
Pune News : ‘‘ऊस वाहतूकदारांची टोळी मुकादमांकडून फसवणूक होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. यामुळे ऊस वाहतूकदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्यांचे कर्ज माफ करावे, यासाठी आंदोलन उभारण्यात येईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.
इंदापूर शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. पुणे, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख ऊस वाहतूकदार या वेली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील यांच्याकडे सर्व ऊसवाहतूक मालकांनी व्यथा मांडल्या. मुकादमांकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात स्थानिक पोलिस गुन्हे दाखल करून घेत नाहीत. तसेच संबंधित साखर कारखाने ऊस वाहतूकदारांना जामीनदार असलेल्या सभासदांच्या ऊसबिलातून रक्कम कपात करून घेत असल्याबाबत माहिती दिली.
पाटील म्हणाले, ‘‘सांगली, सातारा, कोल्हापूर येथे पैसे घेऊन फसवणूक केलेल्या मुकादमांसह स्थानिक प्रशासनाविरोधात मोर्चे व आंदोलन केल्यामुळे संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले. लवकरच सोलापूर, पुणे, धाराशिव जिल्ह्यांतही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून ऊस वाहतूकदारांचे कर्ज माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’’
संघटनेचे सचिव प्रकाश सूर्यवंशी, खजिनदार अवधूत पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत राजोबा, सोलापूर जिल्हाध्यक्ष हनुमंत फलफले, माळशिरसचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ बाड, तुळजापूरचे तालुकाध्यक्ष मोहन भोसले, संतोष जगताप, अशोक व्यवहारे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.