Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance Return : सहा लाख शेतकऱ्यांना ८५३ कोटींचा विमा परतावा

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी (ता. ८) नाशिक जिल्ह्यातून झाली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विम्याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिली.
Published on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी (ता. ८) नाशिक जिल्ह्यातून झाली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विम्याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिली. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये विमा रक्कम येत्या ३१ ऑगस्टपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

पीकविमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांसंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पीकविमा कंपनीचे अधिकारी यांसह मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Crop Insurance
Crop Insurance Issue : पीककर्जासाठी परळी तहसीलसमोर निदर्शने

जनसन्मान यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शुक्रवारी (ता. ९) सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेला ८५३ कोटी रुपयांचा परतावा विमा कंपनीकडून येणे प्रलंबित असल्याची माहिती मिळताच मंत्री मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख श्री. दीक्षित यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले.

Crop Insurance
Crop Insurance : गतवर्षीचा ४२७ कोटींचा पीकविमा मंजूर

कंपनीने रक्कम देण्याचे केले मान्य

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्टपर्यंत पीकविमा परतावा रक्कम देण्याचे कंपनीने मान्य केले. त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये २१ दिवसांच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना ७९ कोटींचा लाभ मिळाला होता.

त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसान या पोटी २५ कोटी ८९ लाख मंजूर झाले होते. त्याच्या वाटपाची कारवाई सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदत हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार, सुहास कांदे, माजी आमदार जयंत जाधव आदींनी पीकविम्यासंदर्भात विषय उपस्थित केले. या सर्वांसह लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com