
Akola News : सहकार क्षेत्रातील बहुप्रतिक्षित असलेली कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक (Akola Agriculture Produce Market Committee Election) प्रक्रिया अखेरीस सुरू झाली आहे. अकोला जिल्ह्यात पुढील महिन्यात २८ ला मतदान होणार असून आता महिनाभर सहकार क्षेत्रातील वातावरण तापलेले राहणार आहे. ही निवडणूक सहकारातील अनेकांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे.
अकोल्यासह अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या सातही बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्याने तेथील निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी सुमारे १३ हजारांवर मतदार मतदानातून नवीन संचालक मंडळ निवडणार आहेत.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर त्या-त्या तालुक्यात विशिष्ट घराण्यांचे प्राबल्य राहलेले आहे. राजकीय पक्षांचे स्थान तितकेसे नाही. स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते.
सहकारात इतर संस्थांपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांची मतदार यादी अंतिम झाली असून १३ हजार ६१ मतदार पात्र आहेत. सोमवार (ता.२७) अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
तालुकानिहाय बाजार समित्यांचा विचार केल्यास अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गत ५० वर्षांपासून सहकार गटाचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळीही हा गट स्थान कायम टिकवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मूर्तिजापूर तालुका बाजार समितीवर तीन दशकांपासून सहकार नेते भय्यासाहेब तिडके यांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी सहकार पॅनेलसमोर आव्हान उभे ठाकते का हे लवकरच स्पष्ट होईल. तेल्हारा
तालुक्यातही नेहमीच रंगतदार लढती होता. सध्या या तालुक्यात खरेदी-विक्री निवडणूक लागलेली असून ही बाजार समितीची रंगीत तालीम मानली जाऊ लागली आहे.
जिल्ह्यात अकोल्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहणारी अकोट बाजार समितीची निवडणूकही लक्ष्यवेधी ठरणार आहे. पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी या तालुक्यातही बाजार समित्यांची निवडणूक गाजणार आहे.
अनेक महिन्यांपासून या बाजार समित्यांवर मुदत संपल्याने प्रशासकराज सुरु होते. सहकारातील दिग्गज नेते निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा करीत होते. आता एकदाची ही प्रक्रीया सुरु झाल्याने सहकारातील वातावरण तापायला सुरुवात झाली.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सेवा संस्था मतदार संघ, ग्रामपंचायत, व्यापारी-अडते, हमाल-मापारी अशा मतदार संघातून संचालक निवडले जातात.
यासाठी सेवा संस्था मतदार संघात जिल्हयात ५१२६, ग्रामपंचायत मतदार संघात ४७२६, व्यापारी-अडते गटात १४६९, हमाल-मापारी मतदार संघात १७४० असे १३ हजार ६१ मतदार या निवडणुकीसाठी पात्र ठरलेले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.