Dragonfruit Farming : दुष्काळात शोधला ड्रॅगनफ्रूटचा हुकमी पर्याय

Dragonfruit Production : सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील आवंढी येथील संभाजीराव कोडग यांनी १२ वर्षांपूर्वी ड्रॅगनफूटची लागवड केली.
Dragonfruit Farming : दुष्काळात शोधला ड्रॅगनफ्रूटचा हुकमी पर्याय

अभिजित डाके

Sangali News : सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील आवंढी येथील संभाजीराव कोडग यांनी १२ वर्षांपूर्वी
ड्रॅगनफूटची लागवड केली. राज्यात हे फळ लोकप्रिय करण्यासाठी तसेच त्याला बाजारपेठ
मिळवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्याला आज चांगले यश आले आहे. आज साडेचार एकरांत त्यांची लागवड आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना चांगला पीक पर्याय देण्याच्या दृष्टीने त्यातील पथदर्शक व मार्गदर्शक म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील, संशोधनवृत्ती जपणारे
आहेत. तालुक्याच्या उत्तरेला आवंढी गाव वसलं असून तिन्ही बाजूला डोंगर आहेत. भरपूर पाऊस झाला तरच विहीरी, कूपनलिकांच्या पातळीत वाढ होते. त्याच पाण्यावर शेतीचे सिंचन होते. बहुतांश शेती पावसावरच अवलंबून असल्याने बाहेरच्या गावात जाऊन उदरनिर्वाहाची वेळ अनेकांवरक यायची.

उदरनिर्वाहासाठीचे कष्ट

गावातील संभाजीराव कोडग यांची तीन एकर शेती आहे. वडील रामचंद्र, पत्नी विद्या, आयआयटी मणीपूर येथे शिकणारा प्रतीक, एमबीएचे शिक्षण घेणारी प्रतिक्षा तर बारावीचे शिक्षण घेणारी सोनाली ही मुले असा सहा सदस्यांचा हा परिवार आहे. पूर्वी घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शेतात राबायचं आणि पोटा-पाण्याची खळगी भरायची हाच जणू शिरस्ता होता. संभाजीरावांचे वडील यवतमाळ भागात जिनिंग कंपनीत १९८० ते २००० पर्यंत हंगामी काम करण्यासाठी जायचे. त्यातील पैशांवर घर चालायचं. अशातच संभाजीरावांनी बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सन २००० च्या दरम्यान
वडिलांकडून शेतीची सूत्रे हाती घेतली.

दुष्काळात पिकांचे पर्याय

शेती शाश्वत करायची तर आधी पाण्याची सोय केली पाहिजे या विचाराने बोअर घेतले.
त्याला पुरेसं पाणी लागलं. सन २००१ मध्ये बॅक ऑफ महारष्ट्राचे ९६ हजारांचे कर्ज घेऊन द्राक्षबाग घेतली. सन २००३ मधील दुष्काळात ती वाळून गेली. पण लढण्याची जिद्द अफाट असल्याने
संभाजीराव खचले नाहीत. त्यांनी नव्या उमेदीनं २००५ मध्ये डाळिंब बाग घेतली. चांगले उत्पन्नही घेतले. परंतु दुष्काळामुळे २०११ मध्ये हे पीकही थांबवावे लागले.

Dragonfruit Farming : दुष्काळात शोधला ड्रॅगनफ्रूटचा हुकमी पर्याय
Agriculture Technology : मशागतीसाठी दुचाकीच्या जुगाडातून शोधला स्वस्त पर्याय

