(डॉ. आनंद नाडकर्णी) : आपली स्वप्रतिमा आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. स्वत:चे बोलणे पाहण्याच्या / जोखण्याच्या तीन पातळ्या असतात.
- स्वतःबद्दल विश्वास ः माझे बोलणे नेहमीच योग्य किंवा नेहमीच अयोग्य असे नसते. तर मी कधी बरोबर, कधी चूक असू शकतो. कधी लोकांना पटेल, तर कधी नाही पटणार.
- स्वतःबद्दल अविश्वास ः मी बोलतो ते बरोबर आहे ना? इतरांना ते आवडतंय, पटतंय ना?
- स्वतःबद्दल अतिविश्वास ः माझे सगळे उत्तम आणि योग्यच असते. मी बोलतो तीच आकाशवाणी किंवा ब्रह्मवाक्य!
विश्वास, अविश्वास आणि अतिविश्वास या तीन पातळ्यांवर माणूस स्वत:ला पाहत असतो, स्व-प्रतिमा बनवत असतो. स्वप्रतिमा म्हणजे काय? तर ‘मी कसा आहे / कशी आहे?’ याचे माझ्याच नजरेतले निरीक्षण. या स्वप्रतिमेचे तीन भाग असतात. (आकृती १)
- शारीरिक मी (Physical Self)
- मानसिक मी (Psychological Self)
- सामाजिक मी (Social Self)
शारीरिक मी (Physical Self)
शरीर प्रतिमा म्हणजे माझ्या शरीराची माझ्या मनावर उमटलेली प्रतिमा. मी माझ्या स्वतःच्या शरीराकडे, शारीरिक गुणांकडे कसा पाहतो त्यातून माझी शरीर प्रतिमा तयार होते.
शरीर आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहे, ते आपण निवडलेले नसते. अवयवांची ठेवण (नाकाचा धारदारपणा, डोळ्यांचा रंग) अथवा शारीरिक गुण (उंची, चपळपणा) यातील काही गोष्टी वाडवडिलांकडून आनुवांशिकतेने आलेल्या असतात. आपल्या भवतालच्या सामाजिक दृष्टिकोनाचा, काय चांगले, काय नाही या साऱ्या परिमाणांचा प्रभाव आपण आपली शरीरप्रतिमा कशी जोखतो यावर होतो.
उदा. भारतीय लोकांना गोरा रंग अधिक चांगला, सुंदर वाटतो. एखादी व्यक्ती रंगाने काळी असेल, तर ती स्वत:ला सामान्य रूपाची समजायला लागते. म्हणजे काळा रंग हे झाले शारीरिक वैशिष्ट्य. तर “मी ही अशी काळी, मी थोडीच सुंदर आहे! माझ्याकडे कोण लक्ष देणार! माझी काय छाप पडणार!” ही धारणा म्हणजे त्या व्यक्तीने मनात तयार केलेली शरीरप्रतिमा आहे. शारीरिक गुणवैशिष्ट्ये आपल्याला जन्मजात मिळालेली आहेत; पण शरीरप्रतिमा मात्र आपण आपल्या विचारांनी बनवतो. शरीरवैशिष्ट्ये बदलू शकत नाहीत; परंतु माझी विचारातली शरीरप्रतिमा बदलणे मात्र मला शक्य आहे.
सुदृढ शरीरप्रतिमा जोपासायची तर आपल्या शारीरिक वैशिष्ट्यांचा पूर्ण स्वीकार करायला हवा आणि स्वत:ला सांगायला हवं –
सौंदर्याच्या रूढ व्याख्यांमध्ये आपण बसलोच पाहिजे असे नाही. फक्त शारीरिक अवयव/गुणविशेष कसे आहेत त्यावरून संपूर्ण स्वतःची परीक्षा करू नये. स्वतःला चांगलं वाटण्यासाठी चांगलं राहावं; पण कोणत्याही शारीरिक गुणांच्या आधारे मी कमी अथवा भारी बनत नाही.
इतिहासात आपल्याला सुदृढ शरीरप्रतिमा जोपासणाऱ्या व्यक्तींची अनेक उदाहरणे आढळतात. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तिमत्त्व लौकिकदृष्ट्या आकर्षक नव्हते. त्यांच्या आधीचे पंतप्रधान पंडित नेहरूंप्रमाणे शास्त्रीजी उंच, देखणे नव्हते. मात्र त्यामुळे शास्त्रींच्या आत्मविश्वासात कधी कमतरता आली नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची सुदृढ शरीरप्रतिमा! (आकृती २)
सामाजिक मी (Social Self)
चांगले-वाईट, सुंदर-कुरूप, उच्च-नीच, आर्थिक दर्जा, यश-अपयश यांचे निकष, मोजमाप समाज ठरवत असतो. समाजाच्या या साऱ्या मापदंडात मी स्वत:ला कसा जोखतो? त्यावरून मी माझी जी प्रतिमा बनवतो ती म्हणजे समाजप्रतिमा. सामाजिक निकषांकडे बघण्याचेही तीन प्रकारचे दृष्टिकोन असतात ः
- समाजाने जे मान्य केले आहे तेच मला मान्य.
- समाजाने जे मान्य केले आहे ते मी झुगारून लावणारच.
