
हवामान बदलाचा (Climate Change) हा काळ आहे. पावसावर आधारित कोरडवाहू (Rain Fed Agriculture) शेतीतून उत्पादन (agriculture Production) मिळण्याची काहीही शाश्वती राहिली नाही. अशा शेतीतील एखाद-दुसरं पीक नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) वाया गेलं की वर्षभर काय खायचे आणि इतर खर्च कसा भागवायचा याची चिंता शेतकऱ्यांना पडते.
पीकच हाती न आल्यामुळे कर्ज परतफेड दर दूरच राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा पण वाढतो. या विवंचनेतून अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ही सर्व परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करायला पाहिजे. असे झाले तर त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो.
शेतकऱ्यांनी सुद्धा पावसावरील जोखीमयुक्त शेती शाश्वत करण्यावर भर द्यायला हवा. शेती क्षेत्र कमी असले तरी त्यात एक पीक न घेता भिन्न कालावधींच्या तीन-चार पिकांचे नियोजन करावे. म्हणजे एखादे पीक गेले तरी दुसरे पीक हाती लागू शकते. तसेच आपल्या शेतीला जोडधंद्याची जोड द्यायला हवी. गाय-म्हैसपालन, शेळी-मेंढी-वराहपालन असे पशुधनासंदर्भात जोड व्यवसाय आपण करू शकता.
याशिवाय कोंबडीपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, अळिंबी संवर्धन अशा पूरक व्यवसायातूनही चांगले अर्थार्जन होऊ शकते. शेतीपूरक व्यवसाय करण्याआधी याबाबतचे तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे. शिवाय असे पूरक व्यवसाय करण्यासाठी शासनाची आर्थिक मदत, कर्जही मिळते.
त्याची माहिती घेऊन संबंधित योजनांचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. राज्यात विविध पूरक व्यवसायांचे एकात्मिक शेतीचे चांगले मॉडेल्स आहेत. त्याचाही अभ्यास शेतकऱ्यांनी अशा व्यवसायात उतरताना करायला हवा. शेतीपूरक व्यवसाय उत्पादनांतून शेतकऱ्यांच्या हाती खेळता पैसा राहतो. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तरी त्याची तेवढी झळ बसत नाही. येथून पुढे एकात्मिक शेतीच शेतकऱ्यांना तारेल, असे वाटते.
मधुकर पाटील, वर्धा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.