
अरुण चव्हाळ:- ७७७५८४१४२४
Sane Guruji's 125th Birth Anniversary : २४ डिसेंबर १८९९ रोजी महाराष्ट्राच्या पालगड गावात जन्मलेल्या या माणसाने भारत राष्ट्रासाठी आणि जगलौकिकास साजेशी अजरामर कामे केलेली आहेत. अवघ्या ५० वर्षांचे आयुष्य गुरुजींना लाभले. सांगायचे झाले तर,
२४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या काळात त्यांनी देशकार्यासाठी विविध भूमिका कणखरपणाने आणि स्वतः विचार-आचारवंत होऊन पार पाडलेल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या गावचा -मातीचा-कुटुंबीयांचा-सामाजिक आणि नैसर्गिक सद्गुणांचा आणि संस्कारांचा शिडकावा स्वतःच्या जीवनात मुरवून समाजाभिमुखपणा गुरुजींनी स्वतः जपला.
त्यांचे वडील न्यायालयात काम करायचे. त्यांच्या आजोबांपासून हे काम त्यांच्या घराण्यात होत असे. पण घराण्यात ‘प्रामाणिकपणा’ जपल्यामुळे घरची आर्थिक संपन्नता मर्यादितच राहिली. जगरहाटीप्रमाणे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अति सर्वसामान्य राहिलेली आहे. वडिलांच्या माघारी त्यांच्या आईंनी आणि स्वतः साने गुरुजींनी कठीण काळातही कुटुंब सावरले आणि जगण्याचा ध्येयवाद जोपासला.
वडिलांच्या माघारी गुरुजींच्या आईंनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि ते संस्कार गुरुजींनी संवर्धित करून घडवलेले जीवन आपणा सर्वांना जाणवते. कुठलीही सोय नसताना आणि शाळेची फी भरायला एक रुपया त्या काळात हातात नसताना त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. पदवी मिळवली आणि जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये १९२४ ते १९३० अशी सहा वर्षे शिक्षक म्हणून सेवा पार पाडली.
स्वतःला शाळेत फी भरायला पैसे नसलेल्या गुरुजींनी शेकडो मुलांची शालेय फी भरली. अनेकांना आर्थिक मदतीचा हात दिला. 'निर्धन' गुरुजी स्वतः सेवा बजावून 'अर्थार्जन' करायचे आणि 'सेवाभाव' जपायचे, यामुळे तर ते 'गुरुजी' म्हणून सर्वांचेच आदर्श आहेत. विद्यार्थ्यांना ते स्वावलंबनाचे धडे द्यायचे. विद्यार्थ्यांचे वसतिगृह अधीक्षक म्हणून सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांना कर्माचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन नव्हे तर स्वतः कर्म करा आणि कर्मसत्त्व जपा, हा कृतिपाठ दिला.
अंमळनेरमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान केंद्रात तत्त्वज्ञानाचा अभ्यास तर केलाच, पण स्वतः तत्त्ववादी होऊन तत्त्वांचे पालनही केले. विद्यार्थ्यांचे कपडे पिळून टाकणारे गुरुजी, विद्यार्थ्यांच्या खोल्या स्वच्छता करणारे गुरुजी विद्यार्थ्यांनी अनुभवले आणि तेही स्वतः स्वावलंबी झाले. इसवी सन १९२८ मध्ये त्यांनी ‘विद्यार्थी’ मासिक सुरू केले. ‘छात्रालय’ हस्तलिखिताचे अंक ते स्वतः लिहायचे. हे सर्व विद्यार्थिकेंर्द्रित होते. १९३० मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक त्यांनी काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून स्वतः मैला वाहणारे गुरुजी सर्वांनी बघितले. नंतरच्या काळात संबंधितांनी त्यांचा हा विचार जपणे गरजेचे होते. असे झाले असते तर देशात किमान भ्रष्टाचाराचा मैला झाला नसता. आता कुणालाही ईडीची भीती वाटते, ती वाटली नसती. ईडी ही आजची वरवरची मलमपट्टी आहे, हेही तितकेच खरे! मूळ साने गुरुजींची सेवावृत्ती जपणे महत्त्वाचे आहे.
