Water Scarcity : भीषण पाणीटंचाईचे राज्यावर सावट

Water Crisis : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नागरिकांकडून मागणीही वाढली आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Pune News : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नागरिकांकडून मागणीही वाढली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी झाली आहे. सध्या राज्यातील १७ हून अधिक धरणांनी तळ गाठला आहे. येत्या काळात या संख्या वाढणार आहे. मराठवाड्यातील ९२० धरणांत केवळ २८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे राज्यावर भीषण टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचे परिणाम जानेवारी महिन्यापासून दिसू लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच जानेवारीतच धरणांतील पाणीपातळी कमी झाली आहे. यामध्ये शून्य टक्क्याहून कमी झालेल्या धरणांची संख्या १७ आहे. तर एक ते १० टक्क्यांच्या दरम्यान असलेल्या धरणांची संख्या ३७ आहे. येत्या काळात उर्वरित धरणेही कोरडी पडण्याची शक्यता आहे.

Water Shortage
Water Scarcity : खानदेशात टंचाई जाणवू लागली

राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी ७२५.८३ टीएमसी (२०.५५९.३२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात २३ जानेवारीच्या दरम्यान धरणांत ८०६.६६ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी याच काळात ७२.७० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत जवळपास २१.७० टक्क्यांनी पाणीसाठा यंदा कमी आहे.

सध्या मराठवाड्यातील धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. एकूण ९२० धरणांत अवघा ७२.०३ टीएमसी म्हणजेच २८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच धरणांत ७५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठी घट झाली असून माजलगाव, रोशनपुरी, हिरडपुरी, मंगरूळ, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना या धरणांत १५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर काही धरणे पूर्णपणे आटली आहेत.

Water Shortage
Water Scarcity : वारणा धरणातील पाणीसाठ्यात चार महिन्यांत ९ टीएमसीने घट

नागपूर विभागातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणी आहे. एकूण ३८३ धरणांत ९५.०६ टीएमसी म्हणजेच ५८.४६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ६८ टक्के पाणी होते. अमरावती विभागातील २६१ धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ६१ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ७६ टक्के पाणी होते.

नाशिक विभागातील ५३७ धरणांत १११ टीएमसी म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या गेल्या वर्षी ७३ टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागातील ७२० धरणांत २७९.७९ टीएमसी म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ७१ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागातील १७३ धरणांत ८६.२९ टीएमसी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ७३ टक्के पाणीसाठा होता.

मोठ्या प्रकल्पांत ५२ टक्के पाणीसाठा :

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ५३७.६७ टीएमसी म्हणजेच सरासरी ५२.३९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ७५.५७ टक्के पाणी होते. त्या तुलनेत यंदा २३.१८ टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे.

यामध्ये नागपूर विभागात सध्या ७१.८३ टीएमसी म्हणजेच ५८ टक्के, अमरावती विभागात ४८.५५ टीएमसी म्हणजेच ५८ टक्के, मराठवाड्यातील धरणांत ५१.३९ टीएमसी म्हणजेच ३२ टक्के, नाशिक विभागात ७४.१२ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के, पुणे विभागात २३४.५१ टीएमसी म्हणजेच ५३ टक्के, कोकण ५७.२४ टीएमसी म्हणजेच ६३ टक्के पाणीसाठा आहे.

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसी)

धरण---एकूण क्षमता---पाणीसाठा---यंदाची टक्केवारी---गेल्या वर्षीची टक्केवारी

उजनी---११७.२१---उणे ६.४०---उणे ११.९४---७५

कोयना---१०५.२४---६४.१९---६४ ---५३

जायकवाडी---१०२.६७---२५.२४---३२---८९

माजलगाव---१०.९८---०.६६---६---८८

मांजरा---६.२५---०.८७---१४---९३

निम्न दुधना---८.५४---१.२२---१४---४९

बेंबळा---६.४९---२.६०---४० ---४४

मुळा---२१.५०---१०.९८---५१---९८

तळ गाठलेली धरणे :

उजनी, लोणावळा, खडकपूर्णा, सीना कोळगाव, शिसरमार्ग, किल्लारी, बोरगाव अंजनपूर, विसापूर, कुंडली, टेमघर, कासारसाई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, वडज, चिल्हेवाडी, राजेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com