Jadav Payend : एकट्याने १३६० एकरवर जंगल उभारणारा अवलिया

Forest Man of India: ब्रह्मपुत्रेच्या पात्रात गाळ साचून अनेक बेटं तयार झालीत, त्यातलं सर्वांत मोठं- माजोली. हा मोलई यांचा मुक्काम. जिल्हा जोरहाट. आसामची राजधानी, गुवाहटीपासून तब्बल ३५० किलोमीटरवर.
Forest Man of India - Jadav Payend
Forest Man of India - Jadav PayendAgrowon
Published on
Updated on

Jadav Payend Story ब्रह्मपुत्रा नदीचा (Brahmaputra River) केवढा तो पसारा. प्रचंड पाणी, प्रचंड गाळ, प्रचंड वेग-आवेग. उंच पर्वतांवरून खाली उतरून सपाटीला पोहोचते, तेव्हा काय तो विस्तार... जणू सागरच! या ब्रह्मपुत्रेच्या 'सागरा'त जागोजागी गाळ साठतो आणि नदीचा मार्ग बदलतो.

जिथून पाणी वाहील ते नदीचे पात्र. बाकी जमा झालेल्या वाळूची बेटं (Sand Island). सारंच अस्थिर, तात्पुरतं आणि तिथल्या लोकांचं पाठीवरचं बिऱ्हाड! त्यातही काही बेटं चांगल्या झाडोऱ्यामुळे टिकून होती.

कारण हे झाडांचे आवरण जमिनीची धूप (Soil Erosion) रोखायचे. काळ गेला तशी झाडं गेली आणि बेटं अधिकच धोकाप्रवण बनली. ब्रह्मपुत्रेचा पूर दरवर्षीचाच. त्यात वाहून येणारे साप-सरडे नित्याचेच. एकदा एका बेटावर ते वाहत येतात.

झाडोऱ्यावाचून आसरा मिळत नाही आणि उन्हात तडफडून मरतात... काही जण दुर्लक्ष करतात. काही हळहळ व्यक्त करतात, पण एका युवकाच्या मनावर खोलवर परिणाम होतो. तो कामाला लागतो आणि पंचवीस- तीस वर्षांच्या अविरत कामानंतर एकहाती जंगलच उभं करतो.

ही कहाणी आहे जादव पायेंद यांची. टोपण नाव 'मोलई'. मिशिंग जमातीचा आदिवासी. इनमीन पावणेपाच फुटांची मूर्ती. ना विशेष शिक्षण- ना मोठा वारसा.

राहायला अशा गावात की तिथं पोहोचणंही कठीण, पण त्यानं केलेलं काम इतकं प्रचंड आहे की ते अनेकांना वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील. या माणसानं १३६० एकराच्या म्हणजेच साडेपाच चौरस किलोमीटरच्या बेटावर जंगल उभं केलंय.

तेही इतकं समृद्ध की तिथं आता शंभरहून जास्त हत्ती, पाच वाघ, एकशिंगी गेंडे, हरणे, गवे असे कितीतरी प्राणी जात-येत राहतात. तब्बल ४० वर्षानंतर तिथं गिधाडंही माघारी परतलीत.

Forest Man of India - Jadav Payend
Climate Change : एकात्मिक शेतीवर द्या भर

ब्रह्मपुत्रेच्या पात्रात गाळ साचून अनेक बेटं तयार झालीत, त्यातलं सर्वांत मोठं- माजोली. हा मोलई यांचा मुक्काम. जिल्हा जोरहाट.

आसामची राजधानी, गुवाहटीपासून तब्बल ३५० किलोमीटरवर. या माजोलीला ब्रह्मपुत्रेनेच जन्म दिला. आता हीच नदी या बेटाच्या जीवावर उठलीय. ब्रह्मपुत्रेच्या पाण्यामुळे या बेटाची मोठ्या प्रमाणात झीज सुरू आहे.

१९६० च्या दशकपासून आतापर्यंत त्याच्या निम्म्या क्षेत्राची झीज झालीय. ही चिंता एवढ्यावरच संपत नाही. उरलेले बेटसुद्धा नष्ट होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी देऊन ठेवलाय. अशा या बेटावर मोलई यांचा जन्म. वर्ष १९६३.

