
महारुद्र मंगनाळे
Indian Agriculture : गेले चार दिवस पूर्णवेळ शेतकरी बनलो होतो. अर्थात हे गरजेचं होतं. शेतीतील कामं त्या त्या वेळी केली नाहीत तर मोठा फटका बसतो. ऐन हंगामात सालगडी सुट्टीवर गेल्याने मला या कामांमध्ये सहभागी होणं गरजेचं होतं. नरेशवर कामाचा ताण पडतोय. जनावरांचं चारा पाणी करणं, शेण काढणं आणि पुन्हा फवारणी करणं, हे थकवणारं आहे. आज सकाळी गजराज गवत तोडणं, त्याची कुट्टी करणं, शेण ओढणं या कामात मी त्याला मदत केली.
फवारणीला पाईप ओढण्यासाठी सोबत होतो. दुपारनंतर फवारणी सोबत पाईप ओढण्याचं काम केलं. सवितावर पाईप ट्रँक्टरला गोळा करणं, सोडणं, ट्रँक्टर बंद, चालू करणं ही जबाबदारी होती. एसटीपी फवारा घेतलाय. ६५० फुट नळी. ४० हजाराची गुंतवणूक झाली. पण सोयही झाली. या फवारणीसाठी एकूण पाचजण लागतात. माणसांची जुळवाजुळव करणं महाकठीण. स्वत: सहभागी झाल्याशिवाय पर्याय नाही. हे सगळं करूनही सकाळी शेततळ्यावर लेकरांसोबत फिरणं, थोडावेळ सायकलिंग करणं, निवांत काळी कॉफी पिणं चालूच असतं. मी माझं आवडीचं जगणं जगतोच!
सध्या सोयाबीन बरं म्हणण्यासारखं आहे. दोन एकर रानात तणामुळं सोयाबीन दिसतच नाही. जेवढी हलकी जमीन तेवढी तणं जास्त. जेवढे म्हणून तणाचे प्रकार आहेत ते सगळे आमच्या शेतात आहेत. मी बालपणापासून ही सगळी तणं बघत आलोय. मोठं कठीण काम आहे या तणांचा बंदोबस्त करणं.
आणखी पावसाळ्यासारखा पाऊस झालाच नाही. त्यामुळं विहीरीतील पाणी दहा-बारा फुटापलीकडे वाढलं नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी आशा असते. पण सायंकाळपासून आकाश निरभ्र बनलयं. पावसाचं काहीच चिन्ह नाही. तरीही शेतीतील पीक मशागतीची सगळी काम करावीच लागतात. ती थांबवता येत नाहीत. एवढ्या अनिश्चिततेतही शेतकरी कामात व्यस्त आहे तो
उद्या पाऊस पडेल या आशेवर! शेतकरी केवळ या आशेवरच जगतो. काहीही घडलं तरी शेवटपर्यंत ही आशा जिवंत ठेवायला हवी. फक्त ही आशाच शेतकऱ्यांना जगवते! आता बेक्कार चांदणं पडलंय. चंद्र भीतीदायक वाटतो या दिवसात!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.