Farmer Story : एका शेतकऱ्याचे असेही एक दातृत्व

Blue Berry Producer Farmer : पिटर यांनी वृत्तपत्रात छोटी जाहिरात देऊन त्यांची सर्व ब्लुबेरींनी लगडलेली बाग स्कॉटलंड येथील जनतेस चॅरिटी म्हणून अर्पण केली.
Farmer Story
Farmer Story Agrowon

डॉ. नागेश टेकाळे

Farmers Charity : पिटर यांनी वृत्तपत्रात छोटी जाहिरात देऊन त्यांची सर्व ब्लुबेरींनी लगडलेली बाग स्कॉटलंड येथील जनतेस चॅरिटी म्हणून अर्पण केली आणि आवाहन केले की आजी आजोबा, मुलाबाळांसह बागेत या आणि मनसोक्त बेरी खा. शासनाच्या एका निर्णयाने बसलेला फटका या शेतकऱ्याने अनोख्या कृतीतून व्यक्त केला.

उत्तर अमेरिका म्हणजे फळाफुलांनी समृद्ध असलेला प्रदेश. या प्रदेशामधील तेवढेच श्रीमंत आणि महागडे फळ म्हणजे ब्लूबेरी. ब्लूबेरी हा मोठा झुडपासारखा वृक्ष. पूर्वी तेथील जंगलात मुबलक होता आणि आजही आहे. त्याच्या फळाचे औषधी उपयोग समजल्यावर कृषी शास्त्रज्ञांनी त्यावर विविध संकर करून त्यास ब्लूबेरी फळांनी लगडलेल्या लहान डेरेदार वृक्षाचे रूप दिले. आज अमेरिकेसह युरोपमध्ये हा छोटा पण बहुवर्षिय वृक्ष ब्लुबेरींच्या शेकडो बागांमध्ये रूपांतरित झाला. १२ ते १५ फूट उंचीचा ब्लुबेरींनी लगडलेला हा वृक्ष दुरून पाहताना जमिनीवर रांगतो आहे, असे वाटते म्हणूनच त्याची फळ तोडणी सोपी असते. याची फळे रसदार असतात. जगामधील एकूण ब्लूबेरी उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन एकट्या अमेरिकेत होते. विविध मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि अॅन्टीऑक्सिडंटने श्रीमंत असलेले हे गावठी बोरासारखे निळसर रंगाचे फळ अनेक औषधी तत्त्वांनी समृद्ध आहे. हृदयविकार आणि मधुमेहावर तर ते जास्त परिणामकारक आहे तसेच निद्रानाशावरही!

द्राक्षाप्रमाणे ब्लुबेरीचे सुद्धा घोस असतात. एक किलो ब्लूबेरी अंदाजे १२०० रुपये प्रतिकिलो पडते. भारतामध्ये या फळाचे उत्पादन अतिशय कमी असल्यामुळे ३० टक्के आयातकर भरून हे फळ आपण अमेरिका, पेरू, चिली या देशांतून आणतो. आपल्या देशाची या फळाची आयात तब्बल १४०० टन आहे. त्या तुलनेत सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश येथील उत्पादन फारच कमी आहे. या लहान वृक्षास फुले येण्यास आणि फळ धारणेस शून्याच्या आसपास तापमान लागते. ब्लुबेरीची एवढी सर्व माहिती येथे तुम्हांस देण्यामागे कारण आहे स्कॉटलंडमधील एका शेतकऱ्याचे दातृत्व! स्कॉटलंडमध्ये ब्लुबेरीच्या काही बागा आहेत. त्यातील एक बाग पिटर थॉमसन या शे‍तकऱ्याची आहे. स्कॉटलंडच्या उत्तरपूर्व या अतिशय थंड प्रदेशात पर्थशायर भागात हा शेतकरी गेली ३० वर्षे त्याच्या ६० एकर जमिनीवर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या फळाची शेती करतो. त्यांच्या या बागेतून मिळणारे फळ उत्पादन सरासरी ३०० टन प्रतिवर्षी एवढे असते. हे सर्व उत्पादन स्कॅटलंड, इंग्लंड या दोन देशांना पुरवितानाच संपून जाते.

Farmer Story
Farmers Protest : पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर शेतकऱ्याचे उपोषण स्थगित

वर्ष २०२२ च्या हंगामामधील ही घटना आहे. शेतकरी मेहनतीने उत्पादन घेतात, वातावरण बदल, वैश्विक तापमानवाढ आणि पाण्याची कमतरता असूनही यात खंड पडू देत नाहीत. मात्र शासनाची कृषी विषयक आयात-निर्यात धोरणे, उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत यामध्ये शेतकरी अनेक वेळा उध्वस्त होतो पण शासनास त्याचे काही देणे घेणे नसते. पिटर थॉमसन यांचेही तसेच झाले. स्कॉटलंडमधील ब्लुबेरीचे उत्पादन जगामधील इतर राष्ट्रांच्या तुलनेत सर्व प्रथम येते. त्यामुळे त्यास नेहमीच चांगला बाजारभाव मिळत असे. स्कॉटलंड बेरीची ऑक्टोबरमधील मागणी लक्षात घेऊन पेरू आणि दक्षिण आफ्रिकेमधील ब्लूबेरी उत्पादकांनी नवीन संकरित वाण तयार करून स्कॉटलंड बेरी बरोबरच त्यांनाही जागतिक बाजारात आणले. देशांतर्गत ब्लुबेरीचे उत्पादन आणि किंमत अनेक वर्षापासून स्थिर असताना स्कॉटलंड आणि ब्रिटिश सरकारने पेरू आणि दक्षिण आफ्रिकेमधील

