वृक्ष होता येत नाही वारशाने...

एकदा एका गावामधे दुष्काळ पडला. पाण्यावाचून सर्व पिके जळून गेली. गावकरी हवालदिल झाले व प्रार्थना करू लागले. कुणी उपासतापास तर कुणी नवस बोलू लागले. मात्र एक शेतकरी सकाळी उठून रोज शेतात जात असे व नांगरणी करे.
Banyan Tree
Banyan TreeAgrowon

सुनिता रामचंद्र

एकदा एका गावामधे दुष्काळ (Drought) पडला. पाण्यावाचून सर्व पिके जळून गेली. गावकरी हवालदिल झाले व प्रार्थना करू लागले. कुणी उपासतापास तर कुणी नवस बोलू लागले. मात्र एक शेतकरी सकाळी उठून रोज शेतात जात असे व नांगरणी करे. त्याचा हा रोजचा दिनक्रम पाहून त्याला गावातले लोक हसत व कुचेष्टेने म्हणत "या नांगरणीचा काय उपयोग पाऊस (Rainfall) नाही तर. त्यापेक्षा देवाची करूणा भाक.

तो प्रसन्न झाला तर पाऊस तरी पडेल." तो काही न बोलता शांतपणे त्यांना म्हणत "माझे कर्म हीच माझी प्रार्थना आहे." गावकऱ्यांना त्याच्या या बोलण्याचा अर्थ कळत नसे. काही दिवसांनी गावात भरपूर पाऊस पडला. गावकरी आनंदले. पण थोड्या दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की त्या शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आलेलं आहे. त्या क्षणाला त्यांना शेतकऱ्याच्या त्या वाक्याचा अर्थ उमगला कारण त्याने आपली जमीन नांगरून ठेवल्याने तिची मशागत झाली होती. अशा मातीत शेतकऱ्याने पेरणी करताच शेतात भरभरून पीक आलं होतं.

Banyan Tree
Crop Loan : भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह

गावकऱ्यांना आपली चूक कळली की आपण केवळ पुजापाठ आणि उपासतापास करत बसलो पण कर्म केले नाही म्हणून आपल्यावर ही वेळ आली आहे. शेतकऱ्याने आपल्या कृतीतून कर्म आणि प्रार्थना वेगळे नसून एकाच तत्वाची वेगळी रूपं आहेत हे दाखवून दिले होते.

Banyan Tree
Netharland Farmers : जगभरात शेतकऱ्यांची अवस्था बिकट का आहे ?

मला वाटतं हीच गोष्ट आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. हल्ली आपल्याकडे, वडिलांनी संपत्ती कमवून ठेवायची व मुलांनी कष्ट न करता बसून खायचं किंवा मजा मारायची ही मानसिकता दिसत आहे. शिवाय यावर बोललं तर काही पालक म्हणतात, "आम्हाला मिळालं नाही, आहे त्यांच्या नशिबात तर करू देत मजा." मात्र याचा भविष्यात परिणाम म्हणजे मुलांना आरामदायी आयुष्य हवं तर असतं पण त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची मानसिकता उरत नाही. यात त्यांचा दोष नसून याचा आपणच त्यांच्यावर श्रमाचा संस्कार पेरण्यात अथवा कर्म हाच जीवनाचा पाया आहे हे बिंबवण्यात कमी पडलेलो असतो. यावरून एका शेराची आठवण होते.

गाडले आहे बीजाने बघ स्वतःला

वृक्ष होता येत नाही वारशाने

निसर्गाचा हाच नियम आपल्यालाही लागू पडतो. कारण वारशाने केवळ नाव, संपत्ती मिळू शकेल पण आत्मविश्वास कधीच मिळू शकत नाही. आणि आत्मविश्वास नसेल तर आत्मसन्मान कुठून येणार आणि आत्मसन्मान नसेल तर त्या जगण्याला जगणे तरी कसे म्हणावे! म्हणूनच कर्माला सगळ्यात जास्त महत्व देण्याची शिकवण आपल्याला रूजवता आली पाहिजे. ज्यामुळे कुठलेही कर्म श्रेष्ठ किंवा निकृष्ट न वाटता प्रामाणिकपणे केलेले कुठल्याही कामाचा आदर करण्याची भावना निर्माण होईल.

याची सुरुवात ही लहानपणापासूनच व्हायला हवी. परंतु आपण बघतो की अनेक घरांत आजही मुलांना दैववादावर भरवसा ठेवून नको तितक्या कर्मकांडात अडकवले जाते. खरं तर आपल्या मुलाला भविष्याची स्वप्ने देताना त्यानुसार कार्य करण्याची प्रेरणा आपल्या कृतीतून पालकांना देता यायला हवी. ईश्वरपर्यंत जाण्याचा मार्ग दैववादातून नाही तर कर्मातूनच जातो अशी शिकवण द्यायला हवी.

या निमित्ताने मला लहानपणी ऐकलेली एक पुराणकथा आठवते. एकदा नारद विष्णूकडे जातात व विचारतात, "तुम्हाला सर्वात जास्त कोणता भक्त प्रिय आहे?" विष्णू म्हणतात, "पृथ्वीवरील एका गावात एक शेतकरी राहतो. तो मला सर्वात प्रिय आहे. नारदाला आश्चर्य वाटतं. ते विचारतात ‘‘कसं काय?’’ "विष्णू त्याला तिकडे जायला सांगतात. नारद तिथे जातात व बघतात तर तो शेतकरी सकाळी व संध्याकाळी डोळे मिटून क्षणभर हात जोडतो व दिवसभर शेतीची कामे करतो.

नारद परत जातात व नाराज होऊन विष्णूला म्हणतात, "मी दिवसरात्र तुमचे नामस्मरण करतो आणि तो तर तुमचे नावही घेत नाही. फक्त सकाळ संध्याकाळ डोळे मिटून काहीतरी पुटपुटतो तरी तो तुम्हाला प्रिय कसा?" विष्णू हसून म्हणतात, "कारण त्याचे काम हिच त्याची प्रार्थना आहे. त्याने शेत पिकवलं नाही तर माणसे काय खाणार? त्याचे कर्म हिच त्याची प्रार्थना आहे म्हणून भले तो माझे नाव न घेवो पण तोच मला अत्यंत प्रिय आहे."

थोडक्यात काय तर ईश्वराला प्रिय असणारी अशी माणसेच आपल्या कर्मातून आणि प्रार्थनेतून वैश्विक होत जातात. त्यांच्या कृतीला अन् प्रार्थनेला कृतज्ञतेचा सुगंध येवू लागतो. माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी,’ या ओळींप्रमाणे ते आकाशाप्रमाणे विशाल होत जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com