
Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या (Swami Samarth Cooperative Sugar Mill) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया (Sugar Mill Election) सध्या सुरु आहे. आतापर्यंत आठ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत.
उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. पण येत्या तीन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकच्या काही भागासाठी या कारखान्याचे महत्त्व आहे. परंतु उसाची कमतरता आणि आर्थिक अडचणीमुळे गेली काही वर्षे हा साखर कारखाना बंद आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे या कारखान्याचे संस्थापक आहेत.
या निवडणुकीत ते स्वतः आणि त्यांचे चिरंजीव संजीव पाटील हे उतरले आहेत. पुन्हा एकदा कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारखान्याचे २० हजार ५५६ इतके ऊस उत्पादक सभासद मतदार आहेत. तर ४६ संस्था मतदार आहेत. कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी ८ जागा या आधीच बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.
वागदरी गटातील एका जागेसाठी अर्ज न आल्याने ही जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. तीन एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर १६ एप्रिलला मतदान आणि १७ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
आठ संचालक बिनविरोध
बिनविरोध निवडलेल्या आठ संचालकांमध्ये नागणसूर गाटतील भीमाशंकर धोत्री, उत्तम वाघमोडे, महेश पाटील, सलगर गटातील दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, वागदरी गटातील श्रीमंत कुंटोजी आणि संजीवकुमार पाटील यांचा समावेश आहे. या आठ संचालकांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.