शिक्षण दहावीपर्यंत. तो काळ होता १९७० आणि ८० दशकाच्या मध्यावरचा. आसामचा इतिहास डोळ्यासमोर आणला तर या काळात युवकांमध्ये मोठी उलथापालथ सुरू होती.

चळवळ म्हणा, क्रांती म्हणा, बंडखोरी म्हणा... या नावाखाली हजारो तरुणांनी शस्त्र हाती घेतली. त्याच सुमारास म्हणजे १९७९ या साली 'मोलई' हा युवक ब्रह्मपुत्रेचा पूर, त्यात बेटाची झीज, वन्यजीवांची हानी पाहतो. त्यातून वृक्षांच्या संवर्धनाकडे वळतो.

(हा माणूस आता दंतकथा बनलाय, त्यामुळे त्याच्या या कामाकडे वळण्याची दुसरीही कथा सांगितली जाते. ती म्हणजे- १९७९ मध्ये वन विभागाने अरुणा बेटावर वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली होती.

प्रकल्प पाच वर्षांचा होता. त्यावर मजूर म्हणून 'मोलई'ची नेमणूक होती. पण प्रकल्प तीन वर्षांमध्येच गुंडाळला. मोलईने मात्र आपले काम सुरू ठेवले आणि तिथे जंगल फुलवले.)

Forest Man of India - Jadav Payend
Climate Change : बदलत्या हवामानाचा पिकांवर विपरीत परिणाम

मोलई काही फार वेगळं, कठीण काम करतो, असं नाही. घरातली कामं उरकली की रोपांची पिशवी घेतो आणि ब्रह्मपुत्रेच्या गाळातून चालायला लागतो. जवळच्या ओसाड अरुणा बेटावर पोहोचतो.

हातातल्या काठीने गाळात खड्डा खणतो आणि रोपं लावतो. या ओसाड बेटावर झाडं लावण्यासाठी त्याने वन विभागाला सुचवले. पण 'इथं बांबूशिवाय काय उगवणार?' म्हणत त्यांनी रस दाखवला नाही.

मात्र, मोलईने सुरुवातीला बांबू लावले. काम कठीण होतं, पण नवनिर्माण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती होती. बांबू येऊ लागल्यावर इतर रोपांकडे वळाला. त्यांची संख्या कमी असताना प्रत्यक्ष पाणी घालणं शक्य होतं. संख्या वाढत गेली, तसं ते शक्य होईना

Forest Man of India - Jadav Payend
Climate Change : नेमका प्राधान्यक्रम ठरविण्याची आवश्यकता

एकटा माणूस, करणार तरी काय काय? पण त्यातून मार्ग काढत गेला. बांबूच्या ताठ्या रोवून त्याला मडकी लटकवली, त्यातून रोपांसाठी पाणी ठिबकू लागले.

रोप पाणी देण्याऐवजी ते मडक्यात आठवडाभर टिकू लागले. हा भारतीय मातीतला, त्यात आदिवासी. त्यामुळे झाडे टिकवण्यासाठी- वाढवण्यासाठी काय करावं लागतं, हे पुस्तकात वाचायची गरज नव्हती.

गावातच लहानपणी पाहिलेले, ऐकलेले उपाय केले. लाल मुंग्या, वाळवी, गांडूळ आणून बेटावर सोडले. या जीवांनी टणक माती भुसभुशीत व्हायला मदत झाली. पाणी जिरू लागले, रोपे रुजणे सोपे बनले...

Forest Man of India - Jadav Payend
Climate Change : हवामान बदलाचा करा सखोल अभ्यास

हे काम सोपे खरे, पण वेगळेपण हे की रोज उठून हे करायचे. थोडेथोडके नव्हे, तर सलग ३० वर्षे. ना कुठला मोबदला, ना पाठीवर थाप. उलट कधी कधी त्रासच. 'मोलई'चे जंगल दाट बनले.