ड्रॅगनफ्रूटचा मिळाला मार्ग

विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतीत अजून यश हाती येत नव्हते. त्यातून प्रभावी मार्ग शोधणे गरजेचे होते. जतचे कृषी पर्यवेक्षक संभाजी माळी यांचा ड्रॅगन फ्रूट पिकाबाबत थोडा फार अभ्यास होता. अवर्षणग्रस्त स्थितीत ड्रॅगन फ्रूटचा पर्याय वापरून पाहावा असे त्यांनी सुचवले. पण या फळाबाबत
काहीच माहिती नसल्याने लागवडीचे धाडस तरी कसे करायचे हा प्रश्न होता.
मग संभाजीरावांनी सन २०११- १२ च्या दरम्यान अभ्यास सुरु केला. गुजरात, कोलकता या भागातील दौरा करून अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. या पिकाला पाणी कमी लागते. अतिवृष्टी झाली तरी नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात पीक
तग धरुन राहते ही माहिती मिळाली. बाजारपेठही जाणून घेतली. अखेर कोलकता येथून दहाहजार काड्या विकत घेऊन शेतात रोपे तयार केली. त्यातून सात हजार रोपे तयार झाली. सन २०१२ मध्ये दोन एकरांत पहिली लागवड केली. अनुभव हाच प्रत्यक्ष गुरू ठरला. चुकाही झाल्या. त्या सुधारत व्यवस्थापन सुरू ठेवले. पहिल्या वर्षी एकरी एक टन उत्पादन मिळाले. पण त्याचा आनंद वेगळा होता.

Dragonfruit Farming : दुष्काळात शोधला ड्रॅगनफ्रूटचा हुकमी पर्याय
Agriculture Mechanization : मजुरांच्या समस्येवर शोधला यांत्रिकीकरणाचा पर्याय

विक्रीसाठी केले प्रयत्न

त्या काळात ड्रॅगनफ्रूट हे फळ राज्यात फार कमी माहिती होते. त्याची लोकप्रियता वाढवणे गरजेचे होते.
त्या दृष्टीने संभाजीरावांनी फळातील पोषक घटकांच्या अनुषंगाने प्रयोगशाळेतील अहवाल घेतला. जत शहरातील डॉक्टरांना तो दाखवला. त्यांच्याकडून हे फळ आरोग्यास उपयुक्त असल्याचे प्रमाणपत्र
मिळाले. त्या आधारे जत आणि सांगली भागातील फळविक्रेत्यांकडे फळविक्रीसाठी आग्रह केला. परंतु नवे फळ असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद नव्हता. परंतु संभाजीरावांनी ग्राहक मी देतो, विक्री झाल्यानंतर तुम्ही पैसे द्या अशी त्यांना विनंती केली. अनेक प्रयत्नांनंतर हळूहळू विक्री व्यवस्था
उभी राहिली. मग सांगली, कोल्हापूर येथील बाजारपेठा मिळवायला सुरवात केली.

आजची ड्रॅगनफ्रूटची शेती (ठळक बाबी)

-एकूण साडेचार एकर क्षेत्र. पैकी जुने क्षेत्र दोन एकर.
-सन २०१८ मध्ये स्वखर्चाने व्हिएतनामच दौरा. तिथे बाग उभारणीचे तंत्र, मल्चिंगचा वापर, नवे वाण तसेच अन्य तांत्रिक बाबी पाहिल्या. त्यातून उर्वरित क्षेत्रात नवी लागवड.
-लाल, पांढऱ्या व पिवळ्या रंगांच्या जाती.
-वेलींना भक्कम आधारासाठी सिमेंटचे खांब. त्यावर चौकोनी तसेच विना प्लेट अशा पद्धतींचा वापर. -जुन्या लागवडीसाठी एकरी साडेसहा लाख रुपये खर्च. (रोपांव्यतिरिक्त)
-नव्या लागवडीसाठीचा उत्पादन खर्च कमी केला. (एकरी चार लाखांपर्यंत.)
-फळ काढणी हंगाम- जून ते नोव्हेंबर
-एकरी उत्पादन- १५ टन ते त्यापुढे.

अनुदानासाठी पाठपुरावा

ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी अनुदान मिळावे यासाठी संभाजीरावांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, फलोत्पादन विभागाचे संचालक यांच्याकडे चार- पाच वर्षांपासून पत्रव्यवहार केले. भेटी घेतल्या. आज या पिकाला हेक्टरी एक लाख ६० हजार रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. ‘मार्केटिंग’ व्यवस्था, शीतगृह, प्रक्रियेसाठीही संभाजीरावांचा पाठपुरावा सुरू आहे. जतमध्ये त्यांच्या पुढाकाराने कृषी विभागाने मदतीने ड्रॅगनफ्रूटची कार्यशाळाही घेण्यात आली. त्यात चांगला
प्रतिसाद लाभला.

संभाजीराव कोडग- ७७९८९३८१०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com