Gadchiroli News : गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात रानटी हत्तीच्या कळपाने धुडगूस घातला होता. हत्तीचा हाच कळप आता पुन्हा पोर्ला वन परिक्षेत्रातील इंजेवारी-सिर्सी जंगलात दाखल झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रात २२ पेक्षा अधिक संख्येत असलेल्या रानटी हत्तींनी गेल्या वर्षी धुडगूस घातला होता. गेली दोन महिने देसाईगंज व आरमोरी तालुक्यात मका, भाजीपाला पिकांची नासधूस त्यांनी केली. हा कळप या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची नासधूस करीत असताना वनविभागाकडून त्यांचे सातत्याने ट्रॅंकिंग होत होते.
परंतु एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या हत्तीच्या कळपावर नियंत्रण ठेवताना कर्मचाऱ्यांची देखील दमछाक होत होती. हल्ला टीम हत्तीच्या मागावर असताना ती हत्तींना नियंत्रित करू शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हत्तीचा कळप जोगीसाखरा परिसरात वावरत असतानाच वैरागडच्या जंगलातून खोब्रागडी नदी ओलांडून देऊळगाव, इंजेवारी व सिर्सीच्या जंगलात दाखल झाला.
सध्या हा कळपाचा वावर सिर्सी उपक्षेत्रात असून कळप पोर्ला परिसरात येण्याची शक्यता आहे. हत्तीच्या हालचालीवर वनविभागाचे लक्ष्य असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. हत्तींना धानाच्या कोवळ्या पाती तसेच लोंब्या आवडतात. त्यामुळे ते शेतात शिरून हे पीक फस्त करतात. गेल्या आठवड्यात वैरागड येथील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तीच्या कळपाने केली होती. त्यामुळे आता पोर्ला वनपरिक्षेत्रातील धान पीक हत्तीचे लक्ष्य असणार आहे.
दोघांचा घेतला होता बळी
ऑक्टोबर २०२३ मध्ये रानटी हत्तीच्या कळपाने पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश करून मोहझरी नगरी व गोगाव परिसरातील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाची हानी केली होती. दोन दिवसांनंतर हा कळप दिमना गावाच्या दिशेने निघाला. तेथे या कळपाने एका शेतकऱ्याला चिरडले. महेगाव येथे देखील एका युवा शेतकऱ्याचा बळी या हत्तीच्या कळपाने घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.