Radhakrishna Vikhe Patil : शेती-शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मैतर

Article by Radhakrishna Vikhe Patil : कृषी खात्याची जबाबदारी मिळाली. खरं सांगतो, पहिल्या मंत्रिपदापेक्षाही मोठा आनंद मिळालेल्या खात्याचा होता.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilagrowon

Radhakrishna Vikhe Patil : साधारण दोन तपं झाली असतील, त्या गोष्टीला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली होती. मंत्री म्हणून कोणतं खातं मिळणार, याची उत्सुकता माझ्यासह कुटुंबीय, मित्रमंडळींना होती. कृषी खात्याची जबाबदारी मिळाली. खरं सांगतो, पहिल्या मंत्रिपदापेक्षाही मोठा आनंद मिळालेल्या खात्याचा होता. आमचं कुटुंब शेती-मातीतलं. आजोबा ‘पद्मश्री’ विखे पाटील, वडील माजी केंद्रीय मंत्री आणि ‘खासदारसाहेब’ बाळासाहेब यांचं शेती-शेतकऱ्यांशी घट्ट नातं. शेतकऱ्यांचं हित डोळ्यांपुढे ठेवूनच ‘पद्मश्री’ सहकाराचा झेंडा घेऊन उतरलेले. खासदारसाहेबांचं समाजकारण-राजकारण शेतीप्रश्‍नाशीच निगडित होतं.

शेती-शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेणं, त्यावरचे उपाय शोधणं याच संस्कारात मी वाढलो. शिक्षणही कृषी शाखेच्या पदवीचं होतं. आपल्या आवडत्या विषयात काम करण्याची संधी मिळते, याच्यासारखा आनंद कुठलाच नसतो. तोच मला झाला होता. कृषी आणि पणनमंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारी व अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने वेगवेगळे निर्णय घेतले. नुसते निर्णय घेऊन थांबलो नाही, तर त्याच्या पुरेपूर अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले.

‘एक खिडकी’ योजनेची राज्यात सर्वांत प्रथम अंमलबजावणी झाली ती कृषी खात्यामध्ये. देशातील सर्वांत मोठ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज’ प्रदर्शनाचं आयोजन १९९८मध्ये मुंबईत करण्यात आलं. कृषी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय याच काळात झाला. शेतकऱ्यांना उत्पादित मालाची विक्री करण्याची संधी देण्यासाठी शेतकरी ते ग्राहक योजना, ‘फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यां’ची स्थापना, शाश्‍वत कोरडवाहू शेती मोहीम, प्रत्येक जिल्ह्यात कृषी व धान्य महोत्सवांचे आयोजन असे अनेकविध निर्णय कृषी मंत्रालयाने घेतले.

या सगळ्यात खंत एकाच गोष्टीची वाटत होती, की हे विषय व्यापकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारं व्यासपीठ तेव्हा उपलब्ध नव्हतं. सरकारने आपल्यासाठी अनेक चांगल्या योजना आखल्या आहेत, निर्णय घेतले जात आहेत आणि ते आपल्या हिताचे आहेत, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत अभावानेच पोहोचत होतं. असं काही माध्यम हवं, असं तेव्हा सारखं वाटायचं. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली; पण त्याला मर्यादा होत्या. शेती आणि शेतीवर आधारित अर्थव्यवस्था हा त्यांचा ‘फोकस पॉइंट’ नव्हता.

Radhakrishna Vikhe Patil
Agriculture Technology : ट्रॅक्टर : शेती विकासातील अष्टपैलू यंत्र

मनातली ही खंत दूर करणारी एक बातमी १८ वर्षांपूर्वी ऐकायला मिळाली. ती होती फक्त शेती, शेतकरी आणि त्यांचे प्रश्‍न यांना वाहिलेलं मराठी वृत्तपत्र सुरू होत असल्याची. ‘ॲग्रोवन’चा पहिला अंक पाहिला आणि वाटलं, की अशाच प्रकारचं व्यासपीठ आपल्याला अपेक्षित होतं. याची सुरुवात एक दशकापूर्वी झाली असती तर?

आपल्याकडे भलेभले शेतकऱ्यांना ‘अडाणी’ समजतात. हाच पूर्वग्रह बाळगून शेती-शेतकऱ्यांना पांडित्यपूर्ण सल्ले देतात. पूर्वीच्या काळी बहुसंख्य शेतकरीवर्ग लौकिकार्थाने निरक्षर असेल; पण तो अडाणी खचितच नव्हता. एका सरळ आणि आडव्या रेषेत दिसणारी रोपं त्याला भूमितीचं ज्ञान असल्याचा पुरावा देतात. प्रत्येक रोपाला पाणी मिळेल याची तो घेत असलेला खात्री त्याचं सिंचनाचं ज्ञान स्पष्ट करतं. वातावरणातील बदलांचा अचूक अंदाज त्याला घेता येत होता.

या शेतकऱ्यांकडे आधुनिक ज्ञान किंवा अक्षरओळख नव्हती, ही गोष्ट खरी. नेमकी तीच कमतरता दूर करण्याचा संकल्प सोडत ‘ॲग्रोवन’ची सुरुवात झाली. या दैनिकाने अठरा वर्षांच्या कारकिर्दीत काय केलं, असं कोणी विचारलं, तर माझं एका वाक्याचं उत्तर आहे - या वृत्तपत्रानं शेतकरी घडवले! शेती क्षेत्रामध्ये नवनवीन काय घडतंय याची बित्तंबातमी सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. पारंपरिक पत्रकारितेची प्रबोधनाची मूल्यं जपत आणि नवीन शैली अंगीकारत त्यांनी आधुनिक जग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

एक संस्कृत वचन आहे -

‘कृषिं विना न जीवन्ति जीवाः सर्वे प्रणश्यति।

तस्मात् कृषिं प्रयत्नेन कुर्वीत सुखसंयुतः॥’

त्याचा अर्थ असा, की शेतीविना कोणताही जीव जगणार नाही. तीच सर्वांची प्राणहर्ती आहे. त्यामुळेच मन लावून शेती करावी आणि समृद्धीकडे वाटचाल करावी.

‘ॲग्रोवन’ची आजवरची पूर्ण वाटचाल, याच पद्धतीने झालेली दिसते. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्मभान आलं, नव्या जगाची माहिती मिळाली. हे वृत्तपत्र म्हणजे अनेक गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मार्गदर्शक बनलं. महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइड’ ही भूमिका बजावणारं हे दैनिक आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून ‘ॲग्रोवन’बाबत माझं निरीक्षण असं आहे, की शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या प्रसार-प्रचारासाठी या दैनिकाची मदत होते. त्यामुळे सरकारच्या योजना अधिक सक्षमपणे अमलात आणता येतात आणि त्याचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचविता येतो.

Radhakrishna Vikhe Patil
Banana Industry Success Story : आखाती देशांपर्यंत नावाजलेला केळी उद्योगातील ‘स्टार’

शेजारच्या राज्यांत, देशात आणि अगदी परदेशांतही शेतीमध्ये काय काय बदल घडतात, याची हे दैनिक बारकाईने नोंद घेतं. बदलांचं ज्ञान आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवितं आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधण्यास मदत करतं. सरकार पोहोचणं कठीण होतं, अशा दूरवरच्या ठिकाणापर्यंत आपलं वृत्तपत्र पोहोचतं. सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणूनच ते एक प्रकारे काम करीत असल्याचं वेळोवळी जाणवलं आहे. शेती-प्रक्रिया उद्योगातील संपूर्ण माहिती याच व्यासपीठावर उपलब्ध होते. राज्यात कृषी विस्तारासाठी या दैनिकाची मोठी मदत झाली आणि भविष्यातही होईल, हे मला मोकळेपणानं सांगितलं पाहिजे.

साधारण दीड-दोन वर्षांपूर्वी देशभरात लम्पी या जनावरांच्या साथरोगाने धुमाकूळ घातला. त्यामुळे पशुधन, दुधाचे उत्पादन यावर विपरित परिणाम झाला. महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागानं वेळीच दक्षता घेऊन उपाययोजना केल्याने तुलनेनं कमी नुकसान झालं. पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात या दैनिकाची भूमिका महत्त्वाची ठरली. गोठ्याच्या स्वच्छतेबाबत त्यांनी केलेलं प्रबोधन उपयुक्त होतं.

असं सगळं असलं, तरी ‘ॲग्रोवन’ हे फक्त शेतकऱ्यांचं वृत्तपत्र आहे का? मी तरी यावर उत्तर देईन, की ‘नाही’! सरकारच्या कृषी खात्यासह अन्य सर्व खात्यांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी हे दैनिक वाचतातच. शेती शाखेचे व कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी, शेतीचे अभ्यासक, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचं स्वप्न पाहणारे होतकरू तरुण, माझ्यासारखे लोकप्रतिनिधी त्याचे नियमित वाचक आहेत.

शेती आणि त्याबाबतच्या समस्या म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या; समाजाच्या इतर घटकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज काय, असा एक दृष्टिकोन प्रचलित झालेला आहे. पण शेतकरी, तो काढत असलेलं उत्पादन हे सारं तुमच्या-आमच्या सर्वांच्या दैनंदिन जगण्यातला महत्त्वाचा घटक आहे, याची जाणीव या दैनिकाने करून दिली. वृत्तपत्रांच्या इतिहासात याची नोंद घेतली जाणं अपरिहार्य आहे.

प्रगत, आधुनिक तंत्राने शेती करणारे, मोठे धारणाक्षेत्र असलेले यांच्यापासून ते अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी या सर्वांसाठी हे दैनिक म्हणजे जिवाभावाचा मित्र आहे. या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या अनेक यशकथांमुळे हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या घराचे नावच ‘ॲग्रोवन’ ठेवले, याहून दुसरी दाद काय हवी!

शेतीशास्त्राबद्दल प्राचीन काळापासून परिचित असलेल्या ‘कृषि पराशर’मध्ये ‘कृषिर्धन्या कृषिर्मेध्या जन्तूनां जीवनं कृषि:।’ असे वचन आहे. शेतीमध्ये समृद्धी आणि शहाणीव आहे; मानवी जीवनाचा तीच बळकट पाया आहे, असा त्याचा अर्थ. मला वाटतं याच वचनानुसार या दैनिकाचा आजवरचा प्रवास आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com