सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी पडलेल्या दरामुळं हैराण आहेत. हमीभावाच्या खाली दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाच भावना आहे. तर दुसरीकडे मात्र सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाचं संशोधन भोपाळ येथील केंद्रिय कृषी यांत्रिकीकरण संस्था म्हणजेच सीआयएईने केलं आहे. सीआयएईनं सोयाबीन पिकांवर पडणाऱ्या रोगांची अचूक माहिती देणारं एक यंत्र विकसित केलं आहे. या यंत्राच्या मदतीने सोयाबीन पिकावर पडलेल्या रोगाची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पिकांवरील किड-रोगाचे अचूक पद्धतीने व्यवस्थापन करता येणार आहे.
बहुतांश वेळा सोयाबीन पिकावर किड-रोगांचं निदान होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा किटकनाशकांवर खर्च होतो. तर दुसरीकडे उत्पादनाला फटका बसतो. परिणामी दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागतं. या दुहेरी खर्चाला आटोक्यात ठेवण्यासाठी सीआयएईने यंत्र विकसित केलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पाच प्रकारच्या किड-रोगांची माहिती मिळू शकते. तसेच फ्रोजी लीफ स्पॉट, मोझॅक आणि यलो मोझॅक यासारख्या रोगांचाही अंदाज या यंत्राद्वारे लावता येणार आहे, असा सीआयएईने दावा केला आहे.
या यंत्राच्या मदतीने शेतकरी सोयाबीनवरील रोगाची लक्षणे ओळखू शकतो आणि त्यानुसार व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे चुकीच्या किटकनाशकांच्या फवारणीला ब्रेक लागेल. तर शेतकऱ्यांच्या वेळेतही बचत होईल. योग्य किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे खर्चातही बचत होईल. बहुतांश वेळा शेतकरी एखाद्या किटकनाशकाने रोग नियंत्रणात आला नाही तर दुसऱ्या किटकनाशकाची फवारणी करतात. त्यामुळे खर्चात वाढ होते. परंतु सोयाबीनवरील रोगांची पूर्वसूचना हे यंत्र देतं. त्यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनाला फटका बसत नाही.
दरम्यान, अन्न आणि फूड अँड अॅग्रीकल्चरच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरातील २० ते ४० टक्के पिकांचे नुकसान किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होते. त्यामुळे किड रोगांचे निरीक्षण आणि लक्षणे समजणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. भोपाळ येथील सीआयएई ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत विविध शेती यंत्रांवर संशोधन करते. याच संस्थेनं सोयाबीन पिकावरील किड-रोगांच्या नियंत्रणासाठी यंत्र विकसित केलं आहे. या यंत्रावरील माहिती शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईलद्वारे मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.