
Pune News: राज्याच्या सिंचन धोरणाला वळण देणारी यंदाची महाराष्ट्र सिंचन परिषद ‘हवामानातील दोलायमानता आणि सिंचन व्यवस्थापन’ या विषयावर केंद्रीत असेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
सोलापूरच्या सांगोला येथील सांगोला महाविद्यालयात भरणाऱ्या या दोनदिवसीय सिंचन परिषदेचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता होईल. स्वागताध्यक्षपद सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड भूषवित असून जलसंपदा सचिव डॉ. संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले व ‘सिंचन सहयोग’चे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांच्यासह राज्याच्या सिंचन क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ व पाणी वापर सोसायट्यांचे पदाधिकारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचे पहिले सत्र ‘सिंचन व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयाला वाहिलेले आहे. यानंतर ‘हवामानातील दोलायमान स्थितीमुळे होणारे अनिष्ठ परिणाम’ या विषयावर डॉ. राहुल तोडमल यांचे बीजभाषण होणार आहे. त्यानंतरच्या सत्रांमध्ये आधुनिक सिंचन प्रणाली, सिंचन व्यवस्थापनाच्या भावी दिशा, थेट विक्री व्यवस्थेतून होणारा आत्मनिर्भर शेतकरी या विषयांवर समूह चर्चा होईल. डॉ. अ. गो. पुजारी, अरुणा शेळके, रावसाहेब पुजारी, बाळासाहेब मेटे व डॉ. बी. डी. पाटील यांच्याकडून पाचव्या सत्रात सिंचन शेतीमधील प्रयोगाची मांडणी केली जाणार आहे.
पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत समारोप
हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) दुपारी चार वाजता या परिषदेचा समारोप होईल. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात राज्याच्या फळबाग शेतीमधील निवडक प्रयोगांचा आढावा सादर केला जाणार आहे. यात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभाकर चांदणे, वसंतराव घनवट, केशव भोसेकर व सुधाकर चौधरी सहभागी होणार आहेत.
महिला उद्योजिका स्नेहल देवानंद लोंढे स्वतःची यशोगाथा या परिषदेत सांगणार आहेत. यानंतरच्या चर्चासत्रात प्रताप चिपळूणकर (प्रयोगशील शेती), डॉ. भगवान कापसे (गटशेती), रा. बा. घोटे (पाण्याची उत्पादकता), नारायण देशपांडे (वृक्ष लागवड), रामलिंग मुगळीकर (निसर्गशेती), अनिरुद्ध पुजारी (शेततळे), मच्छिंद्र सोनलकर व रमेश जवळगे (बांबू शेती) व रजनीश जोशी (जलयात्रा) सहभागी होत आहेत.
दरम्यान, या परिषदेसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या शेतकऱ्यांनी निवासाबाबत संतोष कांबळे (९०२१७७६१६९) तर कार्यक्रम तपशीलाबाबत प्रशांत आडे (९८५००४०५१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.