राष्ट्र सेवा दलाची स्थापना आणि कार्य त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्वकाळात मौलिक होते. गुरुजींनी तिथेही सेवा बजावली. देशभक्तीने ते भारावलेले होते. देशभक्तिपर गीतांचा-कवितांचा त्यांचा ‘पत्री’ हा पहिला काव्यसंग्रह होय. ‘बलसागर भारत होवो - विश्वात शोभूनी राहो’, हे गीत-कविता त्या संग्रहातीलच आहे. आज आपण जागतिक अव्वल भारताच्या घोषणा करतो, कालावधी सांगतो, भारत कधी जगामध्ये अव्वल होणार ते! पण ‘बलशाली भारत’ सोडून स्वतःला बलशाली करणारे पाहिले की,
साने गुरुजींच्या शब्दांना बगल देऊन साम्राज्यशाही आणि भांडवलशाही राष्ट्र आणि राज्यांची राजकीय वाटचाल कोणत्याही भारतीयाला खटकते. पंढरपूरच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी १९४६ मध्ये महाराष्ट्राचा दौरा केला. गुरुजींनी याकरिता आंदोलनही केले. ते यशस्वी झाले. या आंदोलनाबाबत एवढेच म्हटले जाते की, ‘‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला अनेक पांडुरंगांसाठी मुक्त केले.’’ हा भावनेचा आणि भक्तीचा समभाव त्यांनी निर्माण केला.
स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षात त्यांनी सहभाग घेतला. आंतरभारती चळवळीतून ‘भारत जोडो’साठी ते राबले. गुरुजी यासाठी भारतभर फिरले. तमीळ आणि बंगाली भाषा ते शिकले. समरसून जीवनानुभव घेणारे गुरुजी या उपक्रमातून आपणांस कळतात. १९४८ मध्ये 'साधना' साप्ताहिक सुरू करणारे गुरुजी शब्दांचे साधक होते.
मानवतावाद - करुणा - संस्कार आणि संस्कृती - सामाजिक सुधारणा आणि प्रगती - देशभक्ती आणि मजबूत व अखंड भारत या मूल्यांची रुजवणूक समाजात होण्यासाठी त्यांनी त्यांच्या साहित्यातून या बाबींचा निष्ठेने आणि सातत्याने परिपोष केला. ‘श्यामची आई’ कादंबरी त्यांनी नाशिकच्या कारागृहात लिहिली होती. विनोबा भावे यांची गीता प्रवचने गुरुजींनी स्वतः लिहिली. समाजाला ‘शब्दांचे दान’ सहजपणे आणि सजगपणे देणारे गुरुजी उत्तम सुलेखनकार होते, ते यामुळेच!
एक साहित्यिक म्हणून गुरुजी सर्वांना ज्ञात आहेतच. संपादक आणि अनुवादक म्हणून त्यांनी जागतिक कलाकृती मराठीत अनुवादित केल्या. फ्रेंच भाषेतील ‘लेस मिसरेबल्स’ या कादंबरीचा ‘दुःखी’ या नावाने त्यांनी मराठीत अनुवाद केला. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या ‘द स्टोरी ऑफ ह्यूमन रेस’ या पुस्तकाचे त्यांनी मराठीमध्ये ‘मानवजातीचा इतिहास’ असे रूपांतर केले.
अनेक भारतीय महापुरुषांची चरित्रे त्यांनी लिहिली. मातृहृदयी गुरुजी जगाला ठाऊक आहेत. गुरुजींनी आई - वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची वाचनीय कादंबरी संस्कारांनीमंडित केलेली लिहिली. या कादंबरीवर पुढे सिनेमाही निघाला. ‘खरा तो एकचि धर्म - जगाला प्रेम अर्पावे’ ही देश जोडणारी आणि समाजबांधणी करणारी प्रार्थना फारच मौलिक आणि कालातीत आहे. या प्रार्थनेत ते सांगतात,
‘भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे.’
हे मानवाच्या अंतापर्यंत असेच राहावे. तरच ‘एक भारत - मजबूत भारत’ टिकेल. अखंड भारतासाठी त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘शांतिनिकेतन’ प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातही शिक्षण आणि भाषा शिक्षणाची सोय करावी, अशी तीव्र इच्छा व्यक्त केलेली होती. सामाजिक कळकळ - प्रेमाची आस - स्नेहवर्धन या गुणांनी सामाजिक उत्कर्षासाठी त्यांनी समाजाला एकत्र केले. गुरुजींची ‘सुंदर पत्रे’, ‘स्त्री जीवन’, ‘संस्कृतीचे भवितव्य’, ‘स्वदेशी समाज’ यासारखी सर्वच साहित्यसंपदा समाजाची विचारदर्शिका आणि पाठराखण करणारी आहे.
उदार धर्मनिरपेक्षता स्वतः बाळगणारे धर्मनिरपेक्षक, अज्ञान आणि अन्यायावर तुटून पडणारे वज्रहार, विषमता आणि अंधश्रद्धा नष्ट करणारे सम्यकपुरुष आणि मानवता सर्वार्थाने पाझरत ठेवणारे मानवतावादी सामाजिक अभिकर्ता साने गुरुजी होते आणि आहेतही.
आज त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांना सर्व भारतीयांच्या वतीने अभिवादन!
(लेखक रानमेवा शेती साहित्य मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.