Ravikant Tupkar Protest बुलडाणा : सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या (Soybean Cotton Rate) मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही. या मुद्द्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शनिवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या वेळी पोलिसांनी त्यांना आत्महदनापासून रोखले; मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे तुपकर व त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रयत्न केले.
शेतकऱ्यांना पीकविमा, अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मदत व सोयाबीन-कापसाची दरवाढ याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे गेल्या काळात रविकांत तुपकर यांनी पाठपुरावा केला. आंदोलने केली.
पण ठोस काही होताना दिसत नसल्याने तुपकर यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी टोकाची भूमिका घेत असल्याचे जाहीर केले होते. स्वतः आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला दिला होता. ‘एक तर आत्मदहन करू द्या; अन्यथा बंदुकीच्या गोळ्या घाला’, असे जाहीर केले.
हे आंदोलन एक तर बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पीकविमा कंपनीच्या मुंबई कार्यालयासमोर होईल, असे जाहीर केल्याने प्रशासनाची एकच पळापळ झाली. दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
प्रामुख्याने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस कुमक वाढवण्यात आली होती. सकाळपासूनच तेथे चोख बंदोबस्त असल्याने आंदोलनाचीच चर्चा सुरू होती.
अखेरीस ठरल्याप्रमाणे तुपकर हे सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना आत्मदहनापासून रोखले. तुपकर यांनी खाकी वेश घालून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.
पावणे दहा कोटी झाले जमा
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासकीय स्तरावर सातत्याने बैठका सुरू झाल्या होत्या. गुरुवारी (ता. ९) रात्री नैसर्गिक आपत्तीच्या मदतीस पात्र १५ हजार २२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ कोटी ७८ लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झाली होती.
परंतु नैसर्गिक आपत्तीअंतर्गत असलेल्या सर्वच पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा व्हावी, कापणी पश्चात विमासुद्धा तातडीने मिळावा व अतिवृष्टीची मंजूर असलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जावी.
सोयाबीन, कापूस दरवाढीसंदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावे, या मागण्यांवर तुपकर ठाम असल्याचे सांगत शनिवारी आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.