
Pune News: राज्यातील ९२.८९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (ता.२५) दुपारी जमा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूरमधील शेतकरी मेळाव्यातून कळ दाबून ऑनलाइन पद्धतीने देशातील पात्र ९२.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम-किसान’ची एकोणिसाव्या हप्त्यापोटी २२ हजार कोटींची रक्कम जमा केली.
या सोहळ्याला राज्यातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी निवडक शेतकऱ्यांसह दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर कृषी संचालक सुनील बोरकर (निविष्ठा व गुणनियंत्रण), डॉ. कैलास मोते (फलोत्पादन), किसन मुळे (महाराष्ट्र राज्य फलोत्पादन मंडळ) तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाबाजी नारायण बोतरे, दत्तात्रेय वामन टकले, संभाजी शांताराम बाळसराफ, संदीप मारुती दिवसे, ज्ञानेश्वर मुंगसे व इतर प्रयोगशील शेतकरी आणि अधिकारी उपस्थित होते.
विसाव्या हप्त्यासाठी नियोजन
‘पीएम-किसान’मधून प्रतिलाभार्थी दोन हजार रुपयांचा चारमाही हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील हा हप्ता मिळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार ९६७ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा केली आहे. कृषी खात्याच्या क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले नियोजन केल्यामुळे ‘पीएम-किसान’मधील लाभार्थी संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अठरावा हप्ता फक्त ९१.५८ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता व आता त्यात दोन लाखाने वाढ झाली आहे.
या योजनेसाठी राज्यातील जवळपास १.२३ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. मात्र, नोंदणीकृत असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी बँक खाते आधार संलग्न असणे, ई-केवायसी पूर्ण करणे आणि भूमी अभिलेख दोन्ही नोंदी अद्ययावत असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे या अटींमध्ये सध्या ९२.९१ लाख शेतकरी पात्र होत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. या अटींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर मोहीम घेत विसाव्या हप्त्यासाठी शेतकरी लाभार्थी संख्या वाढविण्याकरिता कृषी आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.
‘मंत्री साहेबांना चांगले सांगा’
‘पीएम-किसान’ निधी वितरण सोहळ्यासाठी आलेल्या कृषिमंत्र्यांच्या सभागृहात जमलेल्या शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी मंत्री येण्यापूर्वीच काही सूचना दिल्या. ‘‘मंत्री साहेबांना कृषी खात्याने केलेले चांगले काम आवर्जून सांगा. बाकी इतर विषय काही बोलू नका. कारण हा कार्यक्रम फक्त पीएम किसान योजनेपुरता आहे,’’ असे का अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर एका शेतकऱ्याने, ‘‘आम्ही जे झालं तेच सांगणार. खोटं बोलणार नाही. अनुदान मिळालं तर मिळाल्याचे सांगणार; नाही मिळालं तर नाही सांगणार,’’ अशी रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांची पळापळ झाली. कशीतरी या शेतकऱ्याची समजूत काढण्यात आली. मात्र, या शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेत अवजार अनुदानाबाबत व्यथा मांडली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.