
Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे. युनेस्कोच्या या वर्षीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी भारत सरकारने ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले’ या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित या किल्ल्यांची शिफारस केली होती.
भारतीय शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये ‘युनेस्को’च्या समितीसमोर सादरीकरण करताना या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा पटवून दिला. त्यानंतर समितीने ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून या किल्ल्यांना मान्यता दिली. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.
सरकारने महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांबरोबरच तमिळनाडूमधील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची शिफारस केली होती. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे.
स्वराज्यातील प्रशासकीय केंद्रे म्हणून काम करण्याबरोबरच शत्रूसैन्यावर वचक ठेवण्याचे कामही या किल्ल्यांनी केले होते. द्रष्टा राज्यकर्ता म्हणून जगभरात गौरविल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी आणि रक्षण केले होते.
या किल्ल्यांची धास्ती इंग्रजांच्या काळापर्यंत टिकून होती. या किल्ल्यांची रचना, त्याची तटबांधणी, त्यावरील लष्करी व्यवस्था याची मांडणी ‘युनेस्को’समोर करण्यात आली. त्याचे कागदोपत्री असलेले पुरावेही सादर करण्यात आले. याची दखल घेत ‘युनेस्को’ने जागतिक वारसा यादीत या स्थळांचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे या किल्ल्यांची ख्याती आणि महत्त्व जगभरात पोहोचणार असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासही मदत होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.