कांदा चाळीला आग लागून २५ ट्रॉली कांदा, दोन दुचाकी खाक

निफाड तालुक्यातील काथरगाव येथे अग्नीतांडव; लाखोंचे नुकसान
Onion
Onion Agrowon

निफाड, जि. नाशिक : तालुक्यातील काथरगाव येथील डॉ. किरण वाघ यांच्या वस्तीवरील कांदाचाळीला रविवारी (ता. १५) लागलेल्या आगीत २५ ट्रॉली साठवलेल्या कांद्याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. यासह चाळीशेजारी असलेले शेती साहित्य, दोन दुचाकी भस्मसात झाल्या आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, काथरगावचे माजी सरपंच राजाराम रामनाथ वाघ, डॉ. किरण जगन्नाथ वाघ आणि कुटुंबीय हे पिंपळस येथे लग्न असल्याने ते बाहेरगावी होते. रविवारी दुपारी दीडच्या दरम्यान आग लागल्याने कांदा चाळ, खतांच्या गोण्या व २ दुचाकी या आगीत जळून खाक झाल्या. कांदा चाळीत काढणी करून नुकतेच २५ ट्रॉली कांदे साठवलेले होते. आग लागल्याचे शेजारच्या नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास उशीर झाला होता. तोपर्यंत या अग्नीतांडवामुळे नुकसान झाले आहे.

या आगीत चाळीजवळील पशुखाद्य, कागद, साठवणूक केलेले कांदा बियाणे, रासायनिक खतांच्या गोण्या, शेतीसाहित्य, स्टार्टर, केबल वायर यांचेही नुकसान झाले आहे. चाळीलगत गायी बांधलेल्या होत्या. घटना पाहणाऱ्या प्रत्यक्ष दर्शननी गायी सोडून दुसरीकडे बांधल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तलाठी यांनी पंचनामा केला असून आगीचे कारण समजू शकले नाही. याबाबत स्थानिक महसुल कर्मचारी यांनी भेट देत पंचनामा केला आहे.

घरातील लग्न असल्याने सर्वजण व शेजारील भाऊबंद बाहेर होतो. वस्ती निर्मनुष्य असताना त्यावेळी दुपारी घटना घडली. अज्ञात समाज कंटकाने हा प्रकार केला आहे. याबाबत निफाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे
डॉ. किरण वाघ, नुकसानग्रस्त शेतकरी, काथरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com