Jalgaon News : ‘‘केळी हे महत्त्वाचे फळ पीक असून, त्यात नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार केळीच्या शेतीत बदल घडवून आणल्यास प्रत्येक केळी उत्पादक हा निर्यातक्षम केळी उत्पादन किंवा पीक घेऊ शकतो,’’ असे मत तज्ज्ञ, मान्यवरांनी विटनेर (ता.चोपडा, जि.जळगाव) येथे आयोजित अॅग्रोवन संवाद कार्यक्रमात व्यक्त केले.
अॅग्रोवन व रेवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.ली.यांच्यातर्फे दर्जेदार केळी लागवड तंत्र व पाणी व्यवस्थापन या विषयावर विटनेर येथे मरिआई माता मंदिराच्या प्रांगणात परिसंवाद घेण्यात आला. यात जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ.विजयराज गुजर, तरडी (ता.शिरपूर) येथील निर्यातक्षम केळी उत्पादक पद्माकर जगन्नाथ पाटील, रेवुलीस इंडिया इरिगेशन कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी मार्गदर्शन केले. चोपडा येथील रेवुलीस इरिगेशन इंडिया प्रा.ली.चे अधिकृत वितरक सुदर्शन पाटील, भूषण धनगर, शेतकरी श्याम पाटील, दिलीपआबा पाटील, रेवुलीस इरिगेशन इंडिया कंपनीचे संकेत निकम उपस्थित होते.
पद्माकर पाटील (तरडी, ता.शिरपूर) म्हणाले, ‘‘केळी पिकात मोठी संधी आहे. परंतु बाजारपेठेतील गरज, मागणी यानुसार निर्यातक्षम केळी उत्पादन आवश्यक आहे. केळी उत्पादनात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या गावांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा त्याग शेतकऱ्यांनी केलेला नाही. आपण निर्यातक्षम केळी उत्पादन करू शकत नाही, मोठा खर्च लागतो, अशी मानसिकता आहे. ही मानसिकता, नकारात्मकता शेतकऱ्यांनी सोडून फ्रूटकेअर, आधुनिक सिंचनतंत्र, ऑटोमेशन, मिनी ऑटोमेशनचा अवलंब करावा.’’ असेही पाटील म्हणाले.
खतांचा योग्य वापर आवश्यक : डॉ.गुजर
केळी पिकाला आवश्यक ती खते, अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात किंवा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार देण्याची गरज आहे. निर्यातक्षम केळीची मागणी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले दर मिळतील. तापमानााचा फटका बागांना बसत आहे. बागांची पाने फोटली असून, ती प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करू शकत नाही. यामुळे बागांची वाढ कमी दिसत आहे.
उष्णता अधिक असल्याने झाडातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणात केवोलिनची पूड फवारता येईल. कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) केळीत येत आहे. पण तो येण्यामागे वेलवर्गीय पिकांचे कारण आहे. काकडी, कलिंगड, खरबूज आदी पिके केळीभोवती घ्यायला नको. सीएमव्हीबाबत बागेत सतत निरीक्षण करावे. रोगग्रस्त झाड काढून ते बागेबाहेर लागलीच फेकावे. जैविक कीडनाशक, जिवाणू खते, बुरशीनाशकांचा उपयोग करावा. त्याचे चांगले परिणाम बागेत दिसतात, असेही श्री. गुजर म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.