Solapur News : पंढरपूर तालुक्यातील भाळवणीच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.५) १९८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
त्यामुळे आता २० जागांसाठी ४३ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, संस्था मतदारसंघातून मालनबाई वसंतराव काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी भगिरथ भालके, गणेश पाटील, युवराज पाटील यांच्या साथीने निवडणुकीसाठी आपले पॅनेल उभे केले आहे.
तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेले विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, प्रा. बी. पी. रोंगे आणि काळेंचे पारंपरिक विरोधक दीपक पवार यांनी आव्हान दिले आहे.
निवडणुकीच्या आधीपासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण काळे गटाकडून संस्था मतदारसंघातून मालनबाई काळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
त्यामुळे आता २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी या आधीच २४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १९८ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलमध्ये कारखान्याच्या २० जागांसाठी सरळ लढत होणार आहे. त्यासाठी ४० जण रिंगणात उतरले आहेत. तर भंडीशेगाव, गादेगाव आणि सरकोली गटात प्रत्येकी एक अपक्ष असे ४३ जण आहेत.
मकाई कारखान्याच्या नऊ जागांसाठी निवडणूक
भिलारवाडी (ता.करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही आता चुरस लागली असून, बागल गटाच्या आठ जागा या आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. पण उर्वरित नऊ जागांसाठी ही निवडणूक लागली आहे.
या निवडणुकीत बागल विरोधक प्रा. रामदास झोळ, सविताराजे भोसले यांसारख्या दिग्ग्जांचे अर्ज अपिलातही अवैध ठरल्याने निवडणुकीत रंगत कमी झाली असली, तरी उर्वरित नऊ जागांच्या निवडणुकीत या नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे बागल गटाला विरोध होणार असल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.