- समाजाने जे मान्य केले आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्याआधी मी पडताळून पाहीन आणि त्यातील ज्या गोष्टी जाचक/अविवेकी आहेत त्या मी नाकारेन. पण माझा दृष्टिकोन समतोल ठेवून मी ते करेन. त्या जाचक गोष्टींसाठी मी संपूर्ण समाजाला दोषी मानणार नाही. हे करताना माझ्या ध्येयाचे मी भान ठेवीन.
जाचदायक सामाजिक निकष असले तरीही स्वत:ची सुदृढ सामाजिक प्रतिमा कशी जोपासता येते हे समजून घेण्यासाठी आपण जॉर्ज डब्ल्यू. कार्व्हर या प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञाची एक गोष्ट पाहूया.
कार्व्हर हे अमेरिकेतील एक अतिशय हुशार, प्रयोगशील असे कृष्णवर्णीय शेतकरी होते. त्यांचे भुईमुगावरचे संशोधन फार महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त होते. त्या संशोधनाचा फायदा सर्व शेतकऱ्यांना व्हावा अशी त्यांची कळकळ होती. त्यांना समाज वर्णभेदाची वागणूक देत असला, तरी त्यांच्यासाठी शेतकरी गोरा की कृष्णवर्णीय हे महत्त्वाचे नव्हते; तर प्रत्येक शेतकरी हा फक्त एक शेतकरी असे ते मानत. ते ठिकठिकाणी व्याख्यान द्यायला जात असत. असेच एका व्याख्यानासाठी गेले असताना त्यांना कृष्णवर्णीय असल्यामुळे सभास्थानी पाणी दिले गेले नाही. तहान शमविण्यासाठी त्यांना दूरवरच्या एक सार्वजनिक नळावर जाऊन पाणी प्यावे लागले. प्रत्यक्ष ज्ञानी वक्ता म्हणून ज्यांना आमंत्रण आहे, त्यांनी पाणी मात्र बाहेर नळावर जाऊन प्यायचे!
याप्रसंगी कार्व्हर यांनी जो विचार केला त्यातून खूप शिकण्याजोगं आहे. “हा माझा अपमान मला आता सहन करायचा आहे, कारण माझे ध्येय सर्व शेतकऱ्यांची प्रगती हे आहे,” असे ते म्हणाले. म्हणजेच समाजप्रतिमा कधी तोडायची आणि कधी सहन करायची, संघर्ष कुठे करायचा आणि सहमती कुठे निर्माण करायची हा विवेक जपता आला पाहिजे. आपली स्वप्रतिमा सशक्त असेल आणि आपण ABC ट्रॅकवर विचार करत असू तेव्हाच असे वागणे शक्य होते.
मानसिक मी (Psychological Self)
माझ्या मनात येणारे स्वगत / विचार, त्यातून बनलेले माझे दृष्टिकोन/ धारणा (B – बिलीफ), आणि त्या धारणांना अनुसरून मला जाणविणाऱ्या भावना आणि होणारे वर्तन या साऱ्यांचे एकत्रित प्रारूप म्हणजे माझी मनाची प्रतिमा. आपली मानसिक स्वप्रतिमा समजून घेणे म्हणजे आपले विचार, दृष्टिकोन, भावना, वर्तन यांचे भान आणि जाण असणे. एकाच प्रसंगाला सामोरे जाताना, वेगवेगळे विचार / धारणा असणारे लोक कसे वेगळ्या प्रकारे तोच प्रसंग, तीच समस्या हाताळतात, हे आपण सूरज आणि संतोषच्या आणि अशा इतर काही उदाहरणांतून पाहिले आहेच.
या मानसिक प्रतिमेबद्दल जागृती निर्माण होणे महत्त्वाचे. अशी जागृती निर्माण होण्यासाठी मानसशास्त्राचा खूप सखोल अभ्यास असणे काही गरजेचे नाही. आपले विचार, त्याबद्दलचे भान आणि जाण, आपल्या धारणा ओळखणे आणि मुख्य म्हणजे त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे यातून ही जागृती वाढीला लागणार आहे. या कौशल्यांबद्दल आपल्या आधीच्या लेखांमध्ये विस्ताराने चर्चा केली आहेच.
आपला स्वत:चा स्वीकार म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा तीनही भागांतल्या ‘स्व’चा पूर्ण स्वीकार. हा आत्मस्वीकार निरोगी आणि सुदृढ बनवायचा असेल, तर आपल्या दृष्टिकोनात खालील बदल घडवणे गरजेचे आहे ः
- शारीरिक पातळीवर मी कुणाहीपेक्षा लहान-महान नाही.
- सामाजिक पातळीवर मी कुणाहीपेक्षा लहान-महान नाही.
- मानसिक मी, अर्थात मनाच्या बाबतीत मी स्वत:ला लहान किंवा महान न समजण्यासाठी आत्मविश्वास म्हणजेच Self-Belief महत्त्वाचा आहे.
पुढील आठवड्यात आपण या आत्मविश्वासाबद्दल (Self-Belief) सविस्तर जाणून घेणार आहोत.
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=M3mHIcHRU3U
कर्ता शेतकरी मालिकेचे सर्व भाग बघण्यासाठी यू-ट्यूबवर सह्याद्री फार्म्स किंवा आवाहन आय.पी.एच. या चॅनेलना सबस्क्राइब करा आणि “कर्ता शेतकरी” ही प्लेलिस्ट बघा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.