Nagpur News : कोंबड्यांचे वजन २ ते २.५ किलोपर्यंत राखणे आरोग्यदायी व चवदार आहे. ‘माफसू’च्या अभ्यासाअंती या संदर्भातील निष्कर्ष समोर आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने हा अहवाल स्वीकारत पुढील कारवाईच्या अनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्तांनी हा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्ध विकास सचिवांकडे पाठविला आहे. त्यामुळेच लवकरच या संदर्भातील धोरणाच्या अंमलबजावणीची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न सुटावे याकरिता राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र या समितीच्या आजवर झालेल्या बैठकीतील एकाही धोरणाची अंमलबजावणी करण्यात पशुसंवर्धन खात्याला यश आले नाही. त्यामध्येच खाण्यासाठी मांसल कोंबड्यांचे वजन २ ते २.५ किलो इतकेच असावे या बाबीचाही अंतर्भाव होता.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुक्कुटशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम यांनी या संदर्भाने अभ्यासाअंती निरीक्षण नोंदविले होते. याच वजनाची कोंबडी ही खाण्यासाठी चवदार आणि आरोग्यदायी राहते, असा त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष होता. ३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या कुक्कुट समन्वय समिती बैठकीत यावर चर्चा होत हा अहवाल स्वीकारण्याचे ठरले. त्यानंतर डॉ. कदम यांच्या उपस्थितीत एक बैठकही या मुद्यावर झाली.
‘माफसू’कडून रीतसर अहवाल पशुसंवर्धन खात्याला प्राप्त झाला. परंतु त्यानंतर या संदर्भातील कारवाई ठप्प झाली होती. पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांच्या मागण्यांसंदर्भाने आंदोलनाची हाक देताच जागे झालेल्या पशुसंवर्धन विभागाने यावरील कारवाईला आता गती दिली आहे. त्यानुसार या अहवालावरील पुढील कारवाई व या धोरणाच्या अंमलबजावणीचा चेंडू पशुसंवर्धन आयुक्तांनी सचिवांच्या कोर्टात रेटला आहे. परिणामी लवकरच या संदर्भातील धोरणावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.