
Sustainable Farming : या वर्षी भारतीय हवामान विभागाने मॉन्सून हंगामात नैर्ऋत्य मॉन्सूनच्या पावसाचे लवकर आगमन आणि सामान्यापेक्षा जास्त पाऊस (१०५ टक्के) पडण्याचा अंदाज दिलेला आहे. भारताच्या वार्षिक पर्जन्य सरासरीच्या ७० टक्के पाऊस नैर्ऋत्य मॉन्सूनमुळेच मिळत असल्यामुळे तो कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरतो.
चार महिन्यांच्या पावसाळ्यात वेळेवर पावसाचे आगमन, प्रगती आणि वितरण हे खरीप पिकांच्या उत्पादकतेसाठी महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर पावसावर आधारित शेतीमध्ये पीक उत्पादन सुरक्षित करण्यासाठी माती ओलाव्याचे प्रभावी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा साठवण आणि कार्यक्षम वापर, आंतर पीक-पद्धतीचा अवलंब या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
१. मातीतील ओलाव्याचे प्रभावी व्यवस्थापन
- कोरडवाहू शेतीमध्ये आपली माती दुष्काळ-प्रतिरोधक बनवण्याची गरज असते. मातीमध्ये दुष्काळ-प्रतिरोधकता आणण्यासाठी जमिनीची योग्य रीतीने बांधणी करावी. शेतात पडणारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी मातीमध्ये मुरवावे. आपल्या संभाव्य पिकांच्या वापरासाठी आवश्यक तितके पावसाचे पाणी मातीत साठवण्याचा प्रयत्न करावा.
हे मातीत साठवलेले पाणी पिकांसाठी कार्यक्षमपणे कसे वापरता येईल. हेच जमिनीतील पाणी मुळाद्वारे शोषून पीक स्वतःच्या वाढीसाठी वापरत असते. त्यामुळे पीक उत्पादनातील चढ-उतार सहसा पावसाच्या अपुरेपणाशी जोडले जातात. मात्र ही बाब पावसाच्या अपुरेपणापेक्षाही मातीतील ओलाव्याच्या कमतरतेशी जास्त संबंधित आहे. ही बाब सर्वांना समजून घ्यावी.
- जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी मातीमध्ये झिरपते, मुरते. शेतातील माती हे पाणी साठवण्याचे कार्य करते. जमिनीची खोली,पोत, संरचना, पाणी मुरण्याचा दर, वनस्पतीच्या मळांची खोली आणि मातीची जलधारणक्षमता या कारणाने मातीची पाणी साठवण क्षमता प्रभावित होते. मातीत सेंद्रिय कार्बन वाढविल्यास तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीव यांनी समृद्ध असलेली निरोगी माती स्पंजासारखी कार्य करते. ती वनस्पतींसाठी ओलावा शोषून टिकवून ठेवते. हे राखून ठेवलेले पाणी गरजेनुसार वनस्पतींसाठी मुक्त करते.
म्हणून पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये माती ओलावा व्यवस्थापन, त्यातही हिरव्या पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये दुष्काळ-प्रतिरोधकता आणण्यासाठी विविध पीक, माती आणि जल व्यवस्थापन पद्धतींचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा.
२. पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर
- जमिनीत किंवा मातीत पाणी साठवून ठेवण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी शेततळे असावे, या शेत तलावामध्ये पावसाचे पाणी वळवून साठवावे. खरीप हंगामात बऱ्याचदा मॉन्सूनमध्ये एक किंवा दोन वेळा १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीचे खंड पडतात. अशा ताणाच्या स्थितीमध्ये मातीतील उपलब्ध ओलावा पिकांसाठी पुरेसा ठरत नाही.
अशा काळात तळ्यात साठवलेल्या पाण्याचा वापर करता येतो. या पाण्याचाही कार्यक्षम वापर करण्यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्था जाणून घ्याव्यात. हे प्रमाण पीक पाणी आवश्यकतेच्या जवळ आणण्यासाठी भूजल (विहिर) किंवा शेत तलावामध्ये जतन केलेल्या पाण्याचा वापर पावसाच्या कोरड कालावधीत करावा. पिकांच्या संवेदनशील वाढीच्या (फुलोरा, दाणे भरणे) अवस्थेत पाण्याचा कार्यक्षमपणे वापर केल्यास उत्पादनातील तूट कमीत कमी राखणे शक्य होते.
- पावसाचे वाहून जाणारे पाणी गोळा करण्याच्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ असे म्हणतात. स्वतःचे घर, शेतातील हरितगृहाचे पाणी यांचा वापर विविध कारणांसाठी करता येतो. घरावरील पाणी साठवल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होते. शेतातील पाणी व्यवस्थित गाळल्यानंतर बोअरवेल किंवा विहिरीमध्ये पुनर्भरण करावे.
याचे फायदे पुढील प्रमाणे...
- प्रति युनिट पीक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धता वाढते. अतिरिक्त पाण्याचा निचरा झाल्याचाही फायदा शेतातील पिकांना होतो.
- भूजलाचे प्रभावीपणे पुनर्भरण होते.
- दुष्काळाचा प्रभाव कमी होतो.
