Nashik News: संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांची त्र्यंबकनगरी भाविकांनी फुलली
ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ (Sri SriNivruttinath ) महाराज हे वारकरी सांप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी सांप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. ज्येष्ठ वद्य द्वादशीला त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली.
परंतु ज्येष्ठ वद्य द्वादशीनंतर पंधराच दिवसांत पंढरपूरची आषाढी वारी येते. त्यासाठी महिनाभर अगोदरच वारकरी जातात. त्यामुळे संप्रदाय हा समाधी सोहळा पौष वद्य एकादशीस साजरा करतो.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वारी झाली नव्हती. यंदा यात्रोत्सव मोठा प्रमाणावर साजरा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
५०० दिंड्या हरिनामाचा जयघोष करत त्र्यंबकनगरीत दाखल झाल्याने परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला आहे. नाथांच्या चरणी लीन होत भक्तीचा उत्सव साजरा केला.
संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने यंदा हा यात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.
वारीसाठी राज्यातील नगर, धुळे, जळगाव, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांसह इतर भागांतून आलेल्या ५०० दिंड्यांमध्ये मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांचा उत्साह अवर्णनीय होता. टाळकरींचा अखंड नाद ऊर्जा देत होता.
उत्साहपूर्ण वातावरण असल्याने जणू भक्तीची लाटच उसळली होती. हातात भगव्या पताका, हाती टाळ मृदुंगाच्या तालात दंग झालेल्या वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी दुमदुमली गेली.
येथे दाखल होणाऱ्या दिंडीचे नाशिक शहरापासून विविध भाविक व प्रशासनाने जल्लोषात स्वागत केले. गजानन महाराज संस्थानतर्फे श्रीफळ देऊन दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.
रविवारपासून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग गजबजला होता. सोमवारी सायंकाळपर्यंत दिंड्या मुक्कामी पोहोचल्या.
बुधवारी (ता. १८) पहाटे चार वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झाली.तर सकाळी ११ महापूजा संस्थानाचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील व सचिव सोमनाथ घोटेकर यांच्या हस्ते झाली.
त्यानंतर दुपारी पालखी मिरवणूक, नगर परिक्रमा, श्री त्र्यंबकराज भेट आणि कुशावर्त तीर्थस्नान असे कार्यक्रम झाले.
संत श्रीनिवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने १६ ते २१ जानेवारी दरम्यान पौषवारी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सध्या मंदिर मंडप बांधकाम सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून मंडप टाकून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पिण्यासाठी पाणी, फिरते स्वच्छतागृह, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहेत.
संस्थानतर्फे आयोजित परंपरेच्या कीर्तनसेवा
संस्थानतर्फे यात्रोत्सव काळात रमेश एनगांवकर, मोहन बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, डॉ. रामकृष्ण लहवितकर, कान्होबा देहुकर, उखळीकर महाराज, जयंत गोसावी यांचे कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.