
Solapur Plane Service : विमानसेवेचा मुहूर्त अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला असून, प्रत्यक्ष तिकीट विक्री सुरू होण्यास आता फक्त दहा दिवस बाकी आहेत. आता, फ्लाय ९१ कंपनीकडून अद्याप कोणतीही तयारी सुरू नाही. मात्र, जिल्हाधिकारी म्हणतात, विमानसेवा सुरू होण्याचा निर्णय निश्चित आहे.
मागील अनेक वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’ करत पुढे ढकललेली विमानसेवा आता २६ मे रोजी सुरू होणार आहे. गोवास्थित कंपनी गोवा- सोलापूर या हवाईमार्गावर पहिली सेवा देणार आहे. याकरिता १६ मेपासून तिकीट विक्री सुरू होणार असल्याचे यापूर्वीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, अद्याप सोलापूर विमानतळावर तिकीट विक्रीच्या अनुषंगाने कोणतीही तयारी झालेली नाही. तसेच फ्लाय ९१ या कंपनीच्या वेबसाइटवर तशी घोषणाही दिसून येत नाही. कंपनीचे कर्मचारी सोलापूरमध्ये नेमके कधी दाखल होणार, याबाबत विमानतळ व्यवस्थापनाकडे कोणतीही माहिती नाही. याबद्दल फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडूनही अधिकृत माहिती देणे टाळले जात आहे.
सेवेबाबत कंपनीची उद्घोषणाच नाही
कोणत्याही खासगी कंपनीकडून नवीन ठिकाणी सेवा सुरू होणार असेल, तर त्याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग केले जाते. मात्र, फ्लाय ९१ या कंपनीकडून सध्या गोव्यात किंवा सोलापूरमध्ये या मार्गावरील विमानसेवेची कुठेही जाहिरात केलेली नाही. यासंदर्भातील उद्घोषणा कंपनीच्या वेबसाइटवर केलेली नाही. याबद्दल फ्लाय ९१ या कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, अद्याप आमच्याकडे अधिकृत माहिती नाही, अशी माहिती मिळताच तुम्हाला कळविले जाईल, असे सांगितले जाते.
फ्लाय ९१ या विमान कंपनीकडून सोलापूर विमानतळावर काही तयारी झाली आहे का, असा प्रश्न सोलापूर विमानतळाच्या सहायक सरव्यवस्थापक अंजनी शर्मा यांना विचारला असता, अद्याप कोणतीही तयारी सुरू नसल्याचे कळविण्यात आले. कंपनीचे कर्मचारी कधी येतील किंवा तिकीट विक्री संदर्भात विचारले असता, याबद्दल कंपनीचे अधिकारीच सांगू शकतील, असे उत्तर मिळाले. गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील जाणकारांकडे चौकशी केली असता, सोलापूरला दिली जाणारी सेवा लांबणीवर पडू शकते, अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
तिकीट विक्री कधी, कशी व कुठे करावी, हा प्रश्न संबंधित विमान कंपनीचा आहे. कोणत्याही परिस्थिती २६ मे रोजी गोवा- सोलापूर ही विमानसेवा सुरू होणार आहे, हे निश्चित आहे.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.