३. विविध आंतर पीक-पद्धतीचा अवलंब
शेतीयोग्य जमीन मर्यादित आहे. शेत जमिनीची वापरक्षमता सुधारण्यासाठी आंतरपीक ही सर्वांत महत्त्वाची पद्धत आहे. जमिनीमध्ये एकाच वेळी (ओळीत आणि पट्ट्यामध्ये) एकापेक्षा जास्त पिकांची लागवड करून उत्पादन प्रणाली घेतल्यामुळे शेतकऱ्यांची जोखीम कमी होते. एका पिकाचे नुकसान झाले तर दुसऱ्या पिकातून फायदा मिळू शकतो. आंतरपीक पद्धतींमध्ये एकापेक्षा जास्त पिकांचा समावेश केला जात असल्यामुळे जैव विविधतेत वाढ होते. वाढीव जैव विविधतेमुळे उत्पादनक्षमता, नफा आणि पर्यावरण कामगिरी यांच्यात संतुलन प्राप्त होते. कृषी- परिसंस्थाची कार्यक्षमता आणि लवचिकता वाढते.
आंतरपीक पद्धतीमध्ये पिकांच्या योग्य वाणाची निवड, पिकांच्या ओळी आणि पट्ट्याचे योग्य प्रमाण आणि झाडांची संख्या (म्हणजे पीक लागवड घनता) योग्य ठेवली पाहिजे. त्यामुळे एकाच शेताची उत्पादनक्षमता किंवा जमीन समतुल्य गुणोत्तर वाढण्यात मदत होते. मध्यम ते भारी खोल जमिनीत आंतर पिकांची पेरणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने करावी.
एक पीक प्रणालीच्या तुलनेत आंतरपीक प्रणालीचे फायदे
जागतिक पातळीवर झालेल्या विविध संशोधनातून मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणासाठी सुमारे १२६ अभ्यासातून ९३९ आंतरपीक-प्रणालीची निरीक्षणे विचारात घेतली गेली (संदर्भ : मार्क-ओलिव्हर मार्टिन-ग्वे आणि सहकारी, २०१८). त्यांनी नोंदवलेले आंतर पीक-प्रणालीचे फायदे खालीलप्रमाणे...
• आंतरपीक-प्रणालीचा जागतिक जमीन समतुल्य गुणोत्तर (LER) १.३० होता.
• आंतरपीक-प्रणालीने ३८% अधिक ऊर्जा निर्मिती होते.
• आंतरपीक-प्रणालीमध्ये एकूण उत्पादन ३३ टक्क्यांनी वाढते.
• आंतरपीक-प्रणालीने पोषक घटकांचे शोषण सुधारले.
• आंतरपीक-प्रणाली मध्ये प्रकाश वापर कार्यक्षमता सुधारते.
• ओलावा उपलब्धता संबंधित तणावपूर्ण आणि अ-तणावपूर्ण-दोन्ही अंतर्गत आंतरपीक-प्रणाली फायदेशीर राहते.
आंतरपीक पद्धतींमुळे पाणी वापर कार्यक्षमता वाढते.
अर्ध-शुष्क भागात पावसावर आधारित शेती स्थिरतेला पाणी कमतरतेमुळे धोका असतो. परंतु पट्टा-आंतरपीक-पद्धती हा धोका कमी करण्यासाठी रणनीती म्हणून उपयोगी ठरू शकते. पट्टा-आंतर पीक-प्रणालीमुळे मातीच्या मुळा-क्षेत्रात पाण्याचे स्थानिक वितरण वाढवते, आंतरपिकांच्या सहवाढीच्या काळात मातीतील पाण्याचे हिस्सा वाटप समन्वय सुधारते. जमिनीत उपलब्ध पाण्याचे भरपाई प्रभाव मिळवते.
उदा. वाटाणा-मका पट्टा आंतरपीक प्रणालीत वाटाणा आंतरपिकाने मुख्यत्वे मातीच्या २० सें.मी. थरांतील पाणी वापरले, तर मका आंतरपीक शेजारच्या वाटाणा पट्ट्याच्या खोल थरांमधून पाणी शोषण्यास सक्षम होते. लवकर परिपक्व होणाऱ्या वाटाणा पिकाच्या कापणीनंतर मका पीक वाटाण्याच्या रिकाम्या झालेल्या पट्ट्यातून पाणी मिळवते. त्यामुळे २५ टक्के जास्त धान्य उत्पादन आणि २४ टक्कायांनी पाणी वापर कार्यक्षमता वाढल्याचे चेन आणि सहकाऱ्यांनी २०१८ प्रकाशित केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
बदलत्या हवामानामध्ये पाऊसमान सातत्याने कमी अधिक होत आहे. अशा स्थितीमध्ये पाण्याची उपलब्धता हेच मोठे संकट ठरणार आहे. अशा वेळी त्याचे निवारण करण्यासाठी काय करता येईल?
- मातीत सेंद्रिय कार्बन वाढवून अधिक ओलावा धारणा करून,
- पावसाचे पाणी विविध प्रकारे साठवून आणि पाण्याचा अतिशय कार्यक्षम वापर करून,
- सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करून,
- चांगल्या शेती पद्धतीकडे वळून/चांगल्या शेती पद्धतींचा वापर करून,
- पाणी कार्यक्षम पिकांसाठी (ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी, राळा/वरई यासारखी) पाण्याचा कार्यक्षम वापर करणारी पिके लावणे.
- जास्त पाणी लागणारी पिके (उदा. तांदूळ, ऊस किंवा अगदी केळी देखील) कमीत कमी घेऊन.
डॉ. गोविंद स. जाधव, ९८९०९५४२३१
(माजी संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.