Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाची गळती निघणार तरी कधी? ८० कोटी निधीचं काय झालं

Kalammawadi Dam Kolhapur : काळम्मावाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील शेतीला वरदान ठरले आहे.
Kalammawadi Dam
Kalammawadi Damagrowon

Kolhapur Kalammawadi Dam : मागच्या वर्षी पाऊस कमी होऊनही यंदा काळम्मावाडी धरणात पुरेसा पाणीसाठी शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने खबरदारी घेत उपसाबंदीचे नियोजन केले आहे. दरम्यान मागच्या काही वर्षांपासून काळम्मावाडी धरणाला गळती असल्याने लाखो लीटर पाणी वाया जाते यासाठी शासनाकडून ८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. परंतु यातील एकही रुपया धरणाची गळती काढण्यासाठी वापरण्यात आला नसल्याने यंदाही पावसाळ्यात काळम्मावाडी धरणाची गळती तशीच राहण्याची शक्यता आहे.

धरणाला अनेक ठिकाणी मोठी गळती असल्याने या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यास धोका संभवतो. तत्काळ याची गळती काढली पाहिजे, असा इशारा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून वर्षभर दिला जात होता. यासाठी हिवाळी अधिवेषणात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी जोरदार आवाज उठवत चर्चा केली. त्यानंतर गळती काढण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना राहिले नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर्षी गळती काढण्याचे काम होणे अशक्य आहे.

काळम्मावाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील शेतीला वरदान ठरले आहे. लाखो लोकांची तहान भागवण्याचे काम हे धरण करीत आहे. मात्र, धरणाच्या गळतीचे गांभीर्य सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा करणे सोडलेले दिसून येत आहे. गळती काढली नाही तर धरणाला धोका होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी वारंवार सांगितले आहे. १५ ऑगस्ट २०२३ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीचा पावसाळा झाल्यानंतर गळती काढण्याचे काम तत्काळ सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

आता यावर्षी दुसरा पावसाळा आला तरीही कामाचा पत्ता नाही. यावर्षी हे काम सुरू होईल, याबाबत खात्री देणे अवघड आहे. धरणाला धोका आहे म्हणून लोकांना भीती घालायची आणि दुसरीकडे सोयीनुसार त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सर्व लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांच्या अंगाशी येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

Kalammawadi Dam
Kolhapur Kalmmawadi Dam : यंदा कोल्हापूरातील काळम्मावाडी धरण भरण्याची शक्यता कमीच, जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना

शासनाने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्यक्ष गळती काढण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया राबविण्यास विलंब केला आहे. आता ही सर्वच यंत्रणा लोकसभा निवडणुकीचे कारण देत आहे. लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून लोकसभा लढवली. याच लोकप्रतिनिधींनी गळती काढण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली तरच गळतीचे काम पूर्ण होऊन तेथील लोकांना याचा फायदा होऊ शकतो.

धरणाची सद्य:स्थिती...

१२१ गावांमधील ४१ हजार हेक्टर क्षेत्रांवरील शेतीला पाणीपुरवठा

धरणाला दोन वर्षांत पाच पट गळती वाढली

धरणाच्या गळतीतून एका सेकंदाला ३५० लिटर, तर एका मिनिटाला २१ हजार लिटर पाणी वाया जाते.

याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए एस पवार म्हणाले की ‘काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे काम लवकरच केले जाणार आहे. आचारसंहितेमुळे काही काळ काम थांबले आहे. यावर्षी दोन थरापर्यंतचे काम पूर्ण होईल. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com