Farming Technology : पुनरुज्जीवित शेती पद्धती अभ्यासण्याच्या हालचाली

Regenerative Farming : वनामकृवि’च्या शास्त्रज्ञांचे पथक फुलंब्रीत बांधावर
Farming Technology
Farming TechnologyAgrowon

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
VNMKV Parbhani : छत्रपती संभाजीनगर : ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ अर्थात पुनरुज्जीवित शेतीच्या शास्त्रोक्त अभ्यासाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रयोगाची माहिती जाणून घेण्यासाठी गुरुवारी (ता. २०) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.

छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीतील ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’संबंधीच्या मुद्द्याला ‘ॲग्रोवन’ने १७ जूनच्या अंकात प्रसिद्धी दिली होती.

कृषी विभागाने भातशेती व्यतिरिक्त कपाशी, तूर, हरभरा व इतर पिकात वापरलेले एसआरटी अर्थात ‘सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक’चे फायदे विविध अनुषंगाने बैठकीत अधोरेखित केले होते. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी शास्त्रज्ञांचे लक्ष या तंत्रज्ञानाकडे वेधले होते. ‘ॲग्रोवन’ने कृषी विभागाने अधोरेखित केलेले मुद्दे प्रकर्षाने मांडून ‘वनामकृवि’ आता या प्रकरणात संशोधनाच्या दृष्टीने काय हालचाल करते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

Farming Technology
Modern Farming : आधुनिक शेती पद्धती ठरतेय पक्ष्यांसाठी घातक

दरम्यान, ‘वनामकृवि’ने गुरुवारी विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांचा चमू ‘सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक’च्या फायद्याची प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाठवला. यात हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी जी. एम. वाघमारे, कोरडवाहू संशोधन केंद्र परभणीचे डॉ. ए. के. गोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद कार्ले आदींचा सहभाग होता. या सर्व तज्ञांसह ‘स्मार्ट’चे विभागीय समन्वयक उमेश घाडगे व डॉ. मोटे फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील एसआरटी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या शास्त्रज्ञांनी एसआरटी तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे गुलाबराव खंडागळे यांच्यासह शेतकरी सुरेश सोनवणे, भगवान बलांडे, भाऊसाहेब सोनवणे, नानुबाई सोनवणे आदींच्या प्रक्षेत्रांना भेट दिली. कृषी विभागाच्या अवलोकनानुसार शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरू पाहणारे हे तंत्रज्ञान शाश्वत शेतीच्या दृष्टीने किती फायद्याचे व त्यात आणखी काही सुधारणा करण्याच्या अपेक्षा आहेत का ? याविषयीच्या कृषी विद्यापीठाच्या कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

‘सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक’संबंधीचे अहवाल पाहिल्यानंतर शाश्वत शेतीच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल असे वाटते. अर्थात याविषयी विद्यापीठाकडून तज्ज्ञ व विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून निष्कर्ष काढले जातील.
- डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक, ‘वनामकृवी’ परभणी.
...
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील प्रक्षेत्रावर ‘सगुणा रीजनरेटिव्ह टेक्निक’चे फायदे जाणून घेताना डॉ. धर्मराज गोखले आणि त्यांचे इतर शास्त्रज्ञ सहकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com