Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी(ता. २०) गंगापूर धरणावर धडकले. या वेळी त्यांनी धरण परिसराच्या प्रतिबंधित क्षेत्रात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विविध संघटना व राजकीय पक्ष जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात आक्रमक झाले आहेत. जायकवाडीत नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गोदावरी धरण समूहातून पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र त्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे.
याप्रश्नी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. त्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे आदेशाचे पालन होत नसल्याची भूमिका घेत मराठवाड्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या देत गंगापूर धरणावर राज्य शासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली.
गंगापूर धरणाचा परिसर प्रतिबंधित असल्याने येथे ठिय्या दिल्यानंतर प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या वेळी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी पोलिस यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत त्यांना निवेदन दिले.
आंदोलकांशी चर्चा करत न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाहीचे आश्वासन शहाणे यांनी दिले. या वेळी परभणीचे आप जिल्हा समन्वयक सतीश चकोर, सोपान बोबडे, पांडुरंग बोबडे, प्रल्हाद वैद्य, शोभा गायकवाड, संभाजीनगर येथील अभिषेक पंडित, साईनाथ साळवे आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.