डॉ. गेडाम यांच्या बदलीचे आदेश का दिले, राज्याला नवा आयुक्त का दिला नाही, असे सवाल अधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. कृषी खात्याला पूर्णवेळ सचिव व आयुक्त नसल्यामुळे कृषी विभागाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com