या ब्लूबेरी उत्पादकांना त्यांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठांत विकण्यास परवानगी दिली तेही अतिशय कमी किमतीत! कारण या दोन देशांत मजुरी अतिशय कमी आहे. या विदेशी स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी पिटर यांना त्यांच्या बागेमधील सर्व बेरी एवढ्या कमी किमतीत त्याही एकाच वेळी बाजारात आणणे शक्य नव्हते. एवढ्या मोठ्या बागेमधील हे नाजूक फळ उतरवून घेऊन त्यांना बाजारपेठेत आणणे जमले नाही. त्यामुळे पेरू आणि दक्षिण आफ्रिकेमधील ब्लुबेरीने स्कॉटलंडच्या बाजारात चांगले बस्तान बसविले आणि तेही स्थानिक बेरीच्या तुलनेत अर्ध्या किमतीमध्येच!

अशा परिस्थितीत पिटर यांनी वृत्तपत्रात छोटी जाहिरात देऊन त्यांची सर्व ब्लुबेरींनी लगडलेली बाग तेथील जनतेस चॅरिटी म्हणून अर्पण केली आणि आवाहन केले की आजी आजोबा, मुलाबाळांसह बागेत या आणि मनसोक्त बेरी खा. त्यांच्या या चॅरिटीची किंमत होती तब्बल दोन दशलक्ष पौंड म्हणजे २१ कोटी रुपयांच्या वर! केवढा हा त्याग? शासनाच्या एका निर्णयाचा बसलेला फटका या शेतकऱ्याने शासनास दोष न देता एका अनोख्या कृतीने दातृत्वातून व्यक्त केला. अर्थात यासाठी मन मोठे लागते. नागरिक त्यांच्या बास्केटमध्ये ही फळे भरून नेत असताना त्यांना पिटर यांनी विनंती केली की या फळांच्या बदल्यात आपण देशामधील कर्करोग रुग्णासाठी जेवढी शक्य आहे तेवढी मदत करावी. पहिल्याच दिवशी जवळपास शंभर चॅरिटीज आल्या आणि ४००० पौंड मदत सुद्धा गोळा झाली. या दोन्ही राष्ट्रांत काही संस्था अन्नछत्रे चालवितात तेथेही पिटर यांनी त्याच्या बागेतील ब्लुबेरीची फळे गरिबांना मोफत वाटली.

दूध उत्पादन हा आपल्या शेतकऱ्‍यांसाठी कायम नुकसानीचा धंदा आहे. दुधाला भाववाढ मिळावी म्हणून अनेक ठिकाणी रस्त्यावर आंदोलने होतात आणि हजारो लिटर दूध रागाने ओतून दिले जाते. एक लिटर दूध निर्मितीसाठी गाईची केवढी ऊर्जा खर्च होत असेल याचा आपण विचार करत नाही. शासनाचा निषेध म्हणून हेच दूध आदिवासी भागात, अंगणवाडी, अनाथालय, वृद्धाश्रमातील लोकांना दिले तर केवढी सेवा घडू शकते. भाव नाही म्हणून आपण टोमॅटोचा लाल चिखल करतो, पालेभाज्या फेकून देतो, उभ्या पपईच्या बागेवर नांगर फिरवितो हे चुकीचे आहे, असे आपणास पटुनही रागावर नियंत्रण नसल्यामुळे हे घडते. मध्यंतरी शिर्डी रस्त्यावर परिसरामधील टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोला कवडीमोल दर मिळते म्हणून शेतातील ताजे टोमॅटो रस्त्यावरील वाहन मालकांना मोफत दिले. रानात फेकून निषेध करण्यापेक्षा हे अनोखे सेवाभावी आंदोलन मला मनापासून आवडले. नाशवंत माल वाया घालवण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखात गेला हे महत्त्वाचे मग तो गरीब असो अथवा श्रीमंत!

पिटरने केलेल्या या दातृत्वाची प्रसिद्धी माध्यमांनी नोंद घेतली. लोकांनी ब्लूबेरी फुकट न नेता कर्करोग रुग्णांना आर्थिक मदत केली हे पाहून शासनाचे डोळे उघडले आणि २०२३ च्या हंगामात पेरू, दक्षिण आफ्रिकेमधील ब्लुबेरीची स्वस्तामधील आयात थांबली. आज स्कॉटलंडमध्ये पिटर आणि इतर शेतकऱ्यांचे ब्लुबेरी उत्पादन पुन्हा स्थिर झाले आहे. आंदोलन कसे असावे? ते हिंसक तर नकोच उलट शांततेत दातृत्वाने भरलेले असावे. अन्नधान्य, फळे-भाजीपाला, कंदमुळे, दूध यांचा जनआंदोलनाच्या माध्यमातून होणारा नाश हा उपाशी जिवांच्या पोटावर मारलेल्या लाथेप्रमाणे असतो. भूक म्हणजे काय? तिची वेदना कशी असते? हे भुकेल्या व्यक्तीला भेटल्यावरच कळते. कृषी उत्पादनाची किंमत पैशात न करता काळ्या आईने कष्टाने उत्पादित केलेले अन्न प्रसादाप्रमाणे उत्पादकांच्या झोळीत टाकले आहे, एवढे समाधान जरी शेतकऱ्‍यांना प्राप्त झाले तर या सारखे दातृत्व आपोआप घडत जाते.
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com