स्वाभाविकपणे आसपासचे प्राणी आकर्षित होऊ लागले. वाघ आले. हत्ती आले. गेंडे आले, हरणं आली... लहान-मोठे प्राणी आणि पक्षी तर असंख्य. एक समृद्ध परिसंस्थाच उभी राहिली. हे माजोलीच्या जवळचे बेट.

ते आधी ओसाड होते. पण आता तिथे वन्य प्राणी येऊ लागले. ते जवळ आल्याने स्वाभाविकपणे माजोलीपर्यंतही पोहोचू लागले. गोठ्यातली गुरं उचलणे, त्यांच्यावर हल्ले, शेतात शिरून नुकसान करणे... हे प्रकार सुरू झाले. "हे सारं याने जंगल वाढवल्यामुळे..." असे म्हणत लोक चिडले.

त्यांनी जंगल तोडायला सुरूवात केली. स्वत: जन्म दिलेले वृक्ष असे तोडले जाताहेत म्हटल्यावर मोलई मध्ये पडले, पण समजावून सांगून उपयोग नव्हता. शेवटी इशारा दिला- आधी मला संपवा, मग माझ्या जंगलाला. मात्रा लागू पडली. थो़डीफार घुसळण होऊन जंगलतोड थांबली. प्रश्न तात्पुरताच सुटला होता. कायमचा उपाय करणे आवश्यक होते.

प्राणी बाहेर जाण्याचे कारण काय? तर जंगलात पुरेसे अन्न नाही. म्हणून हत्तींना आवडणारी केळी, गव्यांना- हरणांना आवडणारे गवत यांचे रोपण केले. ते खाणारे प्राणी जंगलातच राहू लागले. हरणांची संख्या वाढल्याने त्यांना खाणाऱ्या वाघासारख्या प्राण्यांनाही गावात जाण्याची गरज भासली नाही...

अनेक समस्यांमधून मार्ग काढत 'मोलई' यांचे काम सुरू आहे. जोडीने जंगलही बहरत आहे. आता तर पत्नी, तीन मुले यांचीसुद्धा साथही आहे. पशुपालन आणि दुधाची व्यवसाय सांभाळत वृक्ष रोपण- संवर्धनाचे कार्य सुरूच आहे.

अरुणा बेटावर जंगल उभे केल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या ओसाड टापूवर काम सुरू केले आहे... त्यांना आयुष्यभर पुरतील इतके टापू शिल्लक आहेत, ब्रह्मपुत्रेच्या "कृपेने" त्यात वाढही होत आहे.

'मोलई' यांचे जंगल जितू कलिता या आसामी लेखक- छायाचित्रकाराने २००९ च्या सुमारास पाहिले. तो उत्सुकतेपोटी आत शिरला, तेव्हा मोलई याने शिकारी समजून त्याच्यावर हल्ला चढवला, त्याला पळवून लावले. या घटनेनंतर कलिता यांनी जंगलाबाबत लिहले. त्यातून मोलई यांचे कार्य जगासमोर आले.

त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले, पुरस्कार मिळाले, "फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया" म्हणून गौरवण्यात आले, भारत सरकारने 'पद्मश्री' देऊन सन्मान केला. आपण भारतीय उत्सवप्रिय. त्यानुसार त्यांचे सत्कार केले. त्याबाबत आनंदच. पण आता गरज आहे, या उत्सवाच्या पलीकडे जाण्याची.

मोलई ऊर्फ जादव पायेंद यांनी जग बदलण्यासाठी "एक माणूस पुरे" हे दाखवून दिले आहे, त्याचा थोडा अंश आत्मसात केला तर तो पायेंद यांना खरा पुरस्कार असेल... आणि ती संधी, सकाळ माध्यम समूहाच्या वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने आपल्यापर्यंत चालून आलीच आहे!

- अभिजित घोरपडे

लेखक हे वरिष्ठ पत्रकार आणि प्राज फाउंडेशनचे "पर्यावरण व शाश्वतता" या विषयांचे फेलो (अभ्यासक) आहेत.

ई-मेल : abhighorpade@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com