Pune News : राज्याच्या कृषी विभागाला कमी दरात दर्जेदार निविष्ठा देण्याची तयारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दर्शविली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या निविष्ठांना डावलू नये यासाठी स्वतः कुलगुरूंनी कृषी आयुक्तालयाला पत्र लिहिले आहे.
निविष्ठा खरेदीसाठी कृषी विभागाच्या मागणीपत्राची नेहमीसारखी प्रतीक्षा विद्यापीठ करीत होते. परंतु, मागणीपत्र न आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विद्यापीठाने कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू केली.
‘‘यंदा केवळ कृषिउद्योग महामंडळाकडून निविष्ठा खरेदी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी सहसंचालकांना देण्यात आलेले आहेत.
कृषी आयुक्तालयाने स्वतंत्र आदेश जारी केल्याशिवाय कृषी विद्यापीठाकडून खरेदी होणार नाही, असे उत्तर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना मिळाले.
त्यामुळे ही बाब कुलगुरूंच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी या समस्येसाठी पाठपुरावा सुरू केला असून विद्यापीठाच्या निविष्ठा नाकारल्या जाणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे,’’ असे विद्यापीठाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाच्या नव्या धोरणानुसार, यंदा कृषी विज्ञान केंद्रांना तसेच विद्यापीठांच्या निविष्ठांची खरेदी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये नाराजी पसरली आहे. निविष्ठा खरेदीतून वगळू नये यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मात्र जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र राज्य कृषिउद्योग महामंडळाचा व्यवसाय कमी झालेला आहे. त्यामुळे निविष्ठांचे खरेदीचे कंत्राट केवळ महामंडळाला देण्याची भूमिका कृषी आयुक्तालयाने जाहीर केले आहे.
सरकारी महामंडळाकडून ही खरेदी होत आहे. त्यात काहीही गैर नाही. तसेच, गुणवत्ता असल्यास कोणत्याही संस्थांनी थेट बाजारात उतरावे व स्वतःची क्षमता सिद्ध करावी. त्यासाठी कृषी आयुक्तालयाला दोष देणे अयोग्य आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कमी दरात निविष्ठा पुरवण्यासाठी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. ‘कृषी विभागासाठी फुले द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (ग्रेड-२) पुरवठा विद्यापीठ करते.
यंदाची किंमत विद्यापीठाने प्रतिलिटर ३८० रुपयांऐवजी केवळ ३०० रुपये लिटरवर ठेवली आहे. याउलट कृषिउद्योग महामंडळाने याच अन्नद्रव्याची किंमत प्रतिलिटर ३३० रुपये नमुद केली आहे.
त्यामुळे यंदा शेतकऱ्यांसाठी होत असलेल्या पीक प्रात्यक्षिके प्रकल्पांकरिता कृषी विभागाकडून होणाऱ्या निविष्ठा खरेदीत आमच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश कायम ठेवावा,’ असा आग्रह विद्यापीठाने कृषी आयुक्तालयाकडे धरला आहे.
विद्यापीठातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कोणत्या संस्थांकडून निविष्ठा खरेदी करावी याचे अधिकार कृषी विभागाला आहेत. खरेदी धोरणावर विद्यापीठाला अजिबात आक्षेप नाही. परंतु, या खरेदीतून विद्यापीठाची उत्पादने वगळणे गैर आहे.
राज्यातील इतर खासगी निविष्ठांबाबत गुणवत्तेची हमी नसते. परंतु, विद्यापीठ गुणवत्तेचे दंडक पाळते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळतात. कृषी विभागाला ही बाब माहीत असूनही डावलण्याचा प्रकार होतो आहे.
कमी किंमत, दर्जा असतानाही का नाकारले जात आहे?
‘‘कृषी विभागाकडून निविष्ठा खरेदी झाल्यास विद्यापीठाच्या उत्पन्नात भर पडते. २०२१ आणि २०२२ अशा दोन्ही हंगामात जवळपास ३० हजार लिटर फुले द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्यांची खरेदी कृषी विभागाने केली होती.
आमच्या दर्जेदार निविष्ठांबाबत राज्यातून एकही तक्रार आलेली नाही. असे असताना विद्यापीठाच्या निविष्ठांना यंदा का नाकारले हे कळत नाही. खासगी कंपन्यांच्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी विद्यापीठाच्या उत्पादनांना कमी लेखणारी ही बाब आहे,’’ असा युक्तिवाद एका शास्त्रज्ञाने केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.