Kirtan : एक क्रांतीकारी शेतकरी कीर्तन महोत्सव

या सप्ताहात अन्नदान असेल मात्र त्याचा भपकेबाज देखावा नसेल. चौदा गावातून भाकरी गोळा केल्या जातील. सकाळी एका गावातील आणि संध्याकाळी एका गावातील घराघरातून भाकरी गोळा करून दररोजच्या पंगती केल्या जातील.
Kirtan
KirtanAgrowon

-इंद्रजीत भालेराव

तीन मार्चला एकादशीच्या दिवशी धारूर तालुक्यातील कान्नापूर नावाच्या गावात शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाला गेलो होतो. तसा हा माझा पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता.

दोन तारखेला संध्याकाळी पाच वाजता कॉम्रेड अजय बुरांडे यांचा फोन आला आणि त्यांनी मला आपण असा असा उपक्रम राबवतो आहोत त्याच्या उद्घाटनाला तुम्ही याच अशी आग्रहाची विनंती केली.

सोबत ह. भं. प. उद्धवबापू आपेगावकर आणि या कीर्तन महोत्सवाचे संकल्पक ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर असणार होते.

माझ्या लहानपणी मी आजूबाजूच्या गावात कीर्तनं पाहायचो. अतिशय साधी अशी ती कीर्तनं असायची. सगळा गाव त्यात सहभागी व्हायचा.

साध्या साध्या जेवणावळी असायच्या. नुसता वरण-भात, कढी-भात किंवा फार फार तर शिरा-भात असायचा.

लोकांची सांपत्तीक स्थिती फार चांगली नसायची पण लोकांची भावस्थिती प्रचंड श्रीमंत असायची.

म्हणूनच त्या कीर्तन सप्त्यामधून जो आनंद आणि संस्कार मिळायचा तो आजच्या लखलखत्या आणि चमचमत्या कीर्तन महोत्सवातून मिळत नाही.

कीर्तनाची ही जुनी सात्विक परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याचं अजय बुरांडे यांनी ठरवलं आणि कानापूर परिसरातील चवदा गावांनी मिळून हा सप्ताह करायचं ठरवलं.

कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहा महिन्यापूर्वी मी या परिसरात गेलो होतो. तिथलं माझं भाषण ऐकून अजय बुरांडे यांना असं वाटलं की या कीर्तन महोत्सवाचं उद्घाटनही मीच करावं.

म्हणून त्यांनी मला आग्रह केला आणि कुठलीच पूर्वतयारी नसताना मी इथं गेलो. तासभर बोललो. जे काय बोललो ते सोबतच्या बातम्यांमध्ये आलेलंच आहे. ते सांगत बसत नाही.

कीर्तन महोत्सवात सातआठ हजार रुपयांची पुस्तक विकतात हा अनुभव मी प्रथमच घेतला. टाळकरी, भजने आणि कीर्तनकार महाराज पुस्तक विकत घेण्यासाठी गर्दी करतात, तीही धार्मिक नव्हे तर माझ्या कवितांची पुस्तकं घेण्यासाठी हा अनुभव मला पुन्हा एकदा मोहा गावातील कार्यक्रमानंतर अनुभवायला मिळाला.

आणखी एक मजेशीर आणि महत्त्वाची गोष्ट इथं घडली. किर्तन महोत्सवाचं उद्घाटन टाळ, मृदंग आणि विणेचं पूजन करून झालं.

पण नुसतच पूजन हे बरोबर नाही म्हणून ह. भ. प. उद्धवबापू आपेगावकर लगेच मृदंगावर बसले आणि श्यामसुंदर महाराज आणि माझ्या गळ्यात त्यांनी टाळ घातले.

आयुष्यात प्रथमच मी टाळ वाजवत होतो, तेही एका जगविख्यात मृदंगियासोबत.

भोवती सराईत टाळकरी होते. त्यांच्या हाताकडं पाहून मी टाळ बरोबर वाजवले याचा मला आनंद वाटला.

Kirtan
Wheat Production: गव्हाचा प्रमुख निर्यातदार असणाऱ्या भारतावर आता आयातीची वेळ येणार?

ह. भं. प. श्यामसुंदर महाराज यांनी या कीर्तन महोत्सवाची संकल्पना स्पष्ट करणारं जे निवेदन तयार केलं होतं ते निवेदन सोबत देत आहे.

म्हणजे या कीर्तन महोत्सवाचे स्वरूप आपल्या लक्षात येईल. मी माझ्या शब्दात सांगत बसण्यापेक्षा त्यांच्याच शब्दात ते खाली देत आहे.

- घराघरातील भाकरीची पंगत- प्रवासा इतकेच कीर्तनकारांना मानधन- अत्यंत कमी खर्चात उच्च प्रबोधन- चौदा गावांचा शेतकरी कीर्तन महोत्सव

हरिनाम सप्ताह म्हटले की लाखोंच्या देणग्या, चमचमीत, चटपटीत, गोडधोड पदार्थांनी सजलेल्या पंगती आणि विनोदाचार्य महाराज यांना भल्ली मोठी बिदागी देऊन केलेले फक्कड मनोरंजन.

वैचारिक चिंतनापेक्षा टुकार विनोदांचा भिकार भडीमार, असे हरिनाम सप्ताहाला स्वरूप आलेले असताना अत्यंत कमी खर्चातही संत विचारावर आधारित उच्च प्रतिची वैचारिक शिदोरी देणारा आदर्श कीर्तन महोत्सव धारुर-परळी वैजनाथ तालुक्यातील चौदा गावांनी मिळून आयोजित केला आहे.

या चौदा गावांसह आजूबाजूच्या सर्व गावात या कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शुक्रवार तीन मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे या कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.

जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने संत विचारांचे वैचारिक मंथन व्हावे यासाठी परळी वैजनाथ-धारुर तालुक्यातील चौदा गावांनी एकत्र येऊन भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

सध्या हरिनाम सप्ताहाला येत असलेले इव्हेंटचे स्वरूप टाळून आदर्श प्रबोधन पर्व ठरेल, असा प्रयत्न संयोजकांनी केला आहे.

या सप्ताहात अन्नदान असेल मात्र त्याचा भपकेबाज देखावा नसेल. चौदा गावातून भाकरी गोळा केल्या जातील. सकाळी एका गावातील आणि संध्याकाळी एका गावातील घराघरातून भाकरी गोळा करून दररोजच्या पंगती केल्या जातील.

कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणी पिठलं किंवा एखादी भाजी बनविली जाईल. अत्यंत साधी पंगत होईल.

या कीर्तन महोत्सवातील इतर भपकेबाजपणा कमी करून उच्च प्रतिचे प्रबोधन होईल याची काळजी संयोजकांनी घेतली आहे.

या महोत्सवात हजारोंची बोली लावून मानधन ठरविणा-या एकाही विनोदाचार्य महाराजांना निमंत्रित करण्यात आलेले नाही.

तर संत साहित्याचा अभ्यास करून त्या आधारे समाजात शांतता, एकोपा, अंधश्रद्धा निर्मूलन यावर प्रबोधन करणारे कीर्तनकार आणि वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यातील एकाही वक्त्याने आपले मानधन सांगितलेले नाही. संयोजक प्रवासातील अंतर लक्षात घेऊन मानधन देतील त्याचा स्वीकार करण्याचे या कीर्तनकारांनी मान्य केले आहे.

कीर्तनकारामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास असणारे विजय महाराज गवळी, नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेच्या माध्यमांतून सामाजिक ऐक्यासाठी प्रसिद्ध असणारे मधुकर महाराज बारुळकर, संत श्री. बंकट स्वामी महाराज यांच्या आदर्श वारकरी परंपरेचा वारसा चालविणारे नाना महाराज कदम, सुफी आणि वारकरी संत परंपरेचा सुरेख संगम साधून धार्मिक सलोखा निर्माण करणारे जलाल महाराज सय्यद, वारकरी संतांच्या विवेकी विचारांच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन, स्री सक्षमीकरण याबाबत प्रबोधन करणारे ज्ञानेश्वर महाराज वाबळे, अत्यंत कमी वयात संत साहित्याचा गाढा अभ्यास करून विवेकी समाज निर्मितीची वाट प्रशस्त करणारे ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांची कीर्तने होणार आहेत.

शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते संविधान जागरापर्यंत विविध उपक्रम राबविणारे शामसुंदर महाराज सोन्नर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

कीर्तनाबरोबर प्रवचनासाठी उत्कृष्ट वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

ज्यात वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार, मूलनिवासी वारकरी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष रामेश्वर त्रिमुखे, पंचफूला प्रकाशनचे संपादक, विचावंत डाॅ. बालाजी जाधव, श्री. संत कैकाडी महाराज यांचे वंशज, मठाधिपती भारत महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज उबाळे आणि विकास महाराज लवांडे यांचा समावेश आहे.

हरिनाम सप्ताहातील भपकेबाजपणा वाढत असताना आदर्श आयोजनातून वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुनर्जिवीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे कीर्तन महोत्सवाचे समन्वयक एडओकेट अजय बुरांडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com