Top 5 News: अमेरिकेत सोयाबीनला मागणीचा आधार

अमेरिकेतल्या सोयाबीनच्या क्रशींगची डिसेंबरची आकडेवारी आली. तिच्यातून सोयाबीन उत्पादकांसाठी काय निष्कर्ष निघतायत, वाचा सविस्तर...
Soybean
Soybean

1. आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या काही ठिकाणचं कमाल तापमान (Temreture) सरासरीपेक्षा दीड ते तीन अंशांनी जास्त होतं. त्यामुळे राज्यात दिवसाचं तापमान वाढलं असून रात्री हवेत हलका गारवा कायम आहे. उद्या चार फेब्रुवारीला राज्यात मुख्यतः कोरडं हवामान (Weather) राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या तापमानात अजून काही अंशांची वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होतं. तर हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी, “आजपासून पुढचे 2 दिवस म्हणजे शनिवारपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पहाटेचं किमान तापमान सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं कमी होऊन थंडीत वाढ होईल,” अशी शक्यता वर्तवलीय.

2. देशभरातल्या बाजारांचा आढावा घेतल्यास मंगळवारच्या तुलनेत काल कापसाच्या एकूण आवकेत (Cotton Arrival) घट झालीय. मंगळवारी देशभरात 1,49,500 गाठींची आवक झाली होती. तर काल त्यात 170 किलोच्या एक हजार गाठींची घट झाली. त्यातल्या 45,000 गाठी महाराष्ट्राच्या बाजारांमध्ये आल्या होत्या. तर त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 40,000 कापूस गाठींची आवक झाली. हरियाणा आणि कर्नाटकच्या कापसाचं नुकसान (Cotton Damage) झालं असल्यानं तिथं देशातली सर्वात कमी आवक चालू आहे. तर सुताच्या विक्रमी निर्यातीची शक्यता कायम असून त्यामुळे कापसाच्या दरांना देशांतर्गत बाजारांमध्ये आधार मिळतोय. 

3. गुजरात आणि राजस्थानमधलं जिऱ्याचं काही क्षेत्र यंदा मोहरीखाली (Mustard) वळतं झालंय. गुजरातच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार राज्यातल्या जिऱ्याच्या उत्पादनात 41 टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी रब्बीत उत्पादन झालेल्या मोहरीला यंदा खाद्यतेलातल्या तेजीमुळे चांगला भाव मिळाला. त्यामुळे मोहरीचं क्षेत्र यंदा एकूण देशातच विक्रमीरित्या वाढलंय. गुजरातमध्ये याचा परिणाम जिऱ्याच्या क्षेत्रावर झाला असून कोथिंबीरीचं क्षेत्रही घटल्याचं अंदाजावरून स्पष्ट होतं.

4. नाशिक जिल्ह्यात कांद्याची सर्वात जास्त आवक होत असलेल्या लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon APMC) काल खरीप लाल कांद्याची (Red Onion) 24,754 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 500 तर कमाल 2514 असा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 2125 रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी कांद्याची 16,022 क्विंटल झाली होती. त्याला किमान 500 ते कमाल 2471 असा दर मिळालाय. या मालाचा सर्वसाधारण दर 2140 रुपये होता. गेल्या आठवड्यात 30 जानेवारीला रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सुट्टीमुळे लिलाव बंद होते. बाजार आवारात सध्या आवक सर्वसाधारण असूनही दर दबावात असल्याची स्थिती आहे.

5. अमेरिकेत सरत्या डिसेंबरमध्ये सोयाबीनचं क्रशींग (Soybean Crushing) त्याआधीच्या डिसेंबरच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढलं असून सरत्या नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण 4 टक्क्यांनी जास्त आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात USDA च्या खाद्यतेलाच्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय. तिथलं सोयाबीनचं रोजच्या क्रशींगची स्पीड वाढलीय. त्यामुळे उद्योगविश्वाच्या अंदाजापेक्षा डिसेंबरमध्ये सोयाबीन क्रशींग 3 टक्क्यांनी जास्त राहिलं. USDA कडून सोयाबीन तेलाच्या उत्पादनातही डिसेंबरमध्ये वाढ झाली असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच डिसेंबरच्या शेवटी सोयापेंड (Soymeal) उत्पादनही वाढलं होतं. साहजिकच यामुळे अमेरिकेच्या सोयातेल (SoyaOil) आणि सोयापेंड साठ्यात वाढ झालीय. तर डिसेंबरमध्ये सोयाबीनची मागणी चांगली राहिल्याचं या अहवालातून स्पष्ट होतं, असं जाणकारांनी ॲग्रीसेन्सस या वृत्तसंस्थेला सांगितलंय. दुसरीकडे जगातला सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक असलेल्या ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घटीचा अंदाज आहे. तर देशांतर्गत बाजारात खाद्यतेल कमीअधिक प्रमाणात तेजीत आहे. परिणामी, भारतीय सोयाबीनच्या आवकेला आधार मिळतोय. तसंच पामतेलाचे दर विक्रमी पातळीवर असल्यानं सोयाबीन तेलाला पसंती मिळतीय. तेलातल्या तेजीचा लाभ देशातल्या सोयाबीनलाही होत असून दर टिकून असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com