Land Dispute : हक्क खरेदी खताने निर्माण होतो, नोंदीने नव्हे

Property Dispute : एका गावात कुलदीप आणि प्रवीण नावाचे दोघे भाऊ राहत होते. कुलदीप आणि प्रवीणच्या नावावर वेगवेगळी जमीन होती.
Land Dispute
Land DisputeAgrowon

शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad : एका गावात कुलदीप आणि प्रवीण नावाचे दोघे भाऊ राहत होते. कुलदीप आणि प्रवीणच्या नावावर वेगवेगळी जमीन होती. कुलदीपने स्वतःच्या नावावरील सर्व जमिनीची एका शेतकऱ्याला १९९६ मध्ये विक्री केली.

जमीन विक्री केल्याचे खरेदीखत सुद्धा कुलदीपने स्वतः मालक म्हणून केले. खरेदीखतामध्ये जमिनीचा ताबा खरेदीदारांना दिल्याबाबतचा कुलदीपने स्पष्ट उल्लेख केला होता. नेहमीच्या पद्धतीने, ‘‘झालेले खरेदीखत हे मी राजीखुशीने केले आहे.

ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम मला मिळाली. माझी कोणतीही तक्रार राहिलेली नाही. मी आपल्याला कसलीही तोशीस लागू देणार नाही.’’ असे कुलदीपने खरेदीखतात लिहिले होते. परंतु खरेदी घेणाऱ्याचे नाव लागण्यापूर्वी कुलदीपचा भाऊ प्रवीण याने खरेदी खतानंतर सदर जमिनीत आपण पिके घेत असल्या कारणाने पीक पाहणीस आपले नाव लावण्याबाबत तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज केला. शिवाय प्रवीणने खरेदीच्या नोंदी विरुद्ध महसूल कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल केला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जमिनीचा ताबा आपला असल्यामुळे झालेले खरेदीखत आपल्याला न विचारता केल्यामुळे बेकायदेशीर आहे असे प्रवीणचे म्हणणे होते. परंतु प्रवीणची ही हरकत फेटाळून महसूल अधिकाऱ्यांनी कुलदीपची खरेदीची फेरफार नोंद मंजूर केली.

कारण कुलदीपने जे जमिनीचे खरेदीखत केले होते ते त्याने स्वतःच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे केले होते. त्यामुळे खरेदी घेणाऱ्यास महसूल अधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला होता. सांगावयाचे तात्पर्य म्हणजे महसूल अधिकारी फेरफार नोंदीवर निर्णय घेताना केवळ खरेदी खताने आलेला हक्क नोंदविणारे अधिकारी असतात.

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ९१ व ९२ नुसार त्याच्या भावाच्या तोंडी पुराव्यास महत्त्व देता येणार नाही. हक्क खरेदीखताने निर्माण झाला आहे, नोंदीने नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

Land Dispute
Land Dispute : जमिनीच्या बदल्यात जमीन

सामंजस्य दाखविले, झाले नुकसान
एका गावात जयवंतराव नावाचा एक जमीनदार राहत होता. १९५० मध्ये जमीनदाराच्या म्हणजे जयवंतरावच्या जमिनी वेगवेगळी कुळे कसत होती. पुढे काही वर्षांनंतर म्हणजे १९५७ मध्ये कुळकायद्याच्या तरतुदीनुसार कुळांना मालक म्हणून कायद्याने जाहीर करण्यात आले.

जयवंतराव व कुळांचे पिढ्यान् पिढ्याचे चांगले संबंध होते. त्यामुळे सर्व कुळांनी व मालकाने म्हणजे जयवंतरावने आपापसात तडजोड करावयाचे ठरविले. ‘‘आम्ही सर्व कुळे मालकाच्या मुळे ३० वर्षे जगलो. आम्हाला तुमची सगळी जमीन नको. निम्मी जमीन तुम्ही घ्या व निम्मी जमीन आम्हाला द्या,’’ असे कुळांनी जयवंतरावला सांगितले.

एक दिवस सगळ्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसीलदारांपुढे संमतीने प्रत्येक कुळांसाठी अर्धी जमीन व मालकाला म्हणजे जयवंतरावला अर्धी जमीन ठेवण्यासाठी संमतिपत्रे सादर केली.

मोठ्या जमिनीवरील प्रत्येक कुळाच्या जमिनीपैकी अर्धी जमीन मालक जयवंतराव यांच्या नावे होण्याऐवजी तहसीलदार यांनी दिलेल्या अंतिम आदेशात मालकाला म्हणजे जयवंतरावला एका बाजूला व कुळांना सलग दुसऱ्या बाजूला जमिनी मिळाल्या होत्या.

त्यामध्ये जयवंतरावला सर्व सुपीक जमीन मिळाली होती. यामध्ये जयवंतरावने तहसील कार्यालयात काहीतरी जाणूनबुजून फेरबदल केल्याचे कुळांच्या उशिरा लक्षात आले.

कुळकायद्यानुसार १०० टक्के जमिनीची मालकी कुळांसारखी होऊ शकत असताना सुद्धा केवळ पिढ्यान् पिढ्यांच्या चांगल्या संबंधामुळे कुळांनी मालक जयवंतराव सोबत सामंजस्य दाखवले होते. परंतु यामध्ये कुळांचे फार नुकसान झाले होते.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे कधीकधी एका बाजूच्या पक्षकाराने सामंजस्य दाखविले तरी समोरचा पक्षकार तसेच सामंजस्य दाखवेल का हे सांगता येत नाही! जो सामंजस्य दाखवतो त्याचे नुकसान होते हे चांगल्या समाजाचे लक्षण मानता येईल का?
- शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com