Milk Processing : दूध प्रक्रिया उद्योगात तयार झाला ब्रॅण्ड

कोरोना काळात दूध शिल्लक राहू लागल्याने बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून दही, श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड, खवा, तूप निर्मितीला सुरुवात केली. दुग्धप्रक्रिया उद्योगातून मिलिंद गाढवे यांनी अर्थकारणाला चांगली गती दिली आहे.
Milk Processing
Milk Processing Agrowon

Milk Processing Industry सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरामध्ये रेल्वे स्थानक असल्याने मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात आले आणि ऊस लागवड (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणात आहे. या गावातील मिलिंद (शंभो) दिलीप गाढवे हे बीसीए शिक्षण घेतलेले ३४ वर्षीय युवा शेतकरी.

त्यांच्या घरची चार एकर शेती असून ऊस, आले, तसेच चारा पिकांची लागवड (Fodder Cultivation) आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ते गाई, म्हशींचे संगोपनही (Animal Rearing) करतात.

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता गाढवे यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दहा वर्षांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलनास (Milk Collection) सुरुवात केली.

टप्प्याटप्प्याने मागणीनुसार दूध संकलन वाढवत नेले. कोरेगाव येथील संकलन केंद्र तसेच गावोगावी जात दररोज सुमारे ७०० लिटर दुधाचे संकलन होऊ लागले.

दूध प्रक्रियेला सुरुवात

दूध संकलनाची घडी बसली असतानाच कोरोनाचे आगमन झाले. यामुळे गाढवे यांच्याकडे संकलन केलेले दूध शिल्लक राहू लागले. या दुधाचे काय करायचे काय, असा प्रश्‍न तयार झाला. यावर उपाय म्हणून गाढवे यांनी दहीनिर्मिती आणि विक्री सुरू केली.

बाजारपेठेचे गाव असल्याने जागेवरून तसेच स्थानिक दुकानदारांकडून दह्याची विक्री होण्यास मदत झाली. दही निर्मिती आणि विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाल्याने मिलिंद यांनी दूध प्रक्रिया उद्योग वाढविण्याचे नियोजन केले.

Milk Processing
Jalgaon Dairy : जिल्हा दूधसंघातील वादग्रस्त नोकरभरती रद्द

त्यासाठी पहिल्यांदा प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली. प्रक्रियेबाबत संबंधित व्यक्तींचा सल्ला घेतला. त्यानंतर प्रक्रियेसाठी श्रीखंड मिक्सर, बटर चर्नर, एक हजार लिटर क्षमतेचे बीएमसी यंत्र, पॅकिंग यंत्र, प्रक्रिया पदार्थ साठविण्यासाठी सहा फ्रिज आदी साहित्यांची खरेदी केली.

या उद्योगाच्या उभारणीसाठी आतापर्यंत दहा लाखांवर गुंतवणूक झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी गाढवे यांनी बाजारपेठेत एक गाळा घेतला आहे. या ठिकाणी प्रक्रिया उद्योग आणि विक्री केली जाते.

या प्रक्रिया उद्योगास त्यांनी ‘चेतन मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट’ असे नाव दिले आहे. प्रक्रिया व्यवसायासाठी आवश्यक एफएसआयचे नोंदणी प्रमाणपत्रदेखील त्यांनी घेतले आहे.

Milk Processing
Dairy Business : दुग्ध व्यवसाय पूरक नव्हे, मुख्य व्यवसाय म्हणून करा

शेतकऱ्यांकडून दररोज ७०० लिटर दुधाचे संकलन होते. यापैकी ५५० लिटर दूध प्रक्रिया पदार्थ निर्मितीसाठी वापरले जातात. दररोज सरासरी १५० लिटर म्हशीच्या दुधाची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. गाढवे यांच्या गोठ्यातील चार गाई, चार म्हशींपासून दररोज ३० ते ४० लिटर दूध संकलन होते.

हे दूधदेखील प्रक्रियेसाठी वापरले जाते. दर महिन्याला ५०० किलोपर्यंत प्रक्रिया पदार्थांची निर्मिती होते. लग्नसराईत मागणीनुसार प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ होते. पावसाळा वगळता दहा महिने प्रक्रिया व्यवसाय गतीने सुरू असतो. दरमहा या उद्योगात पाच लाखांची उलाढाल होते.

दुग्धजन्य प्रक्रिया व्यवसायात मिलिंद गाढवे यांना कुटुंबाची चांगली मदत होते. पदार्थ निर्मिती आणि पॅकिंगसाठी आई अरुणा, पत्नी योगिता, बंधू मनोज, चुलत बंधू कौस्तुभ, चुलते राजेंद्र यांचे मार्गदर्शन मिळते.

ग्राहकांची मागणी वाढत असल्याने भविष्यात प्रक्रिया उद्योगात वाढ करण्याचे गाढवे यांचे नियोजन आहे. मिलिंद दैनिक ‘अॅग्रोवन’चे नियमित वाचक असून, यामधील प्रक्रिया उद्योगांच्या यशकथा आणि प्रक्रियेविषयी लेखातील माहितीचा अभ्यास करून स्वतःच्या प्रक्रिया उद्योगामध्ये चांगले बदल केले आहेत.

प्रक्रिया उद्योगातील महत्त्वाच्या बाबी

दररोज तीन संकलन केंद्र तसेच परिसरातील पाच गावातील सत्तरहून अधिक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी.

संकलित दूध गरम करून थंड केल्यावर प्रक्रियेसाठी वापर. स्वच्छता तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन.

वेगवेगळ्या यंत्राद्वारे प्रक्रिया होऊन दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती. चार मोठ्या फ्रीजमध्ये पदार्थांची साठवणूक.

फॅटनुसार शेतकऱ्यांना दरवाढ. गाईच्या दुधास ३८ रुपये, म्हशीच्या दुधास ५२ ते ५३ रुपये दर.

शेतकऱ्यांकडून संकलन केलेल्या दुधाची रक्कम दर १५ दिवसांनी जमा.

पनीर, खवा, श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, सीताफळ रबडी, बासुंदी, दही, ताक, तूप आदींचे २५० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंत पॅकिंग करून विक्री.

श्रीखंड १२० ते २८० रुपये किलो, रबडी १८० ते २०० रुपये किलो, तूप ६०० रुपये किलो, दही १०० रुपये किलो, ताक २५ रुपये लिटर, म्हशीचे दूध ६० रुपये लिटर, मलई पनीर ४० रुपये १०० ग्रॅम दराने विक्री. बासुंदीमध्ये गुलकंद, ड्रायफ्रूट, पिस्ता असे स्वाद. तुपाची देखील स्वतंत्र विक्री यंत्रणा.

तयार दुग्धजन्य पदार्थांची स्वतःचे विक्री केंद्र तसेच कोरेगाव तालुक्यातील विविध दुकाने, लग्न कार्यालयात मागणीनुसार पोहोच. आकर्षक पॅकिंगमध्ये विविध पदार्थांची विक्री. लग्न समारंभ, हॉटेल व्यावसायिकांना पनीर, खवा इतर पदार्थ पोहोच. ग्राहकांच्या सूचनेनुसार पदार्थांच्या गुणवत्ता, चवीत बदल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com