

Baramati News : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा जलसिंचन योजनेतून टंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थी गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बारामतीच्या जिरायती भागातील उंडवडी क. प, जराडवाडी, कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, खराडेवाडी, साबळेवाडी, जळगाव सुपे, अंजनगाव, बर्हाणपूर, गोजुबावी आदी भागांत पाऊस लांबणीवर गेल्यामुळे ऐन पावसाळ्यात भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली. बहुतांश विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चारा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिरसाई योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लाभार्थी गावातून करण्यात आली होती. त्यानुसार श्री. पवार यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार रविवारी (ता. ६) दुपारी ३च्या शिरसाई उपसा योजना कार्यान्वित करून डाव्या कालव्यावरील गावांना आवर्तन सोडण्यात आल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
योजनेचे पाणी परिसरातील पाझर तलावात सोडल्यानंतर बहुतांश विहिरी व कूपनलिका पुनर्जीवित होऊन पिण्याच्या पाण्यासह चारा पिकांना फायदा होणार आहे.
याबाबत शिरसाई योजनेचे स्थापत्य अभियांत्रिकी अमोल शिंदे म्हणाले, ‘‘शिरसाई डावा कालव्यावरील साफसफाई व सायपन (पाणी चोरी) काढण्याचे काम सुरू आहे.
हे काम झाल्यानंतर उजवा कालवा व डावा कालव्याला उपसा योजनेचे सहा वीजपंप सुरू करून लाभार्थी गावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.