Amravati News : मिड सिझन भरपाईसाठी विमा कंपनीकडे जिल्ह्यातून तब्बल १ लाख ५७ हजार पूर्वसूचना दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र कंपनीने कोणतेही कारण न देता यातील तब्बल ९७ हजार ३९८ पूर्वसूचना नाकारल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
शासनाने गेल्या खरीप हंगामात केवळ एक रुपयात पीकविमा योजना राबविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा याला मोठा प्रतिसाद मिळत तब्बल ४ लाख ०९ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरत योजनेत सहभाग नोंदविला.
त्यानंतर जुलै महिन्यात २६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर विमा भरपाई मिळावी या उद्देशाने १ लाख ५६ हजार ६४५ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल केल्या. नियमानुसार ७३ तासाच्या आत ही कार्यवाही झाली. कंपनीकडून त्यानंतर १ लाख ३८ हजार ३३८ अर्जाचे पंचनामे करण्यात आले.
मात्र १८,३३८ शेतकऱ्यांचे पंचनामे अद्यापही अपूर्ण आहेत. यातील बहुतांश शेतकऱ्यांना भरपाईच देण्यात आली नाही. त्यासोबतच ९७,३९८ पूर्वसूचनाच कंपनीकडून नाकारण्यात आल्या. या शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे परतावा मिळणार असल्याचे सांगितले जाते.
मात्र उंबरठा उत्पन्न पूर्वीपासूनच कमी दर्शविले जात असल्याने पीक कापणी प्रयोगातून मिळणारे उत्पन्न हे निकषानुसार अधिकच असणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचितच राहावे लागेल, अशी भीती वर्तविली जात आहे.
विमा योजना अवघ्या एक रुपयात असल्याने याला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकरी, राज्य व केंद्र शासनाचा हिस्सा मिळून ३८२.२४ कोटी रुपयांचा भरणा कंपनीकडे करण्यात आला. त्यातुलनेत आतापर्यंत ३१,६८४ शेतकऱ्यांना अवघा २९.०२ कोटी रुपयांचाच परतावा देण्यात आला आहे.
त्यामध्ये अचलपूर १.५७ कोटी, अमरावती १.२५, अंजनगावसूर्जी ४१ लाख, भातकुली १.५६ कोटी, चांदूर रेल्वे १.६६ कोटी, चांदूरबाजार १.५६ कोटी, चिखलदरा २६ लाख, दर्यापूर ७३.८९ लाख, धामणगावरेल्वे ५४.४८ लाख, धारणी १.३४ कोटी, मोर्शी २.४६ कोटी, नांदगाव ६.१२ कोटी, तिवसा ४३.३९ लाख याप्रमाणे तालुकानिहाय्य परताव्याचा समावेश आहे.
पूर्वसूचना प्राप्त १,५६,६४५
सर्व्हेक्षण पूर्ण १,३८,३३८
सर्व्हेक्षण प्रलंबित १८,३०७
पूर्वसूचना नाकारल्या ९७